डॉ. दामोदर खडसे (११ नोव्हेंबर, इ.स. १९४८:सरगुजा, छत्तीसगढ - ) हे मराठी पुस्तकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी हिंदीतही पुस्तके लिहिली आहेत. उज्जैन, कोल्हापूर, अमरावती, पुणे अशा विद्यापीठांमधून अनेक विद्यार्थी पीएच.डी. आणि एम.फिल.साठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत.

डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म छ्त्तीसगढमधील सरगुजा संस्थानात झाला. तेथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी अकोल्यात एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशात असतानाच त्यांनी नागपुरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट संपादन केली

खडसे यांनी इयत्ता दहावीत असल्यापासून लेखन करायला सुरुवात केली. पाच कथासंग्रह, पाच कवितासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक पुस्तके एवढी त्यांची स्वतंत्र हिंदी साहित्यसंपदा आहे. त्यांनी छावा, कालचक्र अशा मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद केले आहेत.

बाबा आमटे यांच्यावर दामोदर खडसे यांनी लेखन केले आहे. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. खडसेंच्या स्वतःच्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या इस जंगलमें या कथेवर दिल्ली दूरदर्शनने टेलिफिल्म बनवली आहे. हिंदी साहित्यकार पं. हरिनारायण व्यास यांच्यावर बनवलेल्या लघुपटासाठी खडसे यांनी काम केले.

खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यांत अरुण खोरे (आत्मचरित्र), जयवंत दळवी, दया पवार (बलुतं), भारत सासणे, राम नगरकर (रामनगरी), लक्ष्मण माने (उपरा), शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत आदी साहित्यिकांच्या उपरोल्लेखित पुस्तकांचा समावेश आहे.

दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार ह्यांच्या मराठीतून लिहिलेल्या कथांचा हिंदी अनुवादही दामोदर खडसे यांनी केला आहे.

डॉ. दामोदर खडसे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अब वहॉं घोसले है (कवितासंग्रह)
  • आखिर वह एक नदी थी (कथासंग्रह)
  • इस जंगल मे (कथासंग्रह)
  • उत्तरायण (कथासंग्रह, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
  • काला सूरज (कादंबरी)
  • कोलाहल (कादंबरी, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
  • खंडित सूर्य (कादंबरी, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
  • जन्‍मांतर गाथा (कथासंग्रह)
  • जीना चाहता है समय मेरा (कवितासंग्रह)
  • निखडलेली चाकं (मूळ हिंदी कथासंग्रह, मराठी अनुवाद - विजया भुसारी)
  • पार्टनर (कथासंग्रह)
  • बादलराग (मूळ हिंदी कादंबरी, मराठी अनुवाद -चंद्रकांत भोंजाळ)
  • भगदड (कादंबरी)
  • भटकते कोलंबस (कथासंग्रह)
  • सन्‍नाटे मे रोशनी (कवितासंग्रह)

राजभाषाविषयक पुस्तके

संपादन
  • कार्यालयीन व व्‍यावहारिक हिंदी
  • बैंको मे हिंदी : विविध आयाम
  • राजभाषा प्रबंधन : संदर्भ व आयाम
  • व्‍यावहारिक अनुवाद

हिंदीत अनुवादित केलेली पुस्तके

संपादन
  • अछूत (मूळ मराठी आत्मचरित्र, बलुतं, लेखक - दया पवार)
  • अपने ही होने पर (विंदा. करंदीकर यांच्‍या कवितांचे हिंदी संकलन)
  • ऐसे लोग ऐसी बाते (मूळ मराठी लेखक शिवाजी सावंत)
  • कालचक्र (मूळ मराठी नाटक चक्र, लेखक - जयवंत दळवी)
  • पराया (मूळ मराठी आत्मचरित्र उपरा, लेखक - लक्ष्‍मण माने)
  • बिरबल साहनी (मूळ मराठी आत्मचरित्र, लेखक - साहनी)
  • भुले बिसरे दिन (मूळ्मराठी आत्मचरित्र, लेखक - अरुण खोरे)
  • रामनगरी (राम नगरकर यांचे मूळ मराठी आत्‍मचरित्र)
  • विशिष्‍ट मराठी कहानियॉं (मूळ मराठीतून, संपादन व अनुवाद)
  • संघर्ष (मूळ मराठी नाटक, लेखक - शिवाजी सावंत)
  • सवाल अपना अपना (मूळ मराठी नाटक)
  • भारत सरकारच्या रसायन व उर्वरक मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९८६-८९)
  • भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९८९-९०)
  • महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सदस्यत्व (१९९२-९५)
  • पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्यत्व (२००५)
  • भारतीय रिझर्व्ह बँकेसाठीच्या कार्यालयीन शब्दावलीचे काम (२००५)
  • भारत सरकारच्या जलवाहतूक मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (२००८)
  • भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (२०१०)

पुरस्कार आणि मानसन्मान

संपादन
  • डॉ. दामोदर खडसे यांनी सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा २०१५ सालचा पुरस्कार प्रदान झाला आहे.
  • ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे.
  • त्यांच्या ‘काला सूरज’ या कादंबरीला १९९८ साली राष्ट्रपती डॉ.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळाला.