इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

रोगप्रसार करणारा व्हायरस (Virus-विषाणू) इतका सूक्ष्म असतो की, तो फक्त शक्तिशाली 'इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप'खालीच दिसू शकतो. तो बॅक्टेरियापेक्षाही आकाराने खूप लहान असतो. तो सजीवही नसतो आणि निर्जीवही नसतो. तो त्यांच्या सीमारेषांवर असतो. 'प्रोटीनच्या आवरणाच्या आत काही 'जीन्स' असलेला एक अतिसूक्ष्म जंतू' ही व्हायरसची ढोबळ व्याख्या. माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर नक्की काय करायचे, याविषयीची माहिती या जीन्समध्ये असते. व्हायरसवरचे प्रोटीनचे आवरण वेगवेगळ्या आकाराचे असल्यामुळे व्हायरसदेखील विविध आकारांचे असतात. ते जसे मानवी शरीरात शिरून अपाय घडवतात, तसेच ते विविध प्रकारच्या बॅक्टेरियांमध्ये आणि वनस्पतींमध्येदेखील शिरून त्यांना उपद्रव देतात.

कुठलीही बाहेरची वस्तू किंवा सूक्ष्म जंतू शरीरात शिरले की ते शरीराचा भाग नाहीत, हे ओळखून माणसाच्या शरीरातील श्वेतपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) म्हणजेच माणसाची प्रतिकारशक्ती, त्या सूक्ष्म जंतूंबरोबर लढून त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करते. या काळात सूक्ष्म जंतूंबरोबर लढा देण्यासाठी शरीरातील श्वेतपेशींची संख्या खूप वाढते. एखाद्या सैन्याच्या फौजेने शत्रूवर हल्ला करावा, तशी या श्वेतपेशींची फौज सूक्ष्म जंतूंवर हल्ला करते. त्यासाठी श्वेतपेशी आपल्या शरीरात मोठ्या संख्येने 'अँटिबॉडीज्' तयार करून शरीरात शिरलेल्या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी त्यांचा हत्यार म्हणून उपयोग करतात. वेगवेगळ्या व्हायरससाठी श्वेतपेशी वेगवेगळ्या अँटिबॉडीज् तयार करतात. या लढाईमध्ये माणसाची प्रतिकारशक्ती वरचढ ठरली, तर सूक्ष्म जंतू नष्ट होतो; पण सूक्ष्म जंतू बलाढ्य ठरला तर तो माणसाला आजारी पाडतो.

व्हायरस हा एखाद्या बांडगुळासारखा असतो. तो स्वत:च्या 'आवृत्त्या' स्वत:च्या क्षमतेने काढू शकत नाही. त्यासाठी त्याला तशी यंत्रणा उपलब्ध व्हावी लागते. त्यामुळेच तो यजमानाच्या (होस्ट) शरीरात शिरला की, त्याच्या पेशींची स्वत:च्या 'आवृत्त्या' काढण्याची क्षमता वापरून स्वत:च्या लाखो आवृत्त्या काढतो. एकदा का इतक्या मोठ्या संख्येने व्हायरस शरीरात जमा झाले की ते माणसाच्या शरीरात धुमाकूळ घालू लागतात आणि त्याला आजारी पाडू शकतात. माणसाची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ते व्हायरस माणसाला मारूही शकतात.

व्हायरस अनेक प्रकारचे असतात. सुमारे पाच हजार किंवा त्याहूनही अधिक जातीचे व्हायरस अस्तित्वात आहेत. विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे विशिष्ट प्रकारचे आजार होतात. एड्स, कांजिण्या, चिकुनगुनिया, डेंग्यू, देवी, पोलिओ, फ्लू, सर्दी, यांसारखे आजार व्हायरसमुळेच होतात. प्रत्येक व्हायरसमुळे माणूस काही मरत नाही. उदाहरणार्थ, सर्दीचा व्हायरस शरीरात असेपर्यंत माणसाला बेजार करतो, पण सर्दीने माणूस मरत नाही. एकदा का व्हायरस त्याचे 'कार्य' उरकून शरीरातून निघून गेला की माणूस पुन्हा ठणठणीत बरा होतो. इतकी शतके उलटून गेली तरीही सर्दी बरी करण्यासाठी अजूनही कुठलेही 'अँटिव्हायरल' औषध उपलब्ध नाही.

असे अनेक व्हायरस होते आणि आहेत की त्यांचा नायनाट कसा करायचा हे, जोपर्यंत माणसाला ठाऊक नव्हते, तोपर्यंत त्यांच्या संसर्गाने माणसे मरायची. एके काळी व्हायरसमुळे होणाऱ्या 'एन्फ्लुएन्झा'सारख्या आजाराने लाखो माणसे मेली. त्यानंतर मात्र 'फ्लू' आणि 'पोलिओ' यांसारख्या काही आजारांच्या विरोधात लस निर्माण झाली. या रोगाचे सूक्ष्म जंतू मानवी शरीरात शिरण्यापूर्वी लस टोचून घेतली किंवा पोलिओचे ड्रॉप्स घेतले तर हे आजार होत नाहीत. याचे कारण, लसीमुळे माणसामध्ये विशिष्ट सूक्ष्म जंतूंबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती निर्माण होते.

काही व्हायरस मारण्यासाठी 'अँटिव्हायरल' औषधे उपलब्ध असली तरी ती संख्येने कमी आहेत. उदाहरणार्थ, 'हेपेटायटिस-सी' या आजारासाठी अँटिव्हायरल औषध उपलब्ध आहे, पण ते दुर्मीळ आहे.

व्हायरसला मारण्यासाठी अँटिबायोटिक्सचा उपयोग होत नाही.

माणसाला व्हायरसचा उपसर्ग होऊ नये म्हणून इतक्या वर्षांच्या अनुभवातून माणसाने काही व्हायरसांसाठी लस निर्माण करण्यात यश मिळवले आहे. उदाहरणार्थ, कांजिण्या, खरूज, गालगुंड, देवी, पोलिओ, फ्लू, रोटाव्हायरस, 'सर्व्हायकल कॅन्सर' हेपेटायटिस-ए आणि बी (ए आणि बी प्रकारची कावीळ), अशा व्हायरसमुळे होणाऱ्या काही आजारांसाठी माणसाने लस शोधली आहे..

व्हायरस सजीव नसल्यामुळे त्याच्यात स्वतःची प्रजनन क्षमता नसते. व्हायरस शरीरात शिरला की रिसेप्टरला चिकटतो आणि त्यातून पेशींमध्ये प्रवेश मिळवून पेशींचा ताबा घेतो. त्यानंतर पेशींची स्वत:चे विभाजन करण्याची यंत्रणा वापरून व्हायरस स्वत:च्या आवृत्त्या काढतो. या आवृत्त्या कशा काढायच्या याबद्दलच्या सूचना व्हायरसमधील जीन्समध्ये असतात. व्हायरस त्याच्या आवृत्त्या काढत असताना पेशींमधील द्रवपदार्थ वापरून टाकतो. त्यामुळे माणसाच्या शरीरातील असंख्य सजीव पेशी मरतात.

व्हायरसने स्वत:ची केलेली नवी प्रत म्हणजे त्याच्याच जातीचा जन्माला आलेला आणखी एक नवीन व्हायरस! या पद्धतीने व्हायरसची एक फौज तयार होते. एखाद्या शत्रूने दुसऱ्या राष्ट्राचं सरकार ताब्यात घेऊन आपल्या सूचनेनुसार ते चालवावे आणि त्या देशाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करावा, तशाच प्रकारचे काम या व्हायरसची फौज करते.

माणसाच्या शरीरात निर्माण झालेले असे लाखो व्हायरस शरीरातील अवयव खिळखिळे करून माणसाला आजारी पाडतात. त्यातून काही वेळा मृत्यूही ओढवतो. विशिष्ट प्रकारचा व्हायरस माणसाच्या शरीरातील विशिष्ट अवयवावरच हल्ला करतो. उदाहरणार्थ, जो व्हायरस फुफ्फुसावर हल्ला करण्यासाठी निर्माण झाला आहे तो फक्त फुफ्फुसावरच हल्ला करतो. शरीरातील आतडी, जठर, पोट, मूत्रमार्ग, मेंदू, हृदय अशा इतर अवयवांना त्याच्यापासून धोका उद्भवत नाही.

व्हायरस मारण्यासाठी प्रथम त्याच्या शरीरावर असलेले प्रोटीनचे आवरण नष्ट करावे लागते. असे औषध सापडले तर त्याचा उपयोग 'अँटिव्हायरल ड्रग'मध्ये केला जातो. एकदा का प्रोटीनचे आवरण नष्ट झाले, की तो व्हायरस मानवी शरीरातील कुठल्याही पेशीला चिकटू शकत नसल्यामुळे त्याला पेशींमध्ये शिरकाव मिळू शकत नाही, आणि म्हणूनच तो माणसाला अपाय करू शकत नाही. एखाद्या व्हायरसला 'होस्ट' मिळालाच नाही, तर तो काही काळाने स्वत:हून नष्ट होतो.

व्हायरसमध्ये असलेल्या जीन्समध्ये कालांतराने बदल होऊन (म्युटेशन) नवीन प्रकारचा व्हायरस जन्माला येतो, ही व्हायरसच्या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आहे. अश्या वेळी त्याला कसे मारायचे याचा शोध शास्त्रज्ञांना पुन्हा घेण्याची वेळ येते.

"विषाणू" पानाकडे परत चला.