चर्चा:मीरा (कृष्णभक्त)
संत मीराबाई
संपादन- सदस्य:मोहन पुजार यांचे अती मोठे लेखन मुख्य लेखात सुयोग्य सुस्थित सम्मीलनार्थ चर्चा पानावर खाली जोडले. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४७, १५ एप्रिल २०१६ (IST)
सन १४९८ साली मेडताचा राजा राव दूदाचा धाकटा सुपुत्र रतन सिंहच्या घरी मीराबाईचा जन्म झाला. त्यावेळी मेडता हे एक स्वतंत्र आणि शक्तिशाली राज्य होते. जेव्हा मीरा दोन वर्षांची झाली तेव्हा तिच्या आईचा देहान्त झाला. राव दूदा तिला मेडताला घेऊन आले. तिथे तिचे पालनपोषण झाले. राव दूदा अत्यंत दयाळू तसेच आध्यात्मिक वृत्तीचे असल्याकारणाने अनेक साधुसंतांचे त्यांच्या महालात येणेजाणे होत असे. अशाच संस्कारांमध्ये मीराबाई लहानाची मोठी झाली आणि तिचे बालमन अध्यात्माकडे झुकू लागले. तिच्या कृष्णभक्तीची सुरुवात कशी झाली त्याविषयी एक कथा सांगितली जाते. एकदा त्यांच्या राजवाड्यासमोरून एका लग्नाची वरात जात होती, त्यावेळी ५ वर्षाच्या लहानग्या मीरेला घेऊन तिची धात्री महालाच्या गच्चीवर उभी होती. अचानक मीराने धात्रीला विचारले, "धात्री मांसाहेब, माझा नवरदेव कोण आहे?" तिच्या प्रश्नाने थक्क झालेल्या धात्रीने स्वत:ला सावरले आणि ती मीरेला देवघरात घेऊन गेली. तिथे डोक्यावर मोरपिसांचा मुकुट धारण केलेला, सुहास्यवदन अशा सजलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून ती म्हणाली, "त्याला पाहिलेस ना? बघ, तोच तुझा नवरदेव आहे." बस, त्या क्षणापासून मीरेने कायमचेच भगवान श्रीकृष्णाला स्वत:चा सखा आणि पती मानले. अशा दैवी पतीची आराधना करीतच ती लहानाची मोठी झाली. तिच्या आजोबांनी (राव दूदांनी) राजघराण्याच्या परंपरेनुसार तिला वेद, पुराणे आणि अन्य शास्त्रे ह्यांचे शिक्षण देवविले होते. त्याबरोबरच, राजपूतकन्या असल्याकारणाने तिला घोडेस्वारी आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले गेले होते. जेव्हा मेवाडचा राजा संग्राम सिंहने तिच्या रूप आणि गुणांची चर्चा ऐकली तेव्हा त्याने त्याचा ज्येष्ठ पुत्र भोजराज ह्याच्या विवाहाचा प्रस्ताव राव दूदांना पाठविला. राव दूदांना अगदी हेच हवे होते. त्यानुसार १५१६ साली युवराज भोजराजसोबत मीराचा विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात झाला. जरी तिच्या सासरी सर्वजण तिच्यावर संतुष्ट होते, तरी तिच्या सासूला मात्र मीराबाईचे वागणे आवडत नसे. कारण, सासरी गेल्यावरसुद्धा मीराबाई ने आपल्या दैवी पति श्रीकृष्णाची पूजा-आराधना सोडली नव्हती आणि हीच गोष्ट तिच्या सासूला खटकत होती. तिची सासू तिला म्हणाली, "सूनबाई, आपली कुलस्वामिनी दुर्गादेवी आहे! तू नित्य तिची पूजा करावी." तेव्हा न डगमगता मीराबाई म्हणाली, "सासूबाई, मला क्षमा करा. मी स्वत:ला भगवान श्रीकृष्णाला समर्पित केले आहे. त्यामुळे त्याच्याखेरीज अन्य कोणत्याही देवदेवतेची मी पूजा करू शकत नाही." झाले. तिथूनच तिच्या सांसारिक जीवनात पहिली ठिणगी पडली आणि हळूहळू राजघरातील सर्वच मंडळी एकएक करून तिच्या विरोधात गेली. दररोज तिची घरगुती कामे झाल्यानंतर मीराबाई, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाई आणि तिथे जाऊन त्याची पूजा करून त्याच्यासमोर नृत्य आणि गायन करी. भगवान श्रीकृष्ण जागृत होऊन, मधुर बासरी वाजवीत आणि तिला मिठी मारून तिच्याशी गुजगोष्टी करीत. राणा कुंभाच्या आईला तसेच राजघराण्याच्या अन्य महिलांना मीराबाईचे हे असे वागणे मुळीच आवडत नसे, कारण त्या सर्वजणी सामान्य वृत्तीच्या असून तिच्यावर जळत असत. मीराबाईची सासू तिला रागावून वारंवार बोध करून दुर्गादेवीची पूजा करण्याची तिच्यावर सक्ती करीत. परंतु मीराबाईने सासूबाईला ठामपणे सांगितले, "मी माझे जीवन माझ्या प्राणप्रिय भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले आहे." मीराबाईची नणंद उदाबाईने एक कट रचला आणि मीराबाईला बदनाम करण्यास सुरुवात केली. तिने राणा कुंभास वर्दी दिली की मीराबाई गुप्तपणे अन्य कोण्या पुरुषाशी प्रेम करीत असून, तिने स्वत: मीराबाईला तिच्या प्रियकराशी मंदिरात बोलताना ऐकले आहे. इतकेच नव्हे तर रात्रीस जर राणा कुंभ तिच्या सोबत आल्यास ती त्याला तो पुरुषही दाखवू शकेल. राजपरिवारातील सर्वजण म्हणू लागले की अशा प्रकारच्या वागण्याने मीराबाईने चितोडच्या राणाच्या कुटुंबावर लांच्छन लावत आहे. हे ऐकताच संतापाने लालीलाल झालेल्या राणा हातात तळपती तलवार घेऊन मीराबाईच्या महालात गेला, परंतु ईश्वरेच्छेनुसार त्याच वेळी मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेली होती. त्यावेळी एका राणा कुंभाच्या एका विचारी नातेवाईकाने त्यास उपदेश केला, "राणा, घाईघाईत जर तू एखादा निर्णय घेशील तर तू होणाऱ्या परिणामांचा शेवटपर्यंत पश्चाताप करशील. मीराबाईवर केलेल्या आरोपाची पहिल्यांदा खोलवर चौकशी कर आणि मगच तुला सत्य काय ते कळेल. मीरा ही भगवंताची महान भक्त आहे. आठव, का तू तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहेस. केवळ तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची खोट्या लफड्यांची प्रकरणे शिजवून, तुला तिच्याविरुद्ध चिथावून देण्याकरिता आणि मीराबाईचा नायनाट करण्याकरिता हा घाट घातला गेला आहे. तेव्हा कुठे राणा कुंभ शांत झाला आणि त्याच्या बहिणोसोबत भर मध्यरात्री देवळात गेला. राणाने मंदिराचा दरवाजा तोडला, आत धावत गेला आणि पहातो तर मीराबाई एकटीच श्रीकृष्णाच्या मूर्तिसमोर बसून अत्यानंदात गात, बोलत होती. राणा मीराबाईला पाहून किंचाळला, "मीरा, तू ज्याच्यासोबत आता बोलत बसली होती, तो तुझा प्रियकर दाखव मला." मीराबाईने उत्तर दिले, "ते पहा, तो तिथे बसला आहे, माझा देव, त्या लोणीचोराने माझे हृदय चोरले आहे." इतके बोलून ती समाधी अवस्थेत गेली. राजघराण्यातील स्त्रियांनी अफवा पसरवली की मीराबाई साधुसंतांशी अगदी मिळूनमिसळून वागते. परंतु अशा अफवांमुळे मीराबाई मुळीच घाबरली अथवा विचलित झाली नाही, तसेच ती भगवत्भक्तांना तिच्या कृष्णभजनात सहभागी होण्याकरिता मंदिरात आमंत्रित करीत राहिली. राजघराण्यातील लोकांनी केलेल्या नाना प्रकारच्या आरोपांमुळे खचून न जाता ती अविचल राहिली. जेव्हा तिला संसार आणि कुटुंबाच्या जबाबदारीविषयी प्रश्न केले जात तेव्हा ती म्हणे की तिचा विवाह श्रीकृष्णासोबत झालेला आहे. जरी राणा कुंभाला हे सर्व पाहून अत्यंत खेद झाला असला तरी तो त्याच्या मृत्यूपर्यंत मीराबाईचा एक चांगला पती होऊन राहिला. मीराबाईच्या जीवनाबद्दलच्या एका ऐतिहासिक पुराव्यानुसार राणा कुंभाचे मीराबाईसोबत लग्न झाल्यानंतर दहा वर्षांच्या आतच तो युद्धात मारला गेला. तसेच तिच्याबद्दल अतीव सहानुभूती असणारे तिचे श्वशुरदेखील (ज्यांनी मृत्युपूर्वी मीराबाईला त्यांचा वारस घोषित केले होते) युद्धात मारले गेले. जरी मीराबाईला राजसिंहासनाची तिळभरही इच्छा नव्हती, तरीही त्या क्षणापासून मीराबाईचे सर्व नातलग तिचा छळ करू लागले. राणा कुंभाचा बंधू आणि राज्याचा उत्तराधिकारी तसेच त्याची चुलत बहीण उदाबाई हे दोघेही ह्या छळास कारणीभूत होते.
शोकमय घटना आणि वैराग्यप्राप्ती
मीरेला तिला अगदी लहान वयात वैधव्य प्राप्त झाले. तिचा पती राजा भोजराज हा १५२६ मध्ये एका युद्धात जखमी झाला आणि त्यानंतर लवकरच तो मरण पावला. तिच्याकरिता हा एक फार मोठा धक्का होता. तिचे पितादेखील बाबराशी लढता लढता १५२७ मध्ये मरण पावले होते. ह्याच युद्धात तिचे श्वशुर, राणासंग देखील जखमी झाले आणि काही अत्यंत क्रूर मंत्र्यांच्या कपटकारस्थानात त्यांना विष देऊन मारले गेले. एकामागून घडलेल्या ह्या सर्व घटनांमुळे मीरा अत्यंत व्यथित झाली होती. त्यामुळे ह्या क्षणभंगुर जीवनाला पाहून हळूहळू तिला वैराग्य येऊ लागले, त्याच बरोबर तिची भगवान श्री कृष्णावरील भक्ती प्रबळ होत गेली. तिच्याच काव्यातून आपल्याला तिच्या वैराग्याची एक झलक दिसून येते,
"कोन करे जंजाल, जग में जीवन थोरो,
जूठी रे काया ने जूठी रे माया, जूठो सब संसार ॥" (मीरा सुर सिंघावली - पृष्ठ ७७९)
अर्थ: जेव्हा मनुष्य जन्म हा क्षणभंगुर आहे तेव्हा कशाला क्लेश आणि भांडणे हवी आहेत? ह्या मनुष्य देह आणि त्यावरील ममत्व हे मिथ्या आणि भ्रामक आहे. हे जगच मुळी एक माया आहे.
संत मीराबाईच्या सद्गुरुविषयी देखील अनेक मतभेद आहेत. काही इतिहास तज्ज्ञांच्या मते संत रविदास (अथवा रोहिदास किंवा रायदास) हे तिचे सद्गुरु होते. काहींच्या मते मीराबाईला कोणीच गुरू नव्हते. परंतु हे सत्य नव्हे कारण तिनेच स्वत:च्या एका काव्यात असे लिहिले आहे,
"नहिं मैं पीहर सासरे, नहिं पियाजी री साथ।
मीरा ने गोबिंद मिल्या जी, गुरु मिलिया रैदास॥" (मीरा बृहत्पदावली भाग १, पृष्ठ २०१)
वरील दोह्यावरुन एक गोष्ट निश्चित होते आणि ती म्हणजे तिचे सद्गुरु श्री रायदास होते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे संत मीराबाईने आपले पारमार्थिक ध्येय गाठले आणि ती कृतकृत्य झाली. भगवान श्रीकृष्णावर तिने प्रेम केले आणि त्याला प्राप्त करणे हेच तिच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट झाले होते. श्रीकृष्णप्रेमाने मीराबाई वेडी झाली होती, ती म्हणते,
"खोजत फिरुं भेद वा घर को, कोई न करत बखानी॥
रैदास संत मिले मोहिं सतगुरु, दीन्हीं सुरत सुहृदानी॥
मी मिली जाय पाय पिय अपना, तब मेरी पीर बुझानी॥" (मीरा बृहत्पदावली भाग १, पृष्ठ २०७)
मीराबाईची पराकोटीची श्रीकृष्णभक्ति
मनुष्य जन्माचे सार्थक करण्याकरिता मीराबाईने भक्तिमार्गाचा अवलंब केला होता. साधना करताना अतिशय कठोर परिश्रम करून तिने आत्मज्ञान प्राप्त केले होते. तिचा आत्मा श्रीकृष्णप्रेमरसात बुडून गेला होता. त्यामुळे मीराबाईने सामाजिक परंपरा आणि नियम ह्यांची कधीच पर्वा केली नाही. तिची संत रायदासांवर अतिशय श्रद्धा आणि भक्ति होती, हे तत्कालीन कट्टर सामाजिक परंपरा आणि नियमांच्या विरुद्ध होते. साहजिकच तत्कालीन ब्राह्मणसमाज तसेच कर्मठ मंत्र्यांचा राग तिने ओढवून तर घेतलाच आणि त्यांच्या टीकेला ती बळी पडली.
मीराबाईला बाह्य जगापासून काहीही नको होते. ज्या जगात लोक केवळ शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, देवभक्तिविहीन अशा चालीरीति आणि कोरड्या कर्मकांडांवरच विश्वास ठेवतात, अशा बाह्य जगाशी तिला काहीही देणेघेणे नव्हते. भगवंताला प्राप्त करण्याची तीव्र तळमळ हीच तिच्या जीवनाचा एक आधार बनला होता. त्यामुळे तिला रात्ररात्र झोप लागत नसे तसेच तिची खाण्यापिण्यावरची तिची इच्छाच नाहीशी झालेली होती. डोळ्यात अखंड अश्रुपात होत असताना ती श्रीकृष्णाच्या चरणद्वयांवर निरंतर पडून राहात असे. पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे ती श्रीकृष्ण भेटीकरिता अविरत तळमळत असे. तिने एका ज्योतिषालादेखील तिची भगवंताशी कधी भेट होईल हे विचारले होते. त्याबद्दल ती म्हणते,
"थे कहो मने जोशी राम मिलन कब होसी||" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ ४७९)
अत्यंत दयनीय होऊन मीरा राणाला विचारते,
"भली बुरी तो मैं नहिं कीन्हीं, राणा क्यों है रिसायो।
थाने माने देह दिवी है, ज्यारौ हरि गुण गायो॥" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ २८१)
अर्थ: अहो, राणाजी तुम्ही मला का त्रास देता? मी कोणतेही पाप केले नाही. परमेश्वराची भक्ती करणे हे काही पाप नव्हे. मी त्या परमात्म्याची भक्त आहे, ज्याने हे अखील ब्रह्मांड निर्माण केले आहे. मला जात आणि कुळ ह्या गोष्टींशी काय देणेघेणे आहे? मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांची भक्त आहे.
जुन्या परंपरा आणि चालीरीतींना मीराबाईचा विरोध
परंतु राणा हा मंदबुद्धीचा होता, त्याला पारमार्थिक क्षेत्राविषयी काहीही ज्ञान नव्हते. त्याला केवळ जुन्या परंपरा आणि राजघराण्याची प्रतिष्ठा ह्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. परंतु त्याचा तिरस्कार आणि राग ह्यांना मीराबाईच्या जीवनात जागाच नव्हती. तिचे अंत:करण हे गुरु आणि प्रभु श्रीकृष्ण ह्यांच्या प्रेमाने काठोकाठ भरून गेले होते. मीराबाईला तिच्या सद्गुरुंचा सहवास तसेच त्यांचे फारसे मार्गदर्शन मिळू शकले नाही, ज्यामुळे तिला अत्यंत खेद वाटत असे. इतिहासात सद्गुरूंकडून मीराबाईला दीक्षा मिळाल्याचे कोणतेच पुरावे नाहीत. परंतु उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांची पहाणी करताच त्यातील काही गोष्टी आपल्याला नक्कीच हृदयस्पर्शी वाटतात. जेव्हा संत रविदास (किंवा रायदास) चितोडला आले, तेव्हा ते खालच्या (बहिष्कृत) जातीच्या लोकांच्या वस्तीत राहात. त्यावेळी मीराबाई तिची सर्व राजवस्त्रे तसेच दागदागिने हे टाकून देऊन अगदी साध्यासुध्या पेहेरावात त्यांची भेट घेत असे. त्यावेळी चितोडमध्ये उच्चवर्णीय लोकांचे नीचवर्णीय लोकांवर सर्वस्वी प्रभुत्व असे. परंतु मीराबाई मात्र संत रविदासांना भेटून त्यांच्या सत्संगाचा आनंद घेत असे. ती सर्वसामान्य लोकांप्रमाणे जमिनीवर बसत असे आणि रविदासांच्या पुनित चरणी मस्तक ठेवत असे. तसेच ती रविदासांच्या हातून प्रसाद स्वीकारीत असे. ज्यावेळी तिची नणंद उदाबाई मीराबाईचे मन ह्या सर्व गोष्टींपासून वळविण्याचा प्रयत्न करीत असे, त्यावेळी तिने स्वत:च लिहून ठेवलेल्या काव्यामधून ह्या सर्व घटना स्पष्ट होतात. उदाबाई मीरेला काय म्हणाली, ते मीराबाईने खाली दिलेल्या शब्दांत व्यक्त केले आहे,
"अब मीरा मन मान लीज्यो म्हारी, थाने सखियां बरजे सारी॥
राणा बरजै, राणी बरजै, बरजै सब परिवारी॥
साधन के ढिंग बैठ बैठ, लाज गमाई सारी॥
नित प्रति उठ नीच घर जावो, कुल कुं लगावो गारी॥“ (मीरा सुरसिंघावली, पृष्ठ २६४)
परंतु मीराबाई उदाबाईच्या शब्दांकडे का लक्ष देईल? कारण, तिची भगवान श्रीकृष्णावर भक्ति होती आणि सद्गुरु हेच तिचे मार्गदर्शक होते. परंतु मीराबाईने राजपरिवारातील जन तसेच उदाबाई ह्यांच्याप्रमाणे का बरे विचार करावा? राणाजी काही कमी हट्टी नव्हते. त्याने जवळ जवळ तिला घरामध्येच कैदेत ठेवले. परंतु मीराबाई ही परमात्म्याचीच एक ज्योत होती. ती भगवंताकडून निघालेली एक सुवासिक वाऱ्याची झुळूक होती, जी साऱ्या जगाला भक्तीच्या सुगंधामध्ये बुडवून टाकण्याकरिताच जन्मली होती. ती स्वत:चे दुपट्टे एकास एक बांधून, त्यांच्या साहाय्याने महालाबाहेर पडून श्रीकृष्ण भगवानाची मंदिरात भेट घेत असे. तिला तिच्या सद्गुरूंचा पुनित सहवास पुरेसा मिळत नसल्याने ती अतिशय दु:खी होत असे, कारण मी सद्गुरूंना परमात्माच समजत असे. तिच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या मेवाडमध्ये दिवसेंदिवस वाढू लागली. अशा लोकांनी अफवा पसरवली की मीराबाई वेडीपिशी झाली असून तिने सदाचार आणि सन्मार्ग सोडून दिलेला आहे. त्यापुढेही जाऊन ते असे म्हणू लागले की मीराबाई ही मेवाडच्या राजघराण्यावरील एक कलंक आहे. परंतु मीराबाई अशाही परिस्थितीत डळमळली नाही. शांत राहून तिने त्या सर्व टीकेचा भडिमार सहन केला.
मीराबाईला छळण्याकरिता केलेली अनेक कपटकारस्थाने
राणा रतन सिंगने त्याचा मामा सुरजमल ह्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या प्रयत्नांमध्ये तो स्वत:च १५३१ मध्ये मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या धाकटा भाऊ, विक्रमादित्य हा राजसिंहासनावर बसला. परंतु विक्रमादित्य देखील रतन सिंग प्रमाणे हट्टी आणि अदूरदर्शी होता. तो सुद्धा दरबारातील मंत्र्यांच्या प्रभावामुळे मीराबाईशी शत्रूप्रमाणे वागू लागला. त्याने तिला मारून टाकण्याची योजना केली होती.. त्याने त्याच्या साहाय्यकाला एक महाभयंकर अशा विषारी सापाला फुलांच्या टोपलीत घालून ती टोपली मीराबाईला भेट देण्यास सांगितले. मीराबाईने अगदी सहजरीत्या भोळेपणाने त्या टोपलीत हात घातला आणि काय आश्चर्य, त्या भयंकर सर्पाचे एका सुंदर आणि सुवासिक पुष्पहारात रूपांतर झाले होते. ही घटना तिने स्वत:च वर्णन करून सांगितली आहे,
पेट्यां बासक भेजियो, यो छे मोतीड़ा रो हार।
नाग गला में पहरियो, म्हारे महल भयो उजियार॥" (मीरा सुरसिंघावली, पृष्ठ २७९)
मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने वाचली. राणाने तिचा जीव घेण्याचा आणखी एक प्रयत्न केला. त्याने विषामध्ये बुडविलेल्या सुया मीराबाईच्या गादीच्या खाली ठेवविल्या. परंतु मीराबाई खाटेवरील गादीवर बसताक्षणीच त्या सर्व सुयांचे गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये रूपांतर झाले. भगवान श्रीकृष्ण तिचा जीव वाचविण्याकरिता सदैव तिच्या सोबत होते. आतापर्यंतच्या साधनेमुळे मीराबाईस आत्मज्ञान प्राप्त झाले होते. तिला माहिती होते की आत्मा हा चिरंतन असून अमर आहे. ती तिच्या एका पदात म्हणते,
"आज काल की मैं नहिं, राणा जद यो ब्रह्मांड छायो।
मेड़तिया घर जनम लियो है, मीरा नाम कहायो॥" (मीरा सुरसिंघावली, पृष्ठ २८१)
अर्थ : अहो राणाजी! मृत्युलोकाला मी दिलेली ही पहिलीच भेट नाही. अत्यंत प्राचीन काळापासून ह्या मर्त्यलोकाला मी भेट देत आले आहे. फक्त फरक एवढाच आहे की, ह्या जन्मी मी मेडत्यांच्या कुटुंबीयांमध्ये जन्म घेतला असून मीराबाई नाव धारण केले आहे." अशाप्रकारे, मीराबाई अत्यंत स्पष्टपणे आणि सहजरीत्या आत्म्याचे देहान्तरण विषद करून सांगते. आत्म्याच्या देहान्तरणाविषयी ती म्हणते,
"लख चौरासी रो चूड़लो, पेर्यो मैं कई वार।
ओ तो पति देही को संगी, मो पति सिरजणहार॥
जनम जनम कीया पति केता, विषयां ते नर नार।
मैं तो राची रंगलु रंगी गोविंद हरि भरतार॥" (मीरा सुरसिंघावली, पृष्ठ ४०७)
अर्थ: आतापर्यंत चौऱ्यांशी लक्ष भूतप्राण्यांचे देह मी अनेक वेळा धारण केले आहेत. विविध जन्मांमध्ये मला विविध देह धारण केलेले अनेक पती होते. परंतु, आता मला सत्य समजले आहे की, माझा खरा पती श्रीहरि आहे, जो ह्या ब्रह्मांडाचा जनिता आहे आणि त्याच्या प्रेमात मी पूर्णपणे बुडून गेले आहे.
राणाने एक अखेरचा प्रयत्न केला. ह्यावेळी मात्र त्याने अत्यंत हुशारीने एक चाल खेळली. त्याने भगवंताच्या चरणतीर्थामध्ये विष मिसळून ते त्याचा नोकर दयारामच्या हस्ते तिला पाठवून दिले. मीराबाई देवाची स्तुति गाण्यात रंगून गेली होती, परंतु तरीसुद्धा चरणतीर्थ विषमिश्रित असल्याचे तिला कळले. आणि तरीसुद्धा ती ते अत्यंत आनंदाने प्यायली. तिला काहीच झाले नाही! तिने ह्या घटनेचे वर्णन खाली दिल्याप्रमाणे केले आहे.
"पियाजी म्हारे नैणां आगे रहज्यो जी ।।
नैणां आगे रहज्यो म्हाने ।
भूल मत जाज्यो जी ।
भौ सागर में बही जात हूं,
बेग म्हारी सुध लीज्यो जी ॥१॥
राणाजी भेज्या बिखका प्याला ।
सो इमरित कर दीज्यो जी ।
मीरा के प्रभु गिरधर नागर,
मिल बिछुड़न मत कीज्यो जी ॥२॥
मीराबाईला राज्य तसेच राजवैभव ह्या गोष्टींमध्ये किंचितही रस नव्हता. अनादिकालापासून सच्चा संतांना नेहमीच त्यांच्या इष्टदेवतेची पूजा करीत राहिल्याकारणाने, कोरड्या आणि निरर्थक कर्मकांडांना न स्वीकारल्याकारणाने तसेच जाति-व्यवस्था आणि गरीब-श्रीमंत हे भेद न पाळल्याकारणाने, सामाजिक छ्ळाला तोंड द्यावे लागले आहे. मीराबाई देखील ह्याला अपवाद नव्हती. तिचे जीवनदेखील क्लेश आणि दु:ख ह्यांनी भरुन गेले होते. जणुकाही समाजाचा तिरस्कार, मंत्र्यांच्या हातून बदनामी, राणाजींच्या हातून होणारा छळ आणि अखंड दुर्दैव हे तिच्या कपाळीच लिहिले होते. परंतु ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाताना तिने कधीच तक्रार केली नाही.
मीराबाईच्या मनाचे संतुलन आणि भक्तिमार्गाबद्दलचे विचार
सतत होणाऱ्या क्लेश, अपमान, छळ ह्यांमुळे मीराबाई स्तुति आणि निंदा, मान आणि अपमान ह्या व्दंव्दांच्या पलीकडे गेली होती. तिला मानसिक समतोलपणा प्राप्त झाला होता, जेणेकरुन तिचे मन पूर्णपणे श्रीकृष्णभक्तीमध्ये रमून गेले होते. ती म्हणते,
"मना तू वृक्षन की लत लेई रे, थारो कांई करे भव डर रे॥
काटनवाला सूं बैर नहीं है, नहीं सींचन को सनेह रे।
जो कोई बावे कंकर पत्थर, तिनको भी फल देई रे॥
पवन चलावे, इन्द्र झकोले, दुख सुख आपहि सहि रे।
सीत गहाम तो सिर पर सहिहै, पंछिन को सुख देइ रे॥"
(मीरा सुरसिंघावली, पृष्ठ ७६८)
अर्थ : भक्त एखाद्या करुणामय आणि शांत वृक्षाप्रमाणे असावा. ज्याप्रमाणे वृक्ष लाकूडतोड्याचा तिरस्कार आणि माळ्यावर प्रेम करीत नाही, त्याप्रमाणे भक्तानेदेखील त्याच्या निंदकाशी वैर आणि त्याची स्तुति करणाऱ्यावर प्रेम करू नये. ज्याप्रमाणे वृक्ष त्याच्यावर दगड फेकणाऱ्यालादेखीील फळे देतो, वादळवारे तसेच पावसात देखील डगमगत नाही, त्याचप्रमाणे भक्तानेसुद्धा खंबीर असावे. ज्याप्रमाणे थंडी आणि उष्णतेचा त्रास सहन करुनही वृक्ष पक्ष्यांना आनंद देतो, त्याप्रमाणे या जगात होणारा त्रास सहन करुन भक्तानेदेखील सदैव दुसऱ्याची मदत करीत असावे.
तत्कालीन राजस्थानी समाज जुन्या परंपरा, चालीरीति आणि निरर्थक कर्मकांडे करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कर्मठ लोकांच्या प्रभुत्वाखाली होता. मीराबाईला अशा लोकांना मोक्षाचा खरा मार्ग दाखवायचा होता. म्हणून ती म्हणते,
"साधन करना चाही रे मनवा, भजन करना चाही।
प्रेम लगाना चाही रे मनवा, प्रीत करना चाही॥
नित नहान से हरि मिलें, तो मैं जल जंतु होई।
फल फूल खाय हरि मिलें, तो मैं बानर बंदर होई॥
तृण भखण से हरि मिलें, तो बहुतहि मिले अजा।
तुलसी पूजें हरि मिलें, तो मैं पूजूं तुलसी झाड़॥
पत्थर पूजें हरि मिलें, तो मैं पूजूं पहाड़॥
दूध पिए ते हरि मिलें, तो बहुत हैं भक्ति वाला।
मीरा कहे बिना प्रेम के नाहिं मिलें नन्द लाला॥"
(मीरा सुर सिंघावली, पृष्ठ ७६०)
अर्थ : भगवंताला प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्याचे भजन आणि नामस्मरण होय. त्याचे अखंड नामस्मरण हीच खरी भक्ति होय. जर केवळ पवित्र नदीमध्ये स्नान करुन भगवंत प्राप्त होत असेल तर मग पाण्यात राहणारे जीवजंतू हे मनुष्यापेक्षा महान समजले गेले पाहिजे. जर फळेमुळे खाऊन श्रीहरीला प्राप्त करता आले असते तर झाडावरची माकडे मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजली गेली असती. जर झाडाची पाने खाऊन जर भगवान श्रीकृष्ण प्राप्त होत असेल तर, शेळ्यामेंढ्या मनुष्यापेक्षा भाग्यवान समजल्या गेल्या असत्या. जर दगडाची (मूर्तीची) पूजा करून जर ईश्वर प्राप्त होत असेल तर मीरा पर्वताचे पूजन करेल. अंतर्यामी प्रेम ठेवून भगवंताची भक्ती केल्याखेरीज त्याला प्राप्त करणे अशक्य आहे. जे लोक मूर्खासारखे जुन्या चालीरीतींमध्ये आकंठ बुडालेले होते त्यांच्या दृष्टीने, तिच्या ह्या काव्यरचना खरोखरच क्रांतिकारीच म्हणल्या पाहिजेत. संत मीराबाईचा पवित्र तीर्थांमध्ये स्नान करणे तसेच तीर्थयात्रा करणे ह्या गोष्टींवर मुळीच विश्वास नव्हता. या सर्व गोष्टी संपूर्णपणे निरर्थक आहेत असे तिला वाटते. ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले त्या अगम्य परमेश्वराची भक्ती हा एकमेव मोक्षमार्ग आहे असे तिला वाटे. त्या अनंत परमात्म्याच्या दर्शनाची तिलादेखील आस आहे. ती म्हणते,
"बन जाऊं चरनन की दासी रे । दासी मैं भई उदासी।
और देव कोई न जानूं । हरि बिन भई उदासी॥
नहीं न्हाऊं गंगा नही न्हाऊं जमुना । नहीं न्हाऊं प्रयाग काशी।
मीरा कहे प्रभु गिरधर नागर । चरण कमल की प्यासी॥" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ ८१५)
मीराबाई तिच्या गुरूंच्या दर्शनासाठी तळमळत होती. ती म्हणत असे की गुरूंच्या चरणी शरण जाण्याखेरीज तिला अन्य काहीच माहिती नाही. ती म्हणे की सद्गुरूंच्या कृपेमुळे तिला कळले की ह्या बाह्य जगातील दृश्यपसारा एक क्षणभंगुर स्वप्नमात्र आहे. केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे भवसागर आटून गेला आहे. आता तिला भवसागरात बुडण्याची किंवा तरण्याची चिंताच मुळी उरली नाही. ती म्हणते,
"मोहे लागी लगन गुरु चरनन की।
चरन बिना कछुवै नहिं भावै, जग-माया सब सपनन की॥
भवसागर सब सूखि गयौ है, फिकर नहीं मोहि तरनन की॥
मीरा के प्रभु गिरधर नागर, आस वही गुरु-सरनन की॥"
(मीरा बृहत पदावली, पृष्ठ २३५)
मीराबाई म्हणते की भगवंताच्या पवित्र नावाखेरीज जीवात्म्याच्या हक्काचे असे काहीच ह्या मर्त्य जगात नसते. ती म्हणते की सद्गुरुकृपेमुळे तिला सच्चा साधुसंतांचा सत्संग करण्यात तिळमात्रही लाजलज्जा वाटत नाही. ती पुढे म्हणते की ती आता भवबंधनातून मुक्त झालेली आहे.
"अब तो मेरा राम नाम दूसरा न कोई॥
माता छोड़ी पिता छोड़े, छोड़े सगा भाई।
साधु संग बैठ बैठ लोक लाज खोई॥
संत देख दौड़ आई, जगत देख रोई।
प्रेम आंसु डार डार, अमर बेल बोई॥
मारग में तारग मिले, संत राम दोई।
संत सदा शीश राखूं, राम हृदय होई॥
अंत में से तंत काढयो, पीछे रही सोई।
राणे भेज्या विष का प्याला, पीवत मस्त होई॥
अब तो बात फैल गई, जानै सब कोई।
दास मीरा लाल गिरधर, होनी हो सो होई॥" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ ४१०)
खालील दिलेल्या रचनेमध्ये मीराबाई म्हणते की ती परमात्मा असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र नावाच्या प्रेमात पडली आहे. ती म्हणते की ज्याप्रमाणे मोत्यांमधून धागा ओवलेला असतो त्याप्रमाणे भगवान श्रीहरि तिच्या हृदयात वसत आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात वसत असतो आणि तरीही तो स्वतंत्र असतो. भगवंत सर्वांचाच आहे, ज्यांना त्याच्या नामस्मरणामध्ये प्रेम आहे; अर्थात, त्याचे नामस्मरण करणे हा त्याला प्राप्त करण्याचा सहजसोपा मार्ग आहे.
"हरि नाम से नेह लाग्यो रे, अब लाग्यो रे म्हारे ।
हरि नाम से नेह लाग्यो ।
यो रसियो म्हारे मन में बसियो । ज्यूं माला बिच तागो रे॥
सब में बसत सबहि से न्यारो । नहिं नेड़ो नहिं आगो रे॥
दासी मीरा शरण श्याम की । जीवन मरण भय भागो रे॥" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ ८७१)
मीराबाई म्हणते की, ज्या दिवशी तिला प्रभूचे दर्शन झाले, त्या दिवसापासून तिचे हृदय प्रभूच्या दिव्य रूपाने भरुन गेले आहे. ती म्हणते की, त्याच्याविना ती कशी जगू शकेल? ती म्हणते की ती केव्हापासून स्वत:च्या घराच्या दरवाज्याजवळ त्याची वाट पहात असते. अखेर ती म्हणते की, ती भगवंताच्या हातातील एक खेळणे आहे परंतु लोक मात्र तिला सन्मार्गावरून ढळली आहे असे म्हणतात.
"नैना मोरे बान पड़ी, सांईं मोहि दरस दिखाई॥
चित्त चढ़ी मेरे माधुरी मूरत, उर बिच आन अड़ी।
कैसे प्राण पिया बिन राखूं, जीवन मूल जड़ी॥
कबकी ठाढ़ी पंथ निहारुं, अपने भवन खड़ी।
मीरा गिरधर हाथ बिकानी, लोग कहै बिगड़ी॥" (मीरा बृहत पदावली, पृष्ठ १२७)
तिची आत्मचरित्रपर लिहिलेली खालील रचना पहाताच एक गोष्ट अगदी स्पष्टपणे ध्यानात येते आणि ती म्हणजे, मीराबाईने भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करण्याचा निश्चय केला होता आणि राजघराण्यातील कुटुंबीयांच्या त्रासामुळे मुळीच डगमगली नव्हती.
ह्या काव्यांमधून असेही स्पष्ट दिसून येते की ती जननिंदा तसेच घरगुती अडथळ्यांमुळे मुळीच विचलित झाली नव्हती. ती निर्भयपणे भक्तीच्या मार्गावरुन प्रगति करीत होती. ती म्हणते की सद्गुरुंनी तिचे हृदय निर्मळ केले आहे. ती म्हणते की तिला तिचा खरा पती, जो श्रीकृष्णाखेरीज अन्य कोणीही नाही, प्राप्त झाला आहे.
"राणा जी अब न रहूंगी तोरी हटकी।
साध संग मोहिं प्यारा लागै, लाज गई घूंघट की॥
पीहर मेड़ता छोड़ा अपना, सुरत निरत दोउ चटकी।
सतगुरु मुकर दिखाया घट का, नाचूंगी दे दे चुटकी॥
हार सिंगार सभी ल्यो अपना, चूड़ी करकी पटकी।
मेरा सुहाग अब मोकूं दरसा, और न जाने घटकी॥
महल किला राणा मोहिं न चाये, सारी रेसम पटकी।
हुई दिवानी मीरा डोलै, केस लटा सब छिटकी॥" (मीरा सुर सिंघावली, पृष्ठ २८०)
मीराबाईच्या गुजराती भाषेतील अपूर्व रचना
तिच्या एका कवनात ती म्हणते, "अहो सिसोदियांनो (सिसोदिया किंवा शिशोदिया किंवा सिसोद्या किंवा सिसोध्या ह्या नावाची एक राजपूत जात आहे, ज्यांचे राजस्थानातील मेवाडवर राज्य होते), तुम्ही माझे काय बिघडवाल? मी गोविंदाचे गुण गाते आहे. जर राणाला राग आल्यास तो मला कुठेतरी दूर ठेवेल, परंतु जर श्रीहरीला क्रोध येईल तर एखादी व्यक्ती कोठे जाईल? परंतु त्याचे पवित्र नामस्मरण केल्यास आपण भवसागर तरून जाऊ."
"सिसोद्यो रूठ्यो तो म्हांरो कांई कर लेसी,
म्हे तो गुण गोबिंद का गास्यां हो माई ॥१॥
राणोजी रूठ्यो बांरो देस रखासी,
हरि रूठ्यां किठे जास्यां हो माई ॥२॥
लोक लाज की काण न मानां,
निरभै निसाण घुरास्यां हो माई ॥३॥
राम नाम की झाझ चलास्यां,
भौ सागर तर जास्यां हो माई ॥४॥
मीरा सरण सांवल गिरधर की,
चरन-कंवल लपटास्यां हो माई ॥५॥
गुजराती भाषेत मीराबाईने लिहिलेल्या काही रचना वाचून राणाजीने तिचा केलेला छळ तसेच तिचे वैराग्य ह्याबद्दल पुष्कळ माहिती मिळते. ती म्हणते, "राणाजी, जरी रंगीबेरंगी असले तरीदेखील मला तुमचे हे शहर आवडत नाही. तुमच्या शहरात कोणी साधुसंतच नाहीत, तुमच्या शहरात राहणारे लोक म्हणजे जणुकाही केरकचऱ्यासारखे तुच्छ आहेत. राणाजी, माझ्या हातातील बांगड्यांसकट मी सर्वच दागदागिन्यांचा त्याग केला आहे. मी काजळ, कुंकू लावणेसुद्धा सोडले आहे, तसेच माझे केस मी मोकळे सोडले आहेत. मीराबाईचा देव फक्त गिरिधर गोपाळ आहे."
"नहिं भावै थांरो देसड़ लोजी रंगरूड़ो॥
थांरा देसा में राणा साध नहीं छै, लोग बसे सब कूड़ो।
गहणा गांठी राणा हम सब त्यागा, त्याग्यो कररो चूड़ो॥
काजल टीकी हम सब त्याग्या, त्याग्यो है बांधन जूड़ो।
मीरा के प्रभु गिरधर नागर बर पायो छै रूड़ो॥"
मीराबाईने राणांस विचारले, "तुम्ही माझ्याशी का बरे वैर धरत आहात? तुमचा महाल राजवाडा मी सोडून दिले आहेत; मी तुम्ही वसविलेले शहर सुद्धा सोडले आहे. काजळ आणि कुंकू सोडून दिल्यानंतर आता मी भगवी वस्त्रे धारण केली आहेत. मीराबाईच्या गिरिधर गोपाळाने प्राणघातक विष अमृतामध्ये बदलले आहे."
"राणाजी थे क्यां ने राखो म्हांसू बैर॥
थे तो राणाजी म्हाने इसणा लागो ज्यूं बृच्छन में कैर।
महल अटारी हम सब ताग्या, ताग्यो थांरो बसनो सहर॥
काजल टीकी राणा हम सब ताग्या भगवीं चादर पहर।
मीरा के प्रभु गिरधर नागर इमरित कर दियो जहर॥"
जेव्हा तिच्यावरील आरोप तसेच छळ ह्यांचे सत्र चालूच राहिले तेव्हा तिने संत गोस्वामी तुलसीदासांना पत्र लिहून त्यांचा सल्ला मागितला. तिने लिहिले, "केवळ नातेवाईकांकडून छळ होत आहे म्हणून मी माझ्या श्रीकृष्णाला सोडू शकत नाही. राजवाड्यात मी माझी भक्तिसाधना करू शकत नाही. बालपणापासून मी गिरिधर गोपाळाला माझा सखा मानले आहे आणि त्याच्यासोबत माझे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. ते नाते मी तोडू शकत नाही.” त्यावेळी त्यांनी तिला खालीलप्रमाणे उत्तर पाठविले होते.
"जाके प्रिय न राम सनेही।
तजिए ताहि कोटि बैरी सम यद्यपि परम सनेही॥"
अर्थ : श्रीरामासारखा उत्तम मित्र नाही. जरी एक कोटी उत्तम मित्र असले तरी प्रभु श्रीरामांकरिता त्यांचा त्याग करावा. तुलसीदास पुढे म्हणाले,, "जे राम किंवा शामची भक्तिपूजा करीत नाहीत आणि जे तुला समजून घेऊ शकत नाहीत, असे लोक जरी तुला प्रिय असतील तरी तू त्यांचा त्याग कर. भक्त प्रह्लादाने त्याच्या वडिलांचा त्याग केला, भरताने त्याच्या आईचा त्याग केला; बलीने तर त्याच्या गुरूचासुद्धा त्याग केला. कृष्णप्राप्तीकरिता व्रजमधल्या गोपिकांनी त्यांच्या पतींना सोडले आणि तसे करून त्यांच्या जीवनात आनंदीआनंदच होता. देवावरील प्रेम आणि त्याच्या जोडलेले नाते हे दोन्हीच फक्त सत्य आणि शाश्वत होत. बाकी सर्व नातीगोती ही असत्य आणि तात्पुरती होत." त्यानंतर मीराबाई पुन्हा एकदा तिचे गुरु आणि मार्गदर्शक रायदासांना भेटली. त्यांना भेटण्याकरिता त्यांच्या सत्संगाकरिता ती झोपडपट्ट्यांमध्येही जात असे. ह्यामधूनच तिला जी प्रेरणा आणि उत्तेजना प्राप्त झाली त्यावरुनच पुढे तिने लिहिलेल्या काही रचनांमध्ये तिने कुलश्रेष्ठतेबद्दल प्रश्न आणि वाद उपस्थित केले.
मीराबाईचा छळ केल्याच्या अशा अनेक घटना अजूनही आहेत. परंतु जरी मीराबाईने हे सर्व काही शांतपणे सोसले असले तरीदेखील राणाजी आणि त्याच्या सल्लागारांवर मात्र त्याचा तिळमात्रदेखील फरक पडला नाही. अखेर, तिच्या भक्तीच्या मार्गातील ह्या नित्यनूतन अडथळ्यांना कंटाळून मीराबाईने चितोड सोडले, त्याविषयीदेखील एक कथा आहे.
साधारण १५३४ मध्ये मीराबाईने चितोड सोडले. त्यानंतर १५३५ मध्ये गुजरातमधील राजा बहादुरशहाने चितोडवर हल्ला केला. या युद्धात चितोडमधील जनतेची निर्घृणपणे हत्या केली गेली, आजपर्यंत असा मनुष्यसंहार कोठेही झाला नसावा. राणा विक्रमादित्य हा राज्य सोडून पळून गेला, बहुश: त्याच्या मंत्र्यांनी त्याला पळून जाण्यास मदत केली असावी, चितोडचे राज्य राजाविना काही काळ राहिले. जिथे तिचा जन्म आणि बालपण गेले होते, त्या मेडत्याला मीराबाई पोहोचली.
तिचे चुलते (काका) वीरमदेव ह्यांचा तिला खूप आधार होता, त्यामुळे ती त्यांच्या आश्रयास आली. परंतु तिथेदेखील तिचे निंदक होतेच. संपूर्ण राजस्थान हा कर्मठ लोकांच्या आधिपत्याखाली होता, ज्यांना केवळ कोरड्या आणि निरर्थक कर्मकांडांमध्ये रस होता परंतु त्यामागचा खरा पारमार्थिक अर्थ जाणून घेण्याची त्यांची यत्किंचितही इच्छा नव्हती. तत्कालीन राजस्थानी समाजात जुन्या परंपरा आणि निरर्थक कर्मकांडांचे नुसते स्तोम माजले होते. मीराबाईने उपासतापास आणि यात्रा करणे ह्या गोष्टींवर घणाघाती टीका केली, अर्थातच कर्मठ लोकांना ते अजिबात आवडले नाही. निंदकांच्या टीकेला मीराबाईला सामोरे जाताना पाहून वीरमदेवास अतिशय दु:ख झाले. एकीकडे त्यांना मीराबाईच्या आध्यात्मिक मार्गातील धोंड होणे जितके नको होते, तितकेच दुसरीकडे दरबार्य़ातील मंत्र्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दुखविणेही नको होते. त्यांना अशा व्दिधा मन:स्थितित सापडलेले पाहून मीराबाईने कायमचेच मेडता सोडले. तिथून ती मथुरेतील वृंदावनी गेली आणि तिथे तिने अनेक साधुसंतांच्या तसेच भक्तांच्या भेटी घेतल्या. परंतु धर्माच्या नावाखाली वृंदावनातही लोक फसवाफसवी करीत असलेले पाहून मीराबाईला अतिशय दु:ख झाले. तिने वृंदावनही सोडले. इतिहासतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर ती गुजरातला गेली. असे सांगितले जाते की गुजरातला गेल्यास तिला तिचे गुरू रविदास ह्यांची भेट होण्याची आशा होती. ती प्रदीर्घ काळापर्यंत ती गुजरातमध्ये राहिली, जिथे तिने गुजराती भाषेत अमर अशी भक्तिगीते लिहिली. गुजराती साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवयित्री असा तिचा सन्मान केला जातो.
मीराबाईचे महानिर्वाण
या काळात चितोडच्या प्रशासनात बदल घडला. युद्धामध्ये अत्यंत क्रूर आणि निर्घृणपणे मनुष्यहत्या झाल्यानंतर उरल्यासुरल्या मंत्र्यांनी विक्रमादित्याला पुन्हा चितोडच्या गादीवर बसविले. चितोड राज्याचे पुनर्वसन, पुनर्निमाण आणि पुन:स्थापन सुरू झाले. परंतु पुरते एक वर्ष होत असतानाच राणा विक्रमादित्याला त्याच्या चुलत भावाने म्हणजे बनवीरने ठार केले. बनवीर हा, मीराबाईचे श्वशुर राणा संगाचे बंधु पृथ्वीराज ह्यांचा अनौरस पुत्र होता. बनवीरला राजा म्हणून १५३७मध्ये घोषित केले गेले. परंतु, १५४०मध्ये, विक्रमादित्यचा धाकटा भाऊ कुंवर उदय सिंग ह्याने बनवीरचा वध करुन चितोडची गादी मिळविली. ह्या सर्व घडामोडीं आणि गोंधळामध्येसुद्धा चितोडच्या प्रजेला मीराबाईचा थोडासुद्धा विसर पडलेला नव्हता; तिने रचलेली भक्तिगीते ते मोठ्या भक्तिभावाने म्हणत होते. असे बोलले जात होते की चितोडमध्ये एकामागून एक अश्या घडत असलेल्या दुर्दैवी घटना म्हणजे संत मीराबाईचा छळ आणि घोर अपमान ह्यांचाच परिपाक होता. चितोडच्या नागरिकांच्या मनात प्रखर अशी एक भावना उठली की सर्वांनी मिळून संत मीराबाईची अनन्य भावाने क्षमा मागून त्यांच्या हातून झालेल्या पापाचे परिमार्जन करून घ्यावे. त्यांना असे मनोमनी वाटू लागले की मीराबाईला पुन्हा एकदा चितोडला येण्याचे आमंत्रण द्यावे जेणेकरुन तिच्या आगमनाने चितोड पुन्हा एकदा संपन्न राज्य होईल. राणा उदय सिंगला प्रजेची भावना आणि एकंदरीत जनमत कळले आणि त्याने काही ब्राह्मणांना द्वारकेला जाऊन मीराबाईला आदराने घेऊन येण्यास सांगितले. त्याने त्यांना तिला न घेता रिकाम्या हाताने न येण्याचे बजाविले.
आतापर्यंतच्या साधनेचा परिणाम म्हणूनच की काय, मीराबाईने आता सर्व ऐहिक जीवन आणि ऐशोआरामाला स्वत:च्या मनाच्या हद्दपार केले होते. आता तिचा मेवाडच्या राजघराण्याशीही संबंध उरला नव्हता. संन्यासी जीवनातच आता तिला आनंद प्राप्त होत होता. तिने ब्राह्मणांसोबत चितोडला जाण्यास साफ नकार दिला. ब्राह्मणांनी तिला प्रथम कळकळीची विनंती केली आणि नंतर तिची करुणा भाकली, परंतु मीराबाई मात्र अविचल होती. त्यानंतर मात्र त्यांनी तिला सांगितले की, जर ती त्यांच्यासोबत चितोडला परतली नाही तर ते देखील जाणार नाहीत आणि आमरण उपोषण करण्यास प्रारंभ करतील. मीराबाईची द्विधा मन:स्थिति झाली. एकीकडे ती चितोडला जाऊ इच्छित नव्हती, तर दुसरीकडे आमरण उपोषण करणाऱ्या ब्रह्मवृंदांच्या मृत्यूचेदेखील ती कारण होऊ इच्छित नव्हती. अशाप्रकारे काही दिवस गेले. शेवटी तिला त्या ब्राह्मणांची दया आली. शेवटी एकेदिवशी तिने ब्रह्मवृंदांना कळविले की दुसऱ्या दिवशी पहाटे ती त्यांच्यासोबत चितोडला जाण्यास तयार आहे. आदल्या दिवशीच्या सायंकाळी ती श्रीकृष्ण मंदिरात गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मंदिराची दारे उघडली, तेव्हा मीराबाई आत नव्हती. तिचा दुपट्टा मात्र भगवान श्रीकृष्णाच्या हातावर लोंबकळत होता. जमलेल्या लोकांना समजले की, मीराबाई तिच्या अतिप्रिय भगवान श्रीकृष्णाशी एकरूप झालेली होती. मीराबाई भगवान श्रीकृष्णाशी एकरूप झाल्याची धक्कादायक वार्ता घेऊन ब्रह्मवृंद रिकाम्या हस्ते चितोडला परतले. मेवाड हळूहळू मीराबाईला विसरू लागला. मेवाडच्या इतिहासतज्ज्ञांनी त्यांच्या बखरींमध्ये मीराबाईचा उल्लेखसुद्धा केला नाही. जेव्हा मीराबाई भगवान श्रीकृष्णामध्ये १५४६ साली विलीन झाली, तेव्हा ती ४८ वर्षांची होती. जिने वयाच्या ५ व्या वर्षी भगवान श्रीकृष्णाचा पती म्हणून स्वीकार केला होता, ती त्याच्यामध्ये कायमचीच एकरूप होऊन गेली. जरी चितोड आणि राजस्थानच्या इतिहासतज्ज्ञांनी मीराबाईकडे दुर्लक्ष केले असले तरी, त्या भगवान श्रीकृष्णाची अगम्य लीला पहा! तिच्या भक्तिभावात भिजलेल्या सर्व रचना जगाच्या कानाकोपऱ्यांत प्रसिद्ध आहेत. इतकेच नव्हे तर, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासूण दक्षिणेपर्यंत, ठायीठायी लोक तिला एक श्रेष्ठ संत म्हणून तर ओळखतातच शिवाय तिच्या सर्व रचना हिरिरीने गातात.
एक गोष्ट मात्र नक्कीच सत्य आहे ती म्हणजे, मायेने भरलेले हे जग सोडण्यापूर्वी मीराबाईने मनाची शुद्धता, परिपूर्ण तशीच निरपेक्ष भक्ति आणि भगवान श्रीकृष्णचरणी संपूर्ण शरणागती ह्या गोष्टींचे परमोच्च मानदंड स्थापित केले. क्षणिक आनंद परंतु दीर्घकाल दु:ख देणाऱ्या हा जगाला टाकून मीराबाई श्रीकृष्णासोबत अखंड वैकुंठवास करण्याकरिता कायमचीच निघून गेली.
@अभय नातू: नमस्कार! या लेखाचे नाव संत मीराबाई किंवा मीराबाई असे असावे असे वाटते. ते प्रचलित आहे आणि त्यामुळे समजण्यास आणि शोधण्यास सोपे जाईल असे वाटते. आर्या जोशी (चर्चा)
- @आर्या जोशी:
- संत मीराबाई ठीक वाटते. ३ दिवसांत इतर मते नाही आल्यास हलवितो.
- अभय नातू (चर्चा) ०५:०८, १८ मार्च २०२१ (IST)
@अभय नातू: ठीक आहे. धन्यवाद.आर्या जोशी (चर्चा) ११:५३, १८ मार्च २०२१ (IST)