चर्चा:शोकांतिका
इतरत्र सापडलेला मजकूर
संपादनइतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) १०:२२, २२ मार्च २०२४ (IST)
शोकात्मिका हा माणसाच्या जिवनात दुःख आहे हे दाखविणारा नाट्यप्रकार आहे. नाटकातील प्रमुख पात्राचा शोकात्म अंत किंवा विनाश घडवून आणणाऱ्या गंभीर आणि महत्त्वपूर्ण कृतीचे चित्रण करणारी नाट्यात्म कृती म्हणजे शोकात्मिका असे विवेचन ऍरिस्टॉटल या तत्त्वज्ञाने त्याच्या काव्यशास्त्र या ग्रंथात केलेले आहे. इस्किलस, सोफोक्लिज आणि युरिपिडिज या ग्रीक नाटककारांनी या प्रकाराचे विपूल लेखन केले. शोकात्मिका या प्रकाराचा ठळकपणे उठून दिसणारा विशेष म्हणजे दुःखपूर्ण शेवट. हा शेवट प्रमुख पात्राच्या भीषण मृत्यूत किंवा दारुण दुःस्थितीत होतो.परंतु केवळ तसा शेवट असलेले प्रत्येक नाटक हे शोकात्मिका ठरत नाही. शोकात्मिकेत मानवाचे या विश्वाशी असलेले नाते चित्रित केलेले असते. मानव अंतिम शक्तिसमोर पराधीन आणि अगतिक असला तरी त्या शक्तीचे गूढ जाणण्याची त्याला दुर्दम्य इच्छा असते. त्यामुळे तो तिला एकतर सामोरा जातो किंवा तिचे आव्हान स्विकारतो आणि मानव विरुद्ध प्रबळ शक्ती असा संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात मानवाचा पराभव होतो, आणि त्याच्या दुःखाच्या अटळतेवर शिक्कामोर्तब होते. त्या अर्थाने शोकत्मिकांमधील घटना अपरिहार्य असतात. शोकात्मिकेतील पात्रे आपल्यावर आलेली संकटे दूर लोटायचा प्रयत्न करतात, परंतु जेवढा ते अधिकाधिक प्रयत्न करतात, तेवढे अधिकाधिक ते त्यात खेचले जातात. भव्योदात्तता हे शोकात्मिकेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शोकात्मिकेची भाषा काव्यात्म असते. नंतरच्या काळात मात्र या काव्यात्मकतेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. प्रेक्षकांवरील परिणामाच्या दृष्टीने शोकात्मिकेत करुणा आणि भय या भावनांना महत्त्व असते. या भावनांच्या उत्कट परिणामांसाठी शोकात्मिकेचा नायक आहे त्याहून मोठा रंगविण्याची प्रथा ग्रीक नाटककारांमध्ये होती. प्राचीन भारतीय नाट्यवाङ्मयामध्ये करुण रसाचा उल्लेख असला तरी शोकात्मिका मात्र नाहीत. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर विसाव्या शतकात पाश्चिमात्य देशांमध्ये शोकात्मिकांचे लेखन झालेले दिसून येते. शोकात्मिकांचे काळांनुसार तीन प्रकार पडतात. ग्रीक शोकात्मिका नियतीनिष्ट शोकात्मिका मानल्या जातात, त्यांच्यात मनुष्य आणि नियती हा संघर्ष दिसून येतो.अहंकार आणि अज्ञानामुळे मनुष्य त्याच्याहून श्रेष्ठ अशा नियतीला आव्हान देतो आणि त्यामुळे त्याचा विनाश होतो, असे ग्रीक शोकात्मिकांमध्ये रंगविलेले असते. शेक्सपिअरने लिहिलेल्या शोकात्मिका या स्वभावनिष्ट शोकात्मिका समजल्या जातात. त्यांमध्ये मनुष्याच्या स्वतःतील स्वभावदोषामुळे तो विनाशाचे कारण ठरतो. हॅम्लेटची निर्णय घेता न येण्याची क्षमता, मॅकबेथची अतिमहत्त्वाकांक्षा, लियरचे आंधळे प्रेम किंवा ऑथेल्लोच्या मनातील संशय हे त्यांचे स्वभावदोष त्यांची शोकात्मिका घडवून आणतात. गेल्या शतकात लिहिल्या गेलेल्या शोकात्मिकांना आधुनिक शोकात्मिका असे म्हटले जाते. येथे माणसाची नियती किंवा त्यांचे स्वभावदोष शोकात्मिकेचे कारण ठरत नाहीत तर आजुबाजूच्या परिस्थितीमुळे पात्रांची शोकात्मिका अपरिहार्य असते म्हणून त्यांना सामाजिक शोकात्मिका असेदेखील म्हटले जाते. ऑर्थर मिलरने लिहिलेले डेथ ऑफ अ सेल्समन किंवा मराठीमधील जयंत पवार लिखित अधांतर या आधुनिक शोकात्मिका आहेत.
अभय नातू (चर्चा) १०:२२, २२ मार्च २०२४ (IST)