नारायण विष्णु धर्माधिकारी

(नानासाहेब धर्माधिकारी या पानावरून पुनर्निर्देशित)


श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : मार्च १, १९२२; - जुलै ८, २००८) दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

नारायण विष्णु धर्माधिकारी
मूळ नाव नारायण विष्णू धर्माधिकारी
जन्म मार्च १ इ.स. १९२२
रेवदंडा, महाराष्ट्र
निर्वाण जुलै ८ इ.स. २००८
रेवदंडा, महाराष्ट्र
भाषा मराठी
कार्य निरूपण
वडील विष्णू धर्माधिकारी
पत्नी शारदा
अपत्ये दत्तात्रेय (पुत्र)

नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हात पाहून भविष्य सांगणे होता।

घराण्याचा इतिहास

संपादन

धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव "शांडिल्य" असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.

वारसा

संपादन

डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय तथा अप्पासाहेब व नातू सचिनदादा यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहेत.

जीवनकार्य

संपादन

धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू आदरणीय रायगड भूषण श्री. सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .

या कामासाठी त्यांनी १९४३ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर १९४३ ( विजयादशमी ) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्रीबैठक सुरू करण्यात आली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.

त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.
अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते.
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.

पुरस्कार

संपादन
  • २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
  • गुजराती महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
  • जिल्हापरिषदेतर्फे रायगडमित्र(१३ मे १९९३)
  • त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते (१८-१-२००५).
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र (१२-५-२००३)
  • पुणे महापालिकेतर्फे मानपत्र
  • पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा, महर्षी व्यास पुरस्कार (खोपोली, ११-१२-२००७).
  • महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार(१-३-२००२)
  • महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (३०-४-२०००)
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२९ जून १९९७)
  • रायगडभूषण
  • राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल, सीरॉक (इंडिया) ठाणे यांचा ’सीरॉक इंडिया‘ पुरस्कार (१६-५-१९९९).
  • शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार (३१-१-२००३).
  • समर्थ व्यासपीठ, पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार (१५-११-१९९९).
  • समर्थ रामदासस्वामी भूषण पुरस्कार (१८-५-१९९९)

बाह्य दुवे

संपादन
  1. निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन Archived 2016-02-09 at the Wayback Machine.
  2. इंग्रजी विकिपीडियावरील लेख
  3. ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी [permanent dead link]

पहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार