डॉ. नित्यनाथ उर्फ नीतू मांडके (३१ जानेवारी, इ.स. १९४८ - २२ मे, इ.स. २००३) हे एक मराठी हृदयरोग शल्यविशारद होते.

नित्यनाथ मांडके
जन्म नाव नित्यनाथ मांडके
टोपणनाव नीतू मांडके
जन्म जानेवारी ३१, इ.स. १९४८
मृत्यू मे २२, इ.स. २००३
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र हृदयरोग शल्यविशारद
भाषा मराठी
अपत्ये जुई, चारुता, मंदार

शिक्षण

संपादन

नीतू मांडके यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या भावे विद्यालयामध्ये झाले. कुशाग्र बुद्धीमुळे व अभ्यासू वृत्तीमुळे यांचा पहिल्या पाचांत नंबर असायचा. वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. एम.बी.बी.एस. झाल्यावर ते मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयामध्ये दाखल झाले.[] तेथे डॉ. पी.के. सेन हे हृदयरोग शल्यविशारद त्यांचे गुरू. एम.एस. व एम.सी.एच. या हृदयशास्त्रातील उच्च पदव्या डॉ. मांडकेंनी मिळवल्या. हृदयशस्त्रक्रियेतील अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. त्यांनी अमेरिकेत हृदयशास्त्राच्या नवनवीन शाखेत अनुभव व ज्ञान संपादन केले व शस्त्रक्रियेत अधिक कौशल्य मिळवले. १९८४ साली ते भारतात परत आले. परदेशी त्यांना मागदी याकूब व अल्बर्ट पॅसिफिको या शल्यविशारदांचे मार्गदर्शन लाभले. मागदी याकूब यांचे ब्रिटनमध्ये व अल्बर्ट पॅसिफिको यांचे अमेरिकेत मार्गदर्शन मिळाले. चिकित्सक दृष्टी, तीव्र निरीक्षण शक्ती व परिश्रम करण्याची तयारी, जोडीला शीघ्र ग्रहणशक्ती या गुणांमुळे ते हृदयशस्त्रक्रियेत पारंगत झाले.[]

बालपण

संपादन

अभ्यास, खेळ, वक्तृत्व, चित्रकला, हस्तकला, सुंदर अक्षर, असे त्यांचे निरनिराळे गुण शाळेत शिकत असताना दिसून आले. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले होते. संघामुळे त्यांच्यात शिस्त, राष्ट्रीयत्व जागृत राहिले. डॉ. मांडके यांचे खेळातील प्रावीण्य वाखाणण्यासारखे होते. फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, खो-खो, हॉकी, मुष्टियुद्ध, व्हॉलीबॉल, पोहणेबास्केटबॉल यांतही त्यांनी स्वतःचे प्रभुत्व दाखवले.

विवाह

संपादन

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच अलका पडळकर या सहाध्यायीबरोबर त्यांचे प्रेम जमले व शिक्षण पुरे झाल्यावर त्यांचा विवाह झाला. तिने भूलशास्त्रात एम.डी. केले होते.

व्यावसायिक कारकीर्द

संपादन

हृदय चालू असताना ‘ऑक्टोपस’ नावाचे उपकरण लावून ‘कॉरोनरी बायपास’ करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी आत्मसात केली. या पद्धतीमध्ये रुग्णाला रक्त अगदी कमी द्यावे लागते. १८-१९ वर्षांच्या कारकिर्दीत डॉ.मांडके यांनी बारा हजार शस्त्रक्रिया केल्या. त्यांतील चार हजार विनामूल्य केल्या. सयामी जुळ्यांवरील हृदयशस्त्रक्रिया खूप कठीण होती. डॉ. मांडके यांनी मुंबई, पुणे, कोईमतूर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, दमास्कस, सीरिया येथे हृदयशल्यचिकित्साविषयक कार्यशाळा आयोजित केल्या. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांतून शंभरहून अधिक प्रबंध प्रसिद्ध केले व दोनशे पासष्टहून अधिक प्रबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून वाचले. १९९१ साली त्यांनी सामान्य माणसांसाठी सोप्या भाषेत ‘हार्ट बीट’ हे पुस्तक लिहिले.[]

पुरस्कार

संपादन

डॉ. मांडके यांना १९९२ चे‘राजीव गांधी सुवर्णपदक’ मिळाले. त्यांना बोर्ड ऑफ अमेरिकन बायोग्रफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (यू.एस.ए.)तर्फे ‘विसाव्या शतकातील असाधारण व्यक्तिमत्त्व’ पुरस्कार, ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ (२००३), युवा संघर्ष वाहिनीचा ‘डॉ. कोटणीस स्मृती गौरव पुरस्कार’, ‘प्रियदर्शिनी पुरस्कार’ (१९९८) असे अनेक पुरस्कार मिळाले.

डॉ. नितू मांडके यांचं हृद्रोगामुळेच निधन[] झालं.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "'केईएम' नावाचं मंदिर". Loksatta. 2020-03-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Pratilipi | Read Stories, Poems and Books". marathi.pratilipi.com. 2020-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "हृदयस्थ (Hrudayastha) | Granthali". Granthali. 2019-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ May 23, TNN |; 2003; Ist, 00:09. "Cardiac surgeon Nitu Mandke dead | Mumbai News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-03-26 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)