चारू मजुमदार

भारतीय राजकारणी (१९१९-१९७२)
(चारू मुजुमदार या पानावरून पुनर्निर्देशित)

चारू मुजुमदार (१९१८-१९७२) भारतात नक्षलवादाचा प्रसार करणारे चारू मुजुमदार यांचा जन्म पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. मार्क्स आणि माओ यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि समाजात होणाऱ्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पर्याय त्यांनी स्वीकारला. अशा क्रांतीशिवाय वर्ग, वर्ण द्वेष संपविता येणार नाही असा त्यांना ठाम विश्वास होता.


चारू मुजुमदार यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. आपणही काही करावे असे वाटत असल्याने चारू यांनी १९४० च्या सुमरास कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत ते समाजातील वर्ग, वर्ण द्वेषांबद्दल कार्य करीत राहिले. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाले, चारू मार्क्सवादी पक्षात गेले. १९६७ साली काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, सगळीकडे त्यांची पीछेहाट सुरू झाली. त्यावेळी मुजुमदार यांना लोकशाही मार्गापेक्षा सशस्त्र उठावाला प्राधान्य द्यावे असे वाटू लागले. त्यांच्या या विचारांमुळे त्यांचे त्यांच्या पक्षाशी मतभेद होऊ लागले. तरीही १९६७ साली बंगालच्या सुमारे ६० खेड्यांचा समावेश असलेल्या नक्षलबाडी या भागात सशस्त्र उठाव चारू यांनी घडवून आणला आणि नक्षलबाडी क्षेत्र स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले.


चारू मुजुमदार यांनी घडवून आणलेला हा, उठाव ५२ दिवस चालला. तेव्हापासून चारू यांनी सशस्त्र क्रांती, हत्या, या मार्गाचा अवलंब व्हावा म्हणून अनेक लेख लिहिले, पत्रके काढून वाटली. जमीनदार, पोलीस, सरकारी अधिकारी यांना शत्रू समजून त्यांनी आपले कार्य चालविले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ bbhमाजली. या विचारसरणीवर ठाम राहूनच चारू यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट-लेनिनीस्ट या पक्षाची स्थापना १९६९ साली केली. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, पंजाब या राज्यांमध्ये चारू यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळू लागला आणि तेथेही नक्षलवादी चळ्वळ उभी राहिली.


१९७२ सालापर्यंत चारू यांनी सुरू केलेली चळवळ अपयशी ठरत गेली. १६ जुलै १९७२ला चारू यांना अटक करण्यात आली आणि २८ जुलै १९७२ला अलीपूर येथे कोठडीत असतांनाच चारू मुजुमदार यांचा मृत्यु झाला. चारू यांनी ज्या नक्षलबाडी भागात आपला उठाव केला त्या भागाच्या नावावरूनच नक्षलवाद हा शब्द रुढ झाला.