घारापुरी लेणी
घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. ह्या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या ह्या लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस असलेल्या समुद्र किनाऱ्यापासून १० कि.मी. दूर आहेत.
इतिहास
संपादनएलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.[१]
महत्त्व आणि वैशिष्ट्ये
संपादनया बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.
भूगोल
संपादनएलिफंटा बेट, किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किमी आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे.
प्रवास
संपादनघारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.
समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय.
मुख्य गुहा
संपादनमुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. (परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.)
रावणानुग्रह
संपादनएका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.[२]
विवाह मंडल
संपादनहे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.[३]
इतर उल्लेखनीय गुफा
संपादनइतर ठिकाणी मानवती पार्वती,गंगा अवतरण ,शिवशक्ती अर्धनारी,महायोगी शिव,ल्कुलीह्साची मूर्ती,भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात.