प्रा. डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर (मार्च १५, इ.स. १९६६ - जून १७, इ.स. २०१२; कोल्हापूर, महाराष्ट्र) हे एक मराठी लेखक व कवी होते. हे कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख आणि दमहाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते.

धम्मपाल रत्‍नाकर
जन्म नाव धम्मपाल भूपाल रत्‍नाकर
जन्म मार्च १५, इ.स. १९६६
मृत्यू जून १७, इ.स. २०१२
कोल्हापूर,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, काव्यरचना
भाषा मराठी
साहित्य प्रकार वैचारिक लेख, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती ह्या सैतानाच्या खांद्यावर
वडील भूपाल
अपत्ये दोन मुले
पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार

जीवन संपादन

रत्नाकर विद्यार्थिदशेपासूनच प्रशिक विद्यार्थी संघटनेद्वारे आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. ते वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. यळगूड (ता. कागल) येथून अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हॉटेलमध्ये काम केले होते.

कारकीर्द संपादन

साहित्यिक कारकीर्द संपादन

धम्मपाल रत्नाकरांचे हॉटेल माझा देश, सैतानाच्या खांबावर आणि लक्‍तरांची गझल हे काव्यसंग्रह गाजले. दलित साहित्याच्या नामांतराचा वाद आणि विसावा या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. विस्कट या नावाची एक कादंबरी त्यांनी लिहिली आहे. त्यांनी "आंबेडकर चळवळीतील कवी नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा अभ्यास" या विषयावर संशोधन केले आहे. आंबेडकर चळवळीतील एक समीक्षक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

अध्यापन संपादन

धम्मपाल रत्नाकरांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करत होते.

निधन संपादन

पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने इचलकरंजीसह कोल्हापूर परिसरात इ.स. २०१२ सालातल्या मे-जून महिन्यांत काविळीची साथ पसरली. हिपॅटायटीस ई प्रकारच्या या काविळीमुळे १७ जूनपर्यंत इचलकरंजी नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांसह १३ जणांचे प्राण गेले. त्या साथीत कदमवाडी, कोल्हापूर येथे राहणाऱ्या धम्मपाल रत्‍नाकरांचेही निधन झाले.

पुरस्कार संपादन

धम्मपाल रत्‍नाकर यांना उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाचा दोन वेळा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय १ जानेवारी, इ.स. २००७ रोजी महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांना पुरस्कार दिला होता. साहित्य क्षेत्रातील अन्य मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते.