ना.गो. चाफेकर

लेखक
(ना.गो. चापेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर (जन्म : मुंबई, महाराष्ट्र, ५ ऑगस्ट १८६९; - बदलापूर (महाराष्ट्र), ५ मार्च १९६८) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्‌मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]

ना.गो. चाफेकर

चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.

निवृत्तीनंतर

संपादन

चापेकरांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली ना.गो. चापेकर यांना डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.[ संदर्भ हवा ]

बदलापुरातील नियोजित स्मारक

संपादन

बदलापूरची ओळख जागतिक पातळीवर करून देण्यात अग्रणी ठरलेल्या नानासाहेब चापेकरांच्या स्मृती जपण्यासाठी शहरातील साहित्यप्रेमी एकत्र आले आहेत. नानासाहेबांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांची ओळख नव्या बदलापूरला देण्यासाठी नीलफलक, साहित्य जनआवृत्ती व स्मारकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. ५ ऑगस्ट २०१७ या त्यांच्या जयंतीनिमित्त त्याची सुरुवात केली जाणार आहे.

न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर नानासाहेबांनी बदलापुरात मुक्काम ठोकला. बदलापूर गावात त्यांचा वाडा होता. तिथे देशभरातील नावाजलेल्या साहित्यिकांना ते आईच्या साहित्यिक श्राद्धाला आमंत्रित करत असत. त्यामुळे बदलापूरला बड्या साहित्यिकांचे पाय लागत असत.

नानासाहेबांची कोणतीही आठवण बदलापूर शहरात उपलब्ध नाही. त्यांचा एकमेव वाडाही जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यामुळे महानगराच्या वाटेवर असलेल्या या शहराला नानासाहेब चापेकरांच्या कामाचा गंध नाही. त्यास्तव ‘ग्रंथसखा’ वाचनालयाचे शाम जोशी, श्रीधर पाटील आणि काही साहित्यप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याच्या धर्तीवर शहरात त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी एक नीलफलक लावण्यात येणार आहे. तसेच लोकवर्गणीतून त्यांच्या साहित्याची जनआवृत्ती काढण्यात येईल. तसेच शहरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांचे छायाचित्र पालिका सभागृहात लावण्याचा विचार असून शहरात होणाऱ्या नाट्यगृहासही त्यांचेच नाव देण्याची मागणी होणार आहे.

लिहिलेली पुस्तके

संपादन

ना.गो. चापेकरांनी लिहिलेली पुस्तके :-

  • आमचा गाव बदलापूर (१९३३)
  • एडमंड बर्कचे चरित्र
  • काश्मीर (प्रवासवर्णन, १९४६)
  • कोश (?)
  • गच्चीवरील गप्पा (ललित लेख, १९२६)
  • चित्पावन (१९३८)
  • जीवनकथा (आत्मचरित्र, १९४३)
  • तर्पण (१९४८)
  • निवडक लेख (१९२४)
  • रजःकण (ललित लेख, १९४३)
  • वैदिक निबंध (१९२९)
  • पेशवाईच्या सावलीत
  • शिवाजी निबंधावली (सहलेखक - न.चिं. केळकर, वा.गो. काळे
  • समाजनियंत्रण (१९३२)
  • हिमालयांत (प्रवासवर्णन, १९४१)

पुरस्कार

संपादन

ना.गो. चापेकर यांच्या नावाने ऐतिहासिक विषयावर लिहिणाऱ्या लेखकाला दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो.[ संदर्भ हवा ] हा पुरस्कार फार प्रतिष्ठेचा समजला जातो.

संदर्भ आणि नोंदी

संपादन