जुन्को ताबेई
जुन्को ताबेई (२२ सप्टेंबर, इ.स. १९३९:मिहारु, फुकुशिमा प्रभाग, जपान - २० ऑक्टोबर, इ.स. २०१६:कावागो, सैतामा प्रभाग, जपान) ही जपानी गिर्यारोहक होती. ताबेई माउंट एव्हरेस्ट चढून जाणारी तसेच सगळ्या सात खंडांतील सर्वोच्च शिखरे चढणारी सर्वप्रथम स्त्री होती.
लहानपण
संपादनवयाच्या १०व्या वर्षी ताबेई शाळेच्या सहलीसाठी माउंट नासूला जाउन आल्यावर तिने गिर्यारोहण करण्याची इच्छा जाहीर केली. ही दुबळी असल्याने गिर्यारोहण करण्याची ताकद हिच्यात नाही असे तिला सांगितले गेले तरीही तिने डोंगरांवर चढाई करणे सुरू केले. पैशाच्या अभावामुळे ताबेईकडे गिर्यारोहणासाठीची साधने नव्हती म्हणून तिने सुरुवातीस मोजक्याच मोहीमांमध्ये भाग घेतला.
महिला गिऱ्यारोहण क्लब
संपादन१९५८ ते १९६२ दरम्यान ताबेईने शोवा महिला विद्यापीठात इंग्लिश साहित्याचे शिक्षण घेतले. त्यावेळी तेथे गिर्यारोहणात भाग घेत असताना पुरुष गिर्यारोहकांनी तिची हेटाळणी केली. काही पुरुषांनी तिच्याबरोबर चढाई करण्यास नकार दिला तर इतरांनी ती नवरा मिळविण्यासाठी गिर्यारोहणात रस असल्याचे भासवत असल्याचे आरोप केले. याला कंटाळून ताबेईने विद्यापीठात महिला गिर्यारोहण क्लब सुरू केला. याअंतर्गत ती माउंट फुजी आणि मॅटरहॉर्न ही शिखरे चढली.
एव्हरेस्टवर चढाई
संपादन१९७०मध्ये या क्लबने एव्हरेस्टवर चढाई करण्याची मोहीम आखली. यासाठी निधी गोळा करीत असताना त्यांना बायकांनी घरी बसून मुले वाढविलेलीच बरी असे सुनावले गेले. जपानी दैनिक योमियुरी शिंबुन आणि निप्पॉन टेलिव्हिजन या कंपन्यांनी त्यांना मोठा निधी दिला व मोहीमेत भाग घेणाऱ्यांना आपली एक वर्षाची कमाईही यात घातली. पैसे वाचविण्यासाठी ताबेईच्या चमूने मोटारगाड्यांची जुन्या बैठकी कापून त्यातून जलावरोधक पिशव्या शिवल्या आणि चीनमधून हंसांची पिसे आणवून घरीच झोपायच्या पिशव्या तयार केल्या.
१९७५साली हा चमू मोहीमेसाठी काठमांडूला गेला. तेथून त्यांनी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी १९५३मध्ये त्यांच्या पहिल्या चढाईसाठी वापरलेला मार्ग अवलंबिला. ६,३०० मीटर उंचीवर असताना या मोहीमेवर मोठे हिमस्खलन झाले व बव्हंश गिऱ्यारोहक हिमाखाली गाडले गेले. ताबेई स्वतः हिमाखाली होती व सहा मिनिटे बेशुद्ध झाली. त्यांच्या शेर्पा सहाय्यकांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर १२ दिवसांनी १६ मे, १९७५ रोजी ताबेई आपल्या शेर्पा सहायक आंग त्सेरिंगसह एव्हरेस्टच्या शिखरावर पोचली.
इतर चढाया
संपादनताबईने १९९१मध्ये ॲंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट व्हिंसन सर केले व १९९२मध्ये पंकाक जया सर करून सात खंडांतील सर्वोच्च शिखरे चढणारी पहिली स्त्री ठरली.
कौटुंबिक माहिती
संपादनताबेईने मासानोबु ताबेई या जपानी गिऱ्यारोहकाशी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. २०१२मध्ये जुन्कोला कर्करोगाचे निदान झाल्यावरही तिने गिऱ्यारोहण चालूच ठेवले होते.