निखिल बॅनर्जी (जन्म : कलकत्ता, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - - कलकत्ता, २७ जानेवारी, इ.स. १९८६) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक होते. ते सार्वकालिक सर्वोत्तम सतार वादकांमधील एक गणले जातात.

निखिल बॅनर्जी

निखिल बॅनर्जी
आयुष्य
जन्म ऑक्टोबर १४, इ.स. १९३१
जन्म स्थान कलकत्ता
मृत्यू २७ जानेवारी १९८६
मृत्यू स्थान कलकत्ता
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा बंगाली
पारिवारिक माहिती
वडील जितेन्द्र नाथ बॅनर्जी
जोडीदार रोमा बॅनर्जी
संगीत साधना
गुरू उस्ताद अल्लाउद्दीन खान
घराणे मैहर
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार

पूर्वायुष्य आणि बालपण

संपादन

निखील बॅनर्जी यांचा जन्म १९१४ साली कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरू केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरू म्हणजे मैहरचे अलाउद्दीन खान.

मैहर मधील शिक्षण

संपादन

अलाउद्दीन खान साहेबांनी निखिल यांची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून अतिशय कठीण प्रकारे रियाज करून घेतला. त्यांच्याकडून, थोडी विश्रांती वगळता सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत रियाज करून घेण्यात येत असे. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याच्याही पलीकडील सांगीतिक ज्ञान अलाउद्दीन खानसाहेबांकडून निखिल यांना मिळाले. पुढे निखिल बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. या सर्व शिक्षणानंतर निखिल बॅनर्जींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली.

कारकीर्द

संपादन

मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिल बॅनर्जी यांनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रम केले. आकाशवाणीवर ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांचा पहिला परदेश दौरा १९५५ साली झाला असला तरी पहिला मोठा अमेरिका दौरा १९६७ साली झाला. त्यानंतर मात्र त्यांना कार्यक्रमांसाठी नियमित परदेशी जावे लागल्याने ते आपल्या कारकिर्दीत अतिशय व्यस्त झाले. ध्वनिमुद्रणांपेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. परंतु ह्या व्यस्त वेळापत्रकाचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला व त्यांना १९७०-८० च्या उत्तरार्धात हृदयविकाराचा त्रास जडला.

२७ जानेवारी १९८६ला कलकत्त्याला सतार वादन चालू असतानाच त्यांना अखेरचा हृदयविकाराचा झटका आला.

वादनशैली

संपादन

निखिल बॅनर्जी यांच्या सतार वादनात गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसे. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळे. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते.

निखिल बॅनर्जी यांचा भर पारंपरिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इत्यादी राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते.

पुरस्कार

संपादन
  • पद्मश्री पुरस्कार - इ.स. १९६८
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स. १९७४
  • पद्मभूषण पुरस्कार - इ.स. १९८६