त्रिभुज प्रदेश

नदीच्या गाळापासून तयार झालेली जागा
(त्रिभुजप्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

कृष्णा नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, उपग्रह चित्र

निर्मिती संपादन

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :

  • नदीतील गाळाचे प्रमाण
  • नदीचा मुखाजवळील वेग
  • सागराची खोली
  • त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य
  • सागरप्रवाह

नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.

 
गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशाचे उपग्रह चित्र

प्रमुख उदाहरणे संपादन

सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.