डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (इंग्रजी: Dr. Ambedkar National Memorial) हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण/निधन झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण भूमी किंवा महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[१] स्मारकाला सुमारे २०० कोटी रुपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.[२]
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | राष्ट्रीय स्मारक |
ठिकाण | २६ अलीपूर रोड, दिल्ली |
बांधकाम सुरुवात | २१ मार्च २०१६ |
पूर्ण | १३ एप्रिल २०१८ |
मूल्य | २०० कोटी रुपये |
क्षेत्रफळ | ७,३७४ चौरस मीटर |
मालकी | भारत सरकार |
इतिहास
संपादनइ.स. १९५१ मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६ अलीपूर रोड येथील सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यामुळे ही वास्तू 'परिनिर्वाण स्थळ' किंवा 'परिनिर्वाण भूमी' म्हणून ओळखली जाते.
या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी स्मारक लोकार्पणाच्या १२ वर्षांपूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रूपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला व वास्तुचे स्मारकात रूपांतर केले. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती व्हावी म्हणून नवीन स्मारकाचा आराखडा तयार केला गेला, २१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले.[३][४] दोन वर्षानंतर १२७व्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[५][६]
रचना व वैशिष्ट्ये
संपादन- स्मारकाचे एकूण क्षेत्र ७,३७४ चौरस मीटर असून ४,५६१.६२ चौरस मीटर जागेत बांधकाम झालेले आहे.
- सुमारे २०० कोटी रुपये खर्च या स्मारकास झाला.
- येथील इमारतीस संपूर्ण हिरवा रंग आहे.
- स्मारकाच्या प्रवेशद्वारावर 11 मीटर उंचीचे अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे आणि यांच्या मागे ध्यान केंद्र आहे.
- या स्मारकाच्या इमारतीची रचना उघडलेल्या पुस्तकासारखी आहे, आणि हे पुस्तक भारताचे संविधान आहे. ही रचना ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.
- स्मारक परिसरात प्रदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
- बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार आहे.
- या ठिकाणी बाबासाहेबांचा १२ फुट उंचीचा कांस्य धातूचा एक भव्य पुतळा, डिजीटल प्रदर्शनी, गौतम बुद्धांची ध्यानस्थ मुर्ती आहे.
- थ्री डी इफेक्ट द्वारे बाबासाहेब प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात.
- येथे ध्यान केंद्र, बोधिवृक्ष आणि संगीतमय कारंजे देखील आहेत.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण". News18 Lokmat. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस" (हिंदी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया". www.narendramodi.in. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). "इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). "इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस" (हिंदी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.