गौरीपूजन

ज्येष्ठा गौरी पूजन

गौरीपूजन वा जेष्ठा गौरी पूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.[] गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास जेष्ठागौरीपजन असेही म्हणतात.[]

विदर्भात पूजेसाठी स्थापन केलेल्या महालक्ष्मीच्या मूर्ती

गौरी आणि ज्येष्ठा शब्दांचे अर्थ

संपादन

हिंदू परंपरेने नुसार पार्वती उमा अर्पणा अंबाबाई म्हणजे 'गौरी' संस्कृत शब्द उत्पत्ती प्रमाणे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गोरी, ( हिमालय कन् उ म्हणजे हिमालयपर्वत भागातील(पार्वती) उज्जल गौर वर्णाची गौरी ..भारतभर गौरी म्हणजे पार्वती ( शंकर पत्नी) भारतभर देवीची जी शक्तीपीठे आहेत , ती आदिशक्ती उमा पार्वतीची स्थाने आहेत .भारतीय संस्कृतीचे वर्णन ज्या दोन शब्दात केली जाते ते म्हणजे शिव शक्ती .शक्तीची विविध रूपे लोक देवता आणि शक्ती पीठे म्हणून भारतभर आहेत तिला अनेक नावे आहेत .

.[]गौरी पार्वतीचे एक नाव महालक्ष्मी आहे. गावगडयात लक्ष्मीआई म्हणून सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात हेनाव पूर्वापार वापरला जाते. लक्ष्मीआईचे वाहन नंदी आहे. गजांतलक्ष्मी हे भगवती पार्वतीच एक रूप आहे. लोकदेवता लक्ष्मीआई व व्यापारी लोकांची पनीदेवता यातून त्यासम इतर देवतांचे धार्मिक जीवनात स्थान निर्माण झाले.

ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर वर्णाची. तर ज्येष्ठा गौरीपूजन असा उल्लेख का केला जातो तर ती भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठ नक्षत्राला गौरी पूजन होते

शेतीचा शोध स्त्रीयांनीलावला .शेती संबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पावर्ती गौरी व शिव महादेवाचे मोठे योगदान आहे . शेतीच्या आधीची .रानटी अवस्था अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धन धान्यानं संपन्न कांतीमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे पार्वती गौरीनेविकसित केलेली कृषी संस्कृती. हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबांत ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात. पूर्वी ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतिक आहे.

व्रताचे स्वरूप

संपादन

भाद्रपद महिन्यात हरतालिका व्रत (पार्वतीचे महादेव प्राप्तीसाठी केलेले अपर्णाव्रत त्यानंतर गणेश आगमन[]शुद्ध पक्षात व त्यानंतर .गणेश मातेचे अनुराधा नक्षत्रावर आगमन आपापल्या कुलाचाराप्रमाणे प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात. गौरीलादवी ला भारतभर असंख्य नावे आहेत त्यापैकी गावगाड्यात तिला लक्ष्मी आई वा महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.[]

आख्यायिका आणि इतिहास

संपादन
 
गणेशोत्सव २०२३ गौरीपूजनासाठी मूर्ती

हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.[] अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.

एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.[]

आशय व महत्त्व

संपादन

महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.[]

 
तेरड्याची फुले

गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती

संपादन

स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.[] सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात.[] किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.[]


गौरी आवाहन (दिवस पहिला)

संपादन

आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.[१०]पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे.[११] या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.

 
खड्याच्या गौरी

गौरीपूजन (दिवस दुसरा)

संपादन

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.[१२]नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.[११] महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.

विसर्जन (दिवस तिसरा)

संपादन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.[११](धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.[]

दोरकाची पूजा

संपादन

या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.

प्रांतानुसार

संपादन
दक्षिण भारत-

भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.[]

कोकण

महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच भाजी भाकरीचा सुद्धा नेवैद्य दाखवला जातो. [१३]

लोकसाहित्यातील उल्लेख

संपादन
 
ज्येष्ठा गौरी व्रतातील खड्यांच्या गौरी

लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत -
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. []

लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली []

ललित साहित्यातील आणि दृक्‌श्राव्यमाध्यमातील उल्लेख

संपादन
  • गवराय आली गवराय आली

कोणत्या पावलानं ?
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या

  • रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा

आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा)

    • गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही 'घागर घुमू दे' अशा शब्दांनी होते. अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात. अशीच एक माहेरवाशीण हे गाणे गाते आहे. ती म्हणते,'पाखरा माझ्या माहेरी जा. तिथे माझी गवराबाई आली असेल तिचे स्वागत कर.'
  • रुणझुणत्या पाखरा, तू जा माझ्या माहेरा (कवी - ग.दि. माडगुळकर, संगीत - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)

हे सुद्धा पहा

संपादन

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "गौरी आगमनासाठी उद्या 'हा' आहे उत्तम मुहूर्त". ४ सप्टेंबर २०१९. ५ सप्टेंबर २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
  3. ^ "गौरी - विकिशब्दकोशः". sa.wiktionary.org (संस्कृत भाषेत). १४ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
  5. ^ Borkar, Gaurish (१७ ऑक्टोबर २०१७). Eva and Shiva: Scientific exploration of basic concepts in Indian culture and spirituality (इंग्रजी भाषेत). P & J Publications.
  6. ^ a b c d जोशी, महादेवशास्त्री (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ.
  7. ^ a b c डॉ. लोहिया, शैला. भूमी आणि स्त्री ( प्रकाशन इ.स.२०००), गोदावरी प्रकाशन.
  8. ^ लोकसत्ता ऑनलाईन (५ सप्टेंबर २०१९). "…जाणून घ्या गौरी आवाहनाची परंपरा". ५ सप्टेंबर २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ "गौरी नटली". ३१ ऑगस्ट २०१४. 2019-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी पाहिले.
  10. ^ Bari, Prachi (३ ऑगस्ट २०१७). "Traditions from all over Maharashtra merge to welcome Gauri in Pune".
  11. ^ a b c "…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा". १५ सप्टेंबर २०१८. २४ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
  12. ^ "Gauri Pujan 2021 गौराई आगमन : महालक्ष्मी व्रत पूजाविधी,वाचा". Maharashtra Times. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  13. ^ "गौरी पूजनाची प्रांतनिहाय निराळी प्रथा अन् कथा!".