नानासाहेब शेंडकर

(थकाराम महादू शेंडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

थकाराम महादू शेंडकर ( १ जून १९५५), नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी भारतात काही कलाविषयक प्रदर्शने तयार केली आहेत.[][][][]

नानासाहेब शेंडकर
जन्म थकाराम महादू शेंडकर
१ जून, १९५५ (1955-06-01) (वय: ६९)
लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कलाकार
प्रसिद्ध कामे सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम
धर्म हिंदू

प्रारंभिक जीवन

संपादन

शेंडकरांचा जन्म १ जून १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब १५० जणांचे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रुची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, वर्गात चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. या कलांना त्यांच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले. घरचा परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवले, मात्र त्याला कुटुंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरुण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. एसएससीनंतर (मॅट्रिक) महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळूनसुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमीजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले.[][][][]

व्यावसायिक जीवन

संपादन
 
कार्यालयामध्ये नानासाहेब शेंडकर, मुंबई, २०१९

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडित कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहिणे, दुकानांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर करणे वगैरे कामे नवीन पद्धतीने केली. त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. शेंडकर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत सुहाग पासून ते लूटमार पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले.[][][][][]

संशोधन

संपादन

शेंडकरांनी थर्मोकोलच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी इ.स. १९७५ मधे कारखाना सुरू केला. त्यात सुमारे ७० कारागीर होते. थर्माकोलचा सजावटीसाठी वापर, त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. थर्मोकोल अविघटनशील पदार्थ आहे. याची किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला जमा करून पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यामुळे उत्सवात गल्लोगल्ली हजारो ट्रक रिकामा होणारा थर्मोकोल पुढे कचऱ्याच्या ढिगाच्या स्वरूपात नदीनाल्यात जमा होतो. या समस्येचा विचार करून याला थांबविण्यासाठी शेंडकरांनी इ.स. २००१ मध्ये हा थर्मोकोलचा कारखाना बंद केला. त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखरे तयार करायला सुरुवात केली.[] त्यांनी पुठ्ठ्यांची मखरे तयार करून विक्रीसाठी आणली. इतर कोणत्याही आधाराशिवाय २१ फुटी हवामहाल त्यांनी उभा केला. पुढच्या पिढीत कला आणि संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत कार्यशाळा आणि साहित्य देऊन प्रशिक्षण दिले. त्यांच्या या कार्यात महाराष्ट्रातील, भारतातील आणि भारताबाहेरील गणेशभक्त संपर्क साधून सामील झालेले आहेत. प्रदर्शन आणि जाहिरात क्षेत्रात कस्तुरी डिस्प्लेमार्फत भारतात सर्वप्रथम १० वर्षांच्या परिश्रमांतून मॉड्युलर सायन्स सिस्टिमचा शोध लावत त्याचे उत्पादन करून देशभरात तसेच अमेरिका, दुबई, जर्मनी आणि श्रीलंका यांसारख्या विदेशांमध्ये अनेक प्रदर्शनात भाग घेतला.[] या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना डी.डी. सह्याद्री व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली बाळ ठाकरे यांच्या हस्ते झाले.[][][][][]

सार्वजनिक उत्सवात सहभाग

संपादन

गणपती उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नानासाहेबांनी १००० अब्दागिरी तयार केल्या, व त्या अनेक सार्वजनिक मंडळांना वाटून शताब्दी वर्ष साजरे केले. सिद्धिविनायक मंदिराच्या गणेशोत्सवात त्यांच्या हस्ते सजावट केली गेली, तसेच याच मंदिराच्या डिझाईन मॉडेलचे कामही त्यांनीच केले.[][][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e f "प्रदूषणाच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक सजावट". 20 ऑग, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d e "थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती". divyamarathi. 24 ऑग, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c d e Reporter, M. N. "इको फ्रेंडली 'उत्सवी' नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!". 2019-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-27 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e "VIDEO | १८ वर्षे तोटा सोसूनही अप्रतिम इकोफ्रेंडली मखरं बनवणारे नानासाहेब शेंडकर".
  5. ^ "थर्माकोल कलाकाराचाच थर्माकोलला विरोध". Maharashtra Times. 14 जुलै, 2018. 2019-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-02 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "मुंबईची कागदी मखरे अबुधाबीला". www.esakal.com.
  7. ^ a b "थर्मोकोलच्या मखरांना आता पुठ्ठ्यांच्या मखरांचा पर्याय". दैनिक सकाळ (पृष्ठ क्र. १). ९ ऑगस्ट २००१.

बाह्य दुवे

संपादन