थेलीस हा आयोनियन विचारवंत म्हणजे पहिला ग्रीक विचारवंत होय. त्याने मांडलेल्या तत्त्वज्ञानापासूनच ग्रीकांमधील तात्त्विक विचारांचा प्रारंभ झाला. त्याचा जन्म इ.स.पूर्व ६२५ मध्ये ग्रीक येथील मायलेटस् या शहरात मायलेशियन नावाच्या एका संप्रदायात झाला. मायलेशियन संप्रदायाला आयोनियन संप्रदाय असेही म्हणतात. तर मृत्यू इ.स.पूर्व ५५० मध्ये झाला.

थेलीसच्या तत्त्वज्ञानातील विचार आणि सिद्धान्त

संपादन

विश्व किंवा जग कोणत्या कारणापासून निर्माण झाले असावे ? हा फार प्राचीन काळापासून विचारवंत मानवापुढे उपस्थित झालेला प्रश्न आहे. थेलीस या ग्रीक विचारवंतपुढे सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झालेला होता. जिज्ञासा, विचारशीलता, निरीक्षण करण्याची आवड ही तीनही वैशिष्ट्ये असलेला थेलीस तारुण्यावस्थेत प्रवेश करीत असतानाच सभोवतालच्या जगासंबंधी वस्तुनिष्ठ विचार करू लागला. निसर्गात घडून येणाऱ्या निरनिराळ्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करणे, त्यांची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ती कारणे कोणती असावीत याचा सतत विचार करणे, ही एखाद्या शास्त्रज्ञाला शोभावीत अशी वैशिष्ट्ये थेलीसजवळ असल्याने, थेलीस विश्वाचे मूळ कारण कोणते असावे, या प्रश्नाचा सतत विचार करीत असे. या विचारातून त्याने आपले स्वतःचे विश्वाच्या कारणासंबंधीचे तत्त्वज्ञान विकसित केले. विश्वाला कारणीभूत होणाऱ्या मूलभूत द्रव्याची संकल्पना, हे त्याच्या तात्त्विक विचाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य समजले पाहिजे.

जसे दागिन्यांचे सर्व आकार सोन्यामध्येच विलीन होणार, गाडगी, मडकी फुटल्यानंतर त्यांचे आकार जसे मातीमध्ये विलीन होतात, त्याचप्रमाणे ह्या विश्वातील विविध पदार्थ शेवटी एकाच मूलभूत द्रव्यामध्ये विलीन होतात. विश्व ज्या मूलभूत द्रव्यापासून निर्माण होते, त्याच्या आधारावरच विश्व स्थिर राहते व शेवटी त्या मूलद्रव्यामध्येच विलीन होते. अशी विश्वाला आधारभूत असणाऱ्या मूलद्रव्याची कल्पना त्याने मांडली. एकरूप असणाऱ्या द्रव्यापासून अनेक रूपे असलेले विश्व निर्माण होते. हा थेलीसचा विश्वासंबंधीच्या तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

जगाच्या उत्पत्तीला एक मूलभूत द्रव्य कारणीभूत होत असावे, हा सिद्धान्त मांडल्यानंतर थेलीसच्या पुढे असा प्रश्न उपस्थित झाला की, त्या मूलभूत द्रव्याचे स्वरूप कोणते? कोणत्या प्रकारच्या किंवा स्वरूपाच्या मूलद्रव्यापासून विश्व निर्माण झाले असावे? या प्रश्नांचा विचार सुरू केला. आजूबाजूचे निरीक्षण केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की, पाणी ही विश्वाच्या रचनेमधील एक आवश्यक बाब आहे. कोणताही पदार्थ संघटित होणे आणि विघटित होणे, या दोन्ही गोष्टी पाण्यावर अवलंबून असतात. मातीच्या असंख्य कणांना एकत्र आणून त्यांचा गोळा बनविण्यासाठी मातीमध्ये पाणी असणे आवश्यक असते. तसेच सजीवातील प्राणी व वनस्पती या दोघांच्याही जीवनासाठी पाण्याची आवश्यकता असते. निर्जीव मातीच्या गोळ्यातील पाणी कमी होऊ लागले की, गोळ्यातील मातीचे कण एकमेकांपासून अलग होऊ लागतात व गोळ्याचे विघटन होते. तसेच पाण्याअभावी प्राणी आणि वनस्पती जगू शकत नाहीत. म्हणजेच सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या घटकांची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या तिन्ही अवस्थांना पाणीच कारणीभूत असल्याचे दिसून येईल. त्यामुळेच संपूर्ण विश्वाचे मूल कारण पाणी आहे, असे थेलीसला वाटले. पाण्यावर जशी एखादी नाव, तबकडी, बर्फाचा तुकडा तरंगावा त्याप्रमाणेच संपूर्ण विश्व किंवा जग पाण्यावर तरंगते आहे, असे थेलीसला वाटते. पाण्यापासून उत्पन्न झालेले जग पाण्यावरच स्थिर आहे व शेवटी ते पाण्यामध्येच विलीन होते, अशी कल्पना थेलीसने मांडलेली होती.

थोडक्यात मूलभूत द्रव्याची कल्पना आणि ते मूलभूत द्रव्य पाणीरूप असावे हा विचार, ही थेलीसच्या विश्वसंबंधीच्या तत्त्वज्ञानाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, असे म्हणता येईल.

संदर्भ

संपादन
  • मराठी तत्त्वज्ञान-महाकोश
  • ग्रीक फिलॉसॉफी - थेलीस ते प्लेटो

हे सुद्धा पहा

संपादन