देविदास दत्तात्रेय वाडेकर

प्रा. दे.द. तथा देविदास दत्तात्रेय वाडेकर (२५ मे, इ.स. १९०२ - ५ मार्च, इ.स. १९८५) हे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हे डी.डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते.

जीवनपट

संपादन

वाडेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कुरोली (सिद्धेश्वर) या खेड्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वाडेकर यांचे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदनगर शहरात झाले. लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रभावाने ते फर्गसन महाविद्यालयात १९१८ मध्ये कला शाखेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांनी तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास केला. तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १८८५ साली आगरकरानी केली होती.[] गुरुदेव रा.द. रानडे, व्ही.के. जोग, ग.ना. जोशी, प्रा. भाटे, डॉ. एस.व्ही. बोकील हे स्थापनेपासून विभागात होते.[] तेथे तत्कालीन शिक्षण रचनेनुसार वाडेकर यांनी तर्कशास्त्र तत्त्वज्ञानमानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यावेळी तत्त्वज्ञान या विषयांतर्गत मानसशास्त्र या विषयाचा समावेश होता.

ते २० जून १९६२ रोजी फर्गसन महाविद्यालय-तत्त्वज्ञान विभागातून निवृत्त झाले.

तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र मराठीत आणण्याचे योगदान

संपादन

तर्कशास्त्र मराठीतून शिकविता यावे यासाठी त्यांनी या विषयाची स्वतंत्र परिभाषा बनविली. तर्कशास्त्रावर त्यांनी तीन ग्रंथ लिहिले. माणसाचे सम्यक् स्वरूप कळावे यासाठी त्यांनी मानसशास्त्राचाही अभ्यास केला. आधुनिक मानसशास्त्रातील विविध संप्रदाय या विषयावर त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीतून व्याख्याने दिली. आधुनिक मानसशास्त्र आणि त्यातील विविध संप्रदाय हे वाडेकरांनी सर्वप्रथम मांडले.[]. प्लेटोब्रॅडले हे त्यांचे आवडते तत्त्ववेत्ते होते. या दोघांच्या वरील तात्त्विक अधिभाष्य म्हणून कार्ल पॉपर त्यांना खुल्या समाजाचे शत्रू असे का संबोधतो, याचाही ते परामर्श घेत असत.[]. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र हे विषय वाडेकर स्वतः इंग्लिशमध्ये शिकून शिकवीत असले तरी हे सर्व विषय आणि अनुषंगिक इतर विषय त्यांनीच प्रथम मराठीत आणले. त्यासाठी त्यांनी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले.[].

मराठी तत्त्वज्ञान महाकोश

संपादन

मराठी तत्त्वज्ञान महाकोश या तत्त्वज्ञान विषयक कोशाचे प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले आहे. हा कोश मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, तर्फे १९७४ साली प्रकाशित झाला. या कोशाची रचना करताना त्यांनी त्यात अंतर्गत केलेल्या एका मुलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील पंधरा भाषांत व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानावरील पंधरा लेखांचा त्यांनी केलेला समावेश. हे लेख मूळ इंग्रजीत लिहिले होते. या पंधरा लेखांचे त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक ही संपादित केले, अशी माहिती डॉ. बोकील देतात. हे पुस्तक अप्रकाशित राहिले. ऑक्टोबर २००२ मध्ये दिल्लीला भारतीय दर्शन अनुसंधान परिषदेने नेमक्या याच विषयावर परिसंवाद आयोजित केला, अशीही पुस्ती डॉ. बोकील जोडतात.[].

इतर संपादन

संपादन

प्रोफेसर वाडेकर यांनी अ हँड-बूक ऑफ पूना हे पुस्तक संपादित केले. डी. व्ही. काळे[ संदर्भ हवा ] हे सहसंपादक होते. केसरी मराठी ट्रस्ट ने १९३४ साली प्रकाशित केले.

तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धति (सहलेखक:हरोलीकर, लक्ष्मण बळवंत,सरस्वती प्रकाशन: पुणे, 1959, किंमत रु. १०=००)[]

जन्मशताब्दी विशेषांक

संपादन

२००१-०२ हे वर्ष वाडेकर यांच्या जन्मशताब्दीचे असल्याने त्यांच्या स्मरणार्थ पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने परामर्श तर्फे नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १) प्रकाशित केला. या अंकासाठी फर्गसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि वाडेकर यांचे सहकारी डॉ. बोकील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. १६ जानेवारी २००२ रोजी समितीची बैठक होवून विशेषांकाची रूपरेखा निश्चित करण्यात आली. अंकाच्या प्रसिद्धीसाठी रामचंद्र दत्तात्रय प्रतिष्ठान, पुणे तर्फे शेखर गाडगीळ यांनी रु. १५ हजारचे अनुदान दिले.[]

या विशेषांकातील लेखांची वर्गवारी स्थूलमानाने तीन गटात केली आहे.[].

  1. पाश्चात्य व भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात असलेया समृद्ध नीतिविचाराच्या परंपरेतील प्रणाली, संप्रदाय यामधील काही पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख.
  2. विसाव्या शतकातील नीतिमीमांसेच्या क्षेत्रातील काही नवीन घडामोडींची चर्चा करणारे लेख
  3. 'उपयोजित नीतिशास्त्र' या नावाने उदयास आलेली नीतीची नवी चर्चा स्पष्ट करणारे काही विषयांवरील लेख.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.fergusson.edu/departments/department/id/20
  2. ^ http://www.fergusson.edu/departments/department/id/27/eventid/91
  3. ^ डॉ.एस. व्ही. बोकील, स्व. प्रोफेसर देविदास दत्तात्रेय वाडेकर,नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  4. ^ डॉ. एस. व्ही. बोकील, स्व. प्रोफेसर देविदास दत्तात्रेय वाडेकर,नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  5. ^ डॉ. एस. व्ही. बोकील, स्व. प्रोफेसर देविदास दत्तात्रेय वाडेकर,नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  6. ^ डॉ. एस. व्ही. बोकील, स्व. प्रोफेसर देविदास दत्तात्रेय वाडेकर,नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  7. ^ http://120.63.216.208/W27/Result/Dtl/W21OneItem.aspx?xC=119610
  8. ^ नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  9. ^ संपादकीय टिपण, नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १), तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे