चौथाई व सरदेशमुखी

(चौथाई आणि सरदेशमुखी या पानावरून पुनर्निर्देशित)

चौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे.[] मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे.

इतिहास

संपादन

चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे इ.स. १५७९ ते इ.स. १७१६च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे. औरंगजेबाच्या दक्षिण भारतातील स्वारीत कैदी केल्यानंतर शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. इ.स. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क इ.स. १८०२ साली काढून घेतले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ कमल गोखले. चौथाई - सरदेशमुखी. मराठी विश्वकोश. २४ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.