चर्चा:ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे

लेखकाने केलेले स्वयंविवेचन संपादन

ग्रेस हे मराठीतले एक अनवट कवी.काव्यरसिकांना त्यांच्या कविता मोह घालतात . त्यातील शब्दकळा,त्यातली लय, नादमाधुर्य भावतंही.पण कवितांमधला आशय पुर्णांशानं आकळतोच असं नाही.सामान्यतः ग्रेस यांच्या कविता दुर्बोध मानल्या जातात.

ग्रेस यांच्या कवितांविषयी आजवर जे लेखन झालं आहे [वृत्तपत्रीय समीक्षा,विशेषांक आणि सहा पुस्तके] त्यात बहुतेक करून दुर्बोधतेवरच भाष्य केलं गेलं आहे.त्यांच्या कविता आत्मलक्षी किवा आत्ममग्न असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे व समकालीन वास्तवतेशी या कवितांचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला आहे

या पार्श्वभूमीवर 'ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे' हे पुस्तक निश्चितच वेगळं ठरावं. 'मनोगता'त लेखकाने म्हटल्या प्रमाणे 'मराठी साहित्यात ‘जाणीव आणि नेणीवेच्या सीमेवर’ वावरणार्‍या या कवितांचे सखोल विश्लेषण करण्याचा हा पहिलाच साहसिक प्रयत्न आहे' ग्रेसकडे वळण्यापूर्वी 'पूर्वरंग' मध्ये ग्रेसपूर्वीचं मर्ढेकर युग आणि त्याच्या ग्रेसच्या कवितांवरील प्रभावावर विस्तृत विवेचन केलं आहे.

नंतरच्या ‘अंतरंग’ मध्ये दुर्बोधातेच्या आक्षेपाबद्दल ग्रेसने स्वतः केलेलं 'आत्ममंथन' प्रारंभी येतं. त्यानंतर ग्रेसच्या कवितेत एकसंधतेचा अभाव का भासतो यावर लेखकाने त्याचे विचार मांडले आहेत. तसेच ग्रेसच्या कवितेतली उदास संध्याकाळ, बोलका निसर्ग ,त्यांच्या काव्यातील दु:ख,भास आणि प्रतिमा यांचाही परामर्श आहे. ग्रेसची कविता ‘आत्मकेंद्रित’ आणि ‘समाजविन्मुख’ असल्याचा आरोप खोडू शकणार्‍या अनेक समाजोन्मुखी कवितांचे विवरणही लेखकाने दिले आहे.

वाचकांना ग्रेसच्या कवितांची पृष्ठभूमी पुरेशी अवगत झाल्यानंतर लेखकानं त्यांच्या विभिन्न काव्यसंग्रहातील तब्बल ९० कवितांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रेसची कविता केवळ अनुभवण्याची नसून समजून घेऊन अनुभवण्याची आहे असं लेखक म्हणतो अर्थात लेखनाचा उद्देश ग्रेसच्या कवितांचे विच्छेदन करणे नसून रसग्रहणाचा आहे.

ग्रेस म्हणतात "कोणत्याही अनुभवाच्या चक्रव्युहात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेष्कर्त्याजवळ त्या अनुभवात प्रवेश करण्याची एक प्रकारची किमान इयत्ता लागत असते आणि यालाच मी प्रवेशपत्रिका म्हणतो" लेखकाच्या मते मते भारतीय प्राचीन साहित्याचा,पौराणिक कथांचा आणि इतिहासाचा किमान अभ्यास असल्यास ग्रेसच्या साहित्यविश्वात प्रवेशपत्रिका मिळणे कठीण नाही.ग्रेसचे अध्ययन करताना त्यांची विशिष्ट शैली व कवितातले संदर्भ लक्षात ठेवणे ही आवश्यक आहें. या बाबतीत दुमत नाही की त्यांची कविता समजण्यास कठीण आहे पण ती अनाकलनीय नाही.

ग्रेसच्या कवितेबद्दल एक गैर समज असा की त्यांच्या कवितेचे बरेच अर्थ निघू शकतात. त्यांच्या कवितांचे अर्थ लावताना जर कवितेची अविवाद्य पृष्ठभूमी, साधक -बाधक घटकांचे तारतम्य तसेच संगती- विसंगतीचा तोल सांभाळला तर अभिप्रेत अर्थ एकच निघतो याची प्रचीती येईल असा लेखकाचा विश्वास आहे.

त्यांच्या सर्वच कविता समजू शकतील असा दुराभिमान ही कोणी करू शकत नाही. पण जे समजले आणि जितके समजले ते एक सर्वसमावेशक सांगोपांग पुस्तक लिहून रसिकां समोर ठेऊन मराठी साहित्य जगात ग्रेसच्या कविते बद्दल आता पर्यंत पसरलेले अनेक भ्रम लेखकाने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध Calligrapherभालचंद्र लिमये यांनी पुस्तकाची मूळ संकल्पना मुखपृष्ठास अत्यंत कलात्मक रूप देऊन साकार केली आहे.

हे पुस्तक समस्त मराठी साहित्य रसिकांस, मराठी साहित्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यास तथा समीक्षकासही उपयोगी पडेल आणि ग्रेसच्या काव्यावर केलेल्या वाङ्ममयीन संशोधन प्रक्रियेत मैलाचा दगड ठरेल.


अभय नातू (चर्चा) २१:५६, ८ नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

"ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे" पानाकडे परत चला.