ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे

ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे हे मराठी कवी ग्रेस यांच्या कवितांचे विश्लेषण करणारे पुस्तक आहे. हे श्रीनिवास हवालदार लिखित पुस्तक पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनने २०१४ मध्ये प्रकाशित केले.

पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने आपले मनोगत पुढील शब्दांत व्यक्त केले आहे : “मराठी साहित्यात ‘जाणीव आणि नेणीवेच्या सीमेवर’ वावरणाऱ्या या कवितांचे सखोल विश्लेषण करण्याचा हा पहिलाच साहसिक प्रयत्‍न आहे हे मी नमूद करू इच्छितो." या नंतर 'पूर्वरंग' या अध्यायात ग्रेसपूर्वीचे मर्ढेकर युग आणि ग्रेसच्या कवितांवर त्याच्या प्रभाव यावर विस्तृत विवेचन केले आहे. 'अंतरंग' या अध्यायात दुर्बोधतेच्या आरोपांबद्दल ग्रेसने स्वतः केलेले आत्ममंथन, ग्रेसच्या कवितेत एकसंधतेचा अभाव का आहे याबद्दलचे लेखकाचे विचार, ग्रेसच्या कवितेतली उदास संध्याकाळ आणि बोलके निसर्ग, त्यांच्या काव्यातील दुःख, त्यांच्या कविता आत्मकेंद्रित आणि समाजविन्मुख असल्याच्या आरोपाला सामर्थ्याने सामोरे जाणाऱ्या त्यांच्या अनेक समाजोन्मुखी कवितांचे विवरण यांबद्दल लिहिले आहे. लेखकाने केलेल्या विवेचनात कवीच्या कवितेतील 'भास' आणि साहित्यविश्वातील शब्द आणि प्रतिमा या विषयांचा उल्लेख आहे. रसिकांना ग्रेसच्या कवितांची पृष्ठभूमी अवगत करून दिल्यानंतर लेखक कवीच्या विभिन्न काव्यसंग्रहांतील एकूण ९० कवितांकडे वळले आहेत.

अश्या रीतीने लेखकाने आपले 'ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे' हे पुस्तक विश्लेषणात्मक, रचनात्मक आणि विवेचनात्मक करण्याचा प्रयत्‍न केला आहे.