भारतीय नीलपंख

एक पक्षी
(चास या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे Indian Roller or Blue Jay (Coracias benghalensis). याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात.

भारतीय नीलपंख

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: कोरॅसिफॉर्मिस
कुळ: कोरॅसिडी
जातकुळी: Coracias
जीव: C. benghalensis
शास्त्रीय नाव
C. benghalensis
Coracias benghalensis

वर्णन

संपादन

भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो. या पक्ष्याचा आकार मोठ्या कबुतरा एवढा असतो. डोके मोठे असून याची चोच चांगलीच जाड आणि काळ्या रंगाची असते. तांबूस तपकिरी रंगाची छाती व पोट आणि शेपटीखालचा भाग फिकट निळ्या रंगाचा असतो. पंखाची आतली बाजू व टोके गडद निळ्या रंगाची असतात. उडताना गडद निळ्या रंगाचे पट्टे उठून दिसतात. डोक्याच्या वरची बाजू मंद निळ्या रंगाची असते, गळ्याभोवती व मानेभोवती निळ्या, तपकिरी पांढरट रंगाचे बारीक बारीक फराटे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात.

आढळस्थान

संपादन

भारतीय नीलपंख भारतात सर्वत्र आढळून येतो. आपल्याकडे हे पक्षी हिवाळ्यामध्ये हिमालयातून स्थलांतर करून येतात. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही याचे वास्तव्य आहे. निलकंठ हा माळरानात व विरळ जंगलात वावरणारा पक्षी आहे. दाट जंगलाबाहेर राहावयास त्यांना आवडते. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे. हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि ओडिशा या राज्यांचा राज्यपक्षी आहे.

खाद्य

संपादन

शेतीच्या विजेच्या तारांवर बसून त्यांच्या तेज नजरेने नाकतोडे, भुंगे आणि मोठाले कीटक. याशिवाय सरडे, पाली, बेडूक विंचू व अन्नधान्याचे नाश करणारे लहान उंदीर खातो. शेतामध्ये उंच जागी हा पक्षी बसून आजूबाजूस नजर ठेवून असतो. कीटकांनी थोडी जरी हाल चाल केली कि हा पक्षी त्यावर झेप घालून पकडतो. व आपल्या जागेवर येऊन बसतो, नंतर त्यास खातो. त्यांची कीटक खाण्याची क्षमता खूप असल्यामुळेच त्याला शेतकऱ्याचा मित्र मानतात. शेतकरी त्याची पूजा करतात व दसऱ्याला यांचे दर्शन शुभ मानले जाते.

क्षेत्र

संपादन

निलकंठ हा तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यांच्या राज्यपक्षी आहे. तेलंगणात यास पालपिट्टा असे संभोधले जाते. भारतीय टपाल खात्याच्या तेलंगणा विभागातर्फे दि. १४ डिसेंबर २०१८ रोजी तेलंगणा संस्कृतीवर विशेष आवारांच्या मालिकेत निलकंठ या पक्ष्यावर विशेष आवरण प्रकाशित केले आहे. या आवरणावर निलकंठची प्रतिमा व त्याची मुद्रा असलेला शिक्का तिकिटावर मारलेला आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.

चित्रदालन

संपादन

इतर भाषांतील नावे

संपादन
  • मराठी नाव : चास, नीळकंठ, नीलकंठ
  • हिंदी नाव : नीलकंठ
  • संस्कृत नाव : चाष, अपराजित
  • इंग्रजी नाव : Indian Roller
  • शास्त्रीय नाव : Coracias benghalensis

संदर्भ

संपादन
  1. ^ जॉनसिंग, ए.जे.टी. आणि झाला, वाय.व्ही. (२००८). Coracias benghalensis. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. २५-०३-२०१७ला बघितले. Database entry includes justification for why this species is of Least Concern.