चोखामेळा

हिंदू संत
(चोखा मेळा या पानावरून पुनर्निर्देशित)

संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म:1273 ; - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेली चोखामेळा यांची समाधी तथा मंदिर
संत चोखोबा

मूळ नाव चोखामेळा महार
समाधिमंदिर पंढरपूर
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरू नामदेव
भाषा मराठी
साहित्यरचना अभंग भक्ति कविता
व्यवसाय समाजजागृती
पत्नी सोयरा
अपत्ये कर्ममेळा

चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हणले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.

संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.

संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

१४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली.

चोखोबांबद्दल संत बंका, संत नामदेव आणि संत तुकाराम यांची वचने

संपादन

संत बंका (चोखोबांचे मेव्हणे), संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -
‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
(- संत बंका)

‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।’
(-संत नामदेव)

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’
-संत तुकाराम
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय.

कादंबरी

संपादन

अरुणा ढेरे यांनी चोखा मेळ्याच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिली आहे.

अन्य पुस्तके

संपादन
  • चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात)
  • वारकरी संप्रदाय (शंकर वासुदेव अभ्यंकर)
  • संत चोखामेळा (लीला पाटील)
  • श्री संत चोखामेळा चरित्र (बाळकृष्ण लळीत)
  • श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (सोयराबाई, कर्ममेळा, बंका व निर्मलाबाई यांच्या अभंगांसह) : शब्दालय प्रकाशन.
  • श्री संत चोखामेळा व परिवार चरित्र व समग्र अभंगगाथा (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)
  • संत चोखामेळा : विविध दर्शन (ॲलिनॉर झेलियट, वा.ल. मंजूळ)
  • श्री संत चोखामेळा : समग्र अभंगगाथा व चरित्र (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)

चित्रपट

संपादन
  • सुमीत कॅसेट्स नावाच्या कंपनीने ‘संत चोखामेळा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी काढली आहे. त्यातील चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले आहे.
  • फाउंटन म्युझिक कंपनीनेही संत चोखामेळा नावाची सीडी कढली आहे. तिच्यातील चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश लिमकर आहेत.
  • याच विषयावरचा पूर्ण लांबीचा मराठी कृष्णधवल चित्रपट ‘जोहार मायबाप (संत चोखामेळा)’ या नावाने सन १९५०मध्ये निघाला. राम गबाले यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कथा-पटकथा-संवाद ग.दि. माडगूळकर यांचे तर संगीत सुधीर फडके यांचे होते. हाच चित्रपट १९७३ साली ‘‘ही वाट पंढरीची” या नावानेही सेन्सॉर झाला होता. इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्ये, परशुराम भोसले, पु.ल. देशपांडे, विवेक, सुलोचना यांनी त्या चित्रपटात कामे केली होती. चित्रपटातील सुमधुर गाणी आजही लोकप्रिय आहेत.

चंदनाच्या संगेें बोरिया बाभळी
हेकळी टाकळी चंदनाची||१||

संतांचिया संगें अभाविक जन
तयाच्या दर्शनें तेचि होती||२||

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा||३||

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन