गण गवळण

(गवळणी या पानावरून पुनर्निर्देशित)

तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याला 'गण' असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर 'गौळण' सादर केली जाते.

तत्त्ववेत्त्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. तो असतो गण.

गणाचे स्वरूप तात्त्विक आहे. गणातून शाहिराच्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे खरे दर्शन घडते. गणातील प्रत्येक शब्द हा लोकवाणीतून अध्यात्मवाणीकडे सहजपणे जातो आणि याच शब्ददर्शनातून पुढे तत्त्वदर्शन उभे राहते.

१९८० च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेला, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित एक गण येथे उदाहरण म्हणुन उदहृत केला आहे. [१]

हे गणराया l तव गुण गाया SS धावुनी ये मज l यश दयाया llध्रुll
रसिकांच्या पुढे मी एक पामर l कवण अर्पितो तव चरणावर l
स्मरण सरुदे l गित स्फुरुदे l भक्तिचे हे गणराया ll१ll
अजाण बालक बोल बोबडे l मान्य करावे ते वाकुडे ll
तु सुखकर्ता l तु दुःखहर्ता ll वेडा मी दर्शन घ्याया ll२ll
विद्येचा रे तुची विधाता l वंदन करीतो जाता - जाता l
मस्तकी आमुच्या l हाथ असुदे l पैलतीरावरती जाया ll ३ll

गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे.

गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने आध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील संवाद अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतात. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते. गवळण ही पारंपरिक पद्धतीने, राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते. गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते.

महाराष्ट्र सरकारने २०१८ सालच्या, तमाशा सम्राज्ञी 'विठाबाई नारायणगांवकर ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले, जेष्ठ साहित्यिक कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांनी आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे गण, गवळण व पोवाडे निर्माण केलेले आहेत.[२]१९७० ते २०२० या सर्वसाधारण पन्नास वर्षांच्या कालखंडात, विविध तमाशा फड मालक आणि सादरकर्ते यांनी, श्री मोमीन कवठेकर यांच्याकडून नावीन्यपूर्ण गण- गवळण लिहून नेल्या व आपल्या संचा द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केल्या आहेत[३]. अशाप्रकारे,तमाशा ग्रामीण जनतेच्या मनोरंजन सोबतच ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी अमूल्य योगदान देत आले आहे.

गाजलेले कलाकार

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना Archived 2020-11-08 at the Wayback Machine. "दै.सामना”, 1-March-2019
  2. ^ अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021
  3. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2011”