जानकी तेंडुलकर
जानकी मोरेश्वर तेंडुलकर यांना आक्का म्हणून ओळखले जाते. आक्कांचा जन्म इ.स. १९१२ मध्ये झाला. राजापूर तालुक्यातील पाथर्डे नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सिनकर कुळातील कन्या.
जानकी मोरेश्वर तेंडुलकर | |
---|---|
जन्म |
इ.स. १९१२ राजापूर, पाथर्डे |
मृत्यू |
१६ जुलै १९८२ |
मृत्यूचे कारण | कर्करोगाच्या आजाराने |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | आक्का |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | मॅट्रिक |
पेशा | शिक्षिका |
धर्म | हिंदू |
जोडीदार | मोरेश्वर |
वडील | पर्शराम |
नातेवाईक | मामा-दिनकर साखळकर, भगिनी-शांताताई |
व्यक्तिगत जीवन
संपादनआक्कांच्या वडिलांचे नाव पर्शराम. ते पोलीस खात्यात होते. त्यांना आठ अपत्ये होती. जानकी आक्का या सगळ्यात मोठ्या. चार इयत्तांपर्यंत शिक्षण झाले व वयाच्या १२-१४ व्या वर्षी लग्न झाले. आक्कांचे यजमान मोरेश्वर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने आक्का एकुलत्या एक मुलाला कडेवर घेऊन माहेरी आल्या. ते मूलही काळाने ओढून नेले. त्यांचे मामा दिनकर साखळकर आणि राजापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उत्तेजन देऊन त्यांना पुढे शिक्षण घेण्यास सांगितले. कन्याशाळेतून त्या सहावी म्हणजे फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एक वर्षात इंग्रजी १ ते ३ इयत्ता इंग्रजी शाळेत करून १९३७ मध्ये आक्का मॅट्रिक झाल्या.
कारकीर्द
संपादन१९३७ आक्कांनी राजापूर येथील मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ करून सर्वांना चकित केले. या उपक्रमात त्यांची मैत्री कुसुमताई वंजारे व नाना वंजारे यांच्याशी झाली व अखेरपर्यंत ती टिकली. नंतर काही दिवस या मैत्रिणी वर्धा येथे आश्रमात राहून परतल्या त्या खादीचे व्रत घेऊनच. स्वातंत्र्यासाठी आक्कांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना अटक होऊन तुरुंगवासही घडला. हिंडलग तुरुंगात त्यांनी आयुर्वेदीय औषधोपचाराचा अभ्यास केला. दोन अडीच वर्षांनी त्या तुरुंगातून सुटल्या.
सामाजिक कार्य
संपादनआक्कांनी लांजे येथे कुसुमताई वंजारे यांच्या घरी आरोग्यकेंद्र सुरू केले. आप्पासाहेब पटवर्धन हे त्यांचे गुरू. डिसेंबर १९४५ ते मे १९४६ या अवधीत सासवड तालुक्यात पिंपळ येथे प्रेमाताई कंटक यांनी स्त्रियांचा शिक्षणवर्ग सुरू केला. आक्का व कुमुदताई रेगे यांनी तेथे शिक्षण घेतले. ग्रामसेवा केंद्रे सुरू झाली. त्यातूनच ४ जून १९४६ रोजी लांजे येथे कस्तुरबा ग्राम केंद्रातर्फे आक्का व कुमुदताईंनी शिक्षण, आरोग्यसेवा प्रचारासाठी कुंभारवाड्यात व चांभारवाड्यात बालवाड्या सुरू केल्या. मुलांना विहिरीवर आंघोळी घालणे, दात स्वच्छ ठेवणे, कपडे नीटनेटके व स्वच्छ ठेवणे व इतर सवयींचे संस्कार सुरू झाले. कुंभारवाड्यात बालवाडीसाठी इमारत मिळाली. गुराख्यांच्या मुलांसाठी एक ते चार इयत्तांचा वर्ग एका गोठ्यात सुरू केला. प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी सुरू केलेल्या शिक्षण वर्गात ३५ ते ४० लोक येत. त्यांना स्वच्छतेचे धडे देण्याबरोबर किरकोळ औषधेही दिली जात. घर व अंगण कसे स्वच्छ राखावे याची प्रात्यक्षिके करून दाखविली जात. जानकी अक्कांच्या भगिनी शांताताई यांनी लांजे येथे आपली संस्था स्थलांतरित केल्यावर या दोघी भगिनी एकत्र येऊन कार्य करु लागल्या. जानकी आक्कांची सावली बनून अथक काम करून शांताताई कर्करोगाने १८ ऑगस्ट १९८१ रोजी दिवंगत झाल्या.
मृत्यू
संपादनजानकी आक्कांचा कर्करोगाच्या आजाराने १६ जुलै १९८२ रोजी मृत्यू झाला.