त्रिजटा (रामायण)
त्रिजटा (IAST: Trijaṭā) ही रामायणातील एक राक्षसी आहे जिला रावणाने अपहरण केलेल्या सीतेचे रक्षण करण्याचे काम दिले होते. रामायणाच्या नंतरच्या रूपांतरांमध्ये, त्रिजटा हिचे वर्णन विभीषणाची मुलगी असे केले आहे.[१]
रामायणात त्रिजटा एक बुद्धिमान वृद्ध राक्षसी म्हणून दाखवली आहे. ती रावणाचा नाश आणि रामाच्या विजयाचे स्वप्न पाहत असते, जो सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध करतो. राम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या रणांगणाच्या पाहणीत त्रिजटा सीतेसोबत जाते. जेव्हा सीतेने तिचा नवरा बेशुद्धावस्थेत पाहिला आणि त्याला मृत समजले तेव्हा त्रिजटा सीतेला रामाच्या सुरक्षिततेची खात्री देते . नंतरच्या रामायण रूपांतरांमध्ये रावणाचा भाऊ असलेल्या विभीषणाची मुलगी दाखवली आहे. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, विशेषतः आग्नेय आशियाई आवृत्तींमध्ये ती खूप मोठी भूमिका बजावते.[२]
तिला सामान्यतः सीतेची मैत्रीण आणि तिच्या संकटात एक विश्वासू सहकारी म्हणून चित्रित केले आहे. अनेक प्रसंगी ती सीतेला सांत्वन देते आणि बाहेरील जगाच्या बातम्या आणते; ती सीतेला आत्महत्या करण्यापासूनही परावृत्त करते.[३] रामाच्या विजयानंतर आणि रावणाच्या मृत्यूनंतर, त्रिजटाला सीता आणि राम यांनी भरपूर इनाम दिले.[४] काही रामायण रूपांतरांमध्ये ती रामाची भक्त असल्याचा उल्लेख आहे, तर आग्नेय आशियाई आवृत्त्यांमध्ये तिला वानर सेनापती हनुमानाची पत्नी म्हणून चित्रित केले आहे. यामध्ये तिला एक मुलगाही आहे. वाराणसी आणि उज्जैनमध्ये तिची स्थानिक देवी म्हणून पूजा केली जाते.[५]
संदर्भ
संपादन- ^ Bhaṭṭi (1973). Bhaṭṭikāvyam (इंग्रजी भाषेत). BRILL. ISBN 978-90-04-03555-3.
- ^ Nagar p. 389
- ^ Bulcke p. 111
- ^ Bulcke p. 112
- ^ Bhaskar, Dainik (25 September 2013). "हनुमानजी का सैकड़ों साल पुराना मंदिर, यहां हैं दो चमत्कारी प्रतिमाएं". 2016-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-06 रोजी पाहिले.