गजानन भास्कर मेहेंदळे

गजानन भास्कर मेहेंदळे ( १९ डिसेंबर, इ.स. १९४७) हे मराठी इतिहास अभ्यासक आहेत. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे इतिहास विषयक अभ्यास व संशोधन करतात.

गजानन भास्कर मेहेंदळे
जन्म नाव गजानन भास्कर मेहेंदळे
जन्म १९ डिसेंबर, इ.स. १९४७
शिक्षण पदव्युत्तर संरक्षण व सामरिकशास्त्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, पत्रकारिता
भाषा मराठी इंग्रजी
साहित्य प्रकार इतिहास
विषय शिवकाल, युद्धशास्त्र
प्रसिद्ध साहित्यकृती श्री राजा शिवछत्रपती
शिवछत्रपतींचे आरमार
Shivaji His Life and Times

कारकीर्द संपादन

मेहेंदळे यांनी महाविद्यालयात प्रवेश करतानाच दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचले होते.[१] मेहेंदळे यांनी संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले आहे. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी युद्धपत्रकार म्हणून काम केले आहे. तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सीमांवर जाऊन त्यांनी काम केले. त्या युद्धाचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव यावरून त्यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिले. भारतीय लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितल्यावर मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला व ते पुस्तक प्रकाशित केले नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांव एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे मार्गदर्शकवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता.[१] त्यांनतर ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागले.

पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन त्यांनी शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी, तसेच फारसी, उर्दू, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा शिकले. त्यांनी तीस वर्षे या विषयाचा अभ्यास केला[२] व त्यानंतर श्री राजा शिवछत्रपती हा मराठी ग्रंथ व Shivaji His Life and Times हा इंग्लिश ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी श्री राजा शिवछत्रपती हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखानवधापर्यंत माहिती देतो तर 'Shivaji His Life and Times' हा ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो. श्री राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथात शिवचरित्राबरोबरच इतिहासलेखन पद्धती, ऐतिहासिक साधने याविषयांवर देखील विस्तृत प्रकरणे आहेत.

त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील दहा खंडात्मक पुस्तकावर ते काम करत आहेत.[३]

पुस्तके संपादन

  • श्री राजा शिवछत्रपती खंड १,२ ( लेखक- ग.भा.मेहेंदळे | प्रकाशक- डायमंड प्रकाशन)
  • Shivaji His Life and Times ( लेखक- ग.भा.मेहेंदळे | प्रकाशक-परम मित्र पब्लिकेशन)
  • शिवछत्रपतींचे आरमार (लेखक- ग.भा.मेहेंदळे, संतोष शिंत्रे | प्रकाशक- परम मित्र पब्लिकेशन)
  • आदिलशाही फर्माने (लेखक- ग.भा.मेहेंदळे, निनाद बेडेकर, रविंद्र लोणकर | प्रकाशक- डायमंड प्रकाशन)
  • Tipu as He Really Was (लेखक- ग.भा.मेहेंदळे)[१]

पुरस्कार संपादन

  • महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार (२०१०-२०११)[४]

संदर्भ संपादन

  1. ^ a b दीक्षित, प्रशांत. "शिवराय समजून घेताना".
  2. ^ मेहेंदळे, २०११ पृ. About the Author.
  3. ^ फडणीस, नम्रता. "जे लिहितो ते 'स्वान्त सुखाय:'".
  4. ^ "जयंत पवार यांना राज्य पुरस्कार".

संदर्भसूची संपादन