गंगाखेड

परभणी जिल्ह्यातील एक तालुका
=======संपादन करा

गंगाखेड येथील दसरा महोत्सव:

डोळ्याचे पारणे फेडणारा एक

अपूर्व सोहळा!

========संपादन करा

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील इतिहास कालीन बालाजी देवस्थान हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध देवस्थान आहे.

राजवाड्याच्या शेजारी उत्तराभिमुख असलेल्या बालाजी मंदिराला जाण्यासाठी सुरूवातीला लांब व बर् याच रूंद दगडी पायर् या आहेत.पुरातन कालीन बालाजी मंदिराचे दगडी बांधकाम आजही सुस्थितीत आहे.

मंदिराच्या पायर् या चढून जाताच मंदिराचे भव्य लाकडी प्रवेशद्वार लागते.प्रवेशद्वार ओलांडून गेल्यावर एक मोठा व प्रशस्त चौरस आकाराचा सुमारे सव्वा ते दीड पुरूष उंचीचा मोठा दगडी चबुतरा लागतो.यावरच उंच गरूड खांब आहे.देवळाच्या गाभार् या समोर भव्य सभामंडप आहे.पूर्वी सभा मंडपात मोठे लाकडी खांब होते. सभामंडपाच्यावर वरच्या मजल्यास लागून व दोन्ही भिंतीच्या बाजूने लाकडी सज्जे होते.हे लाकडी सज्जे मोडकळीस आल्याने ते काढले गेले. अलिकडच्या काळात मंदिराची दुरूस्ती करण्यात येऊन प्लास्टर, फरशी व रंगकाम नव्याने करण्यात आले आहे.

गाभार् याला दोन दरवाजे आहेत.डाव्या बाजूने गाभार् यात प्रवेश करताना उजव्या बाजूस उंच दगडी ओट्यावर एकमुखी दत्ताची मूर्ती व त्याच्या खालच्या भागात आनंदराज स्वामींची मूर्ती आहे.

गाभार् यात प्रवेश करताच समोरच्या दालनात गोविंदराजाची पाषाणात कोरल्या सारखी काळ्या रंगाची भव्य अशी चित्तवेधक मूर्ती दिसते.

गोविंदराज हे बालाजीचे मोठे भाऊ असून विष्णूचा अवतार मानले जातात.पुराणातील माहिती नुसार बालाजीच्या लग्नासाठी कुबेराकडून विष्णूनी ब्रह्मदेव व शंकराच्या साक्षीने कर्ज घेतले होते.कलियुगाच्या अंतापर्यंत या कर्जाची फेड करावयाची ठरले.भक्त मंडळीनी अर्पण केलेल्या धनातून परतफेड करण्यात येत आहे अशी आख्यायिका आहे.भक्त नवस फेडण्यासाठी धन अर्पण करतात.भक्त मंडळीने अर्पित केलेले धन मोजताना गोविंदराज थकून गेले व विश्रांती घेण्यासाठी शेषनागावर निद्रिस्त झाले अशी पुराण कथा आहे.शयन स्थितीतील गोविंदराजाच्या सुबक मूर्तीचे भक्त जन दर्शन घेतात. तसेच त्यांच्या पायाचे दर्शन भिंतीत असलेल्या झरोक्यातून घेता येते.

गोविंदराज मूर्तीच्या शेजारील दालनात सहा फूट उंचीची तिरूपती तिरूमला बालाजी प्रमाणे शंख चक्रधारी चतुर्भूज मनोहारी काळ्या पाषाणात कोरल्या सारखी वालुकामय मूर्ती आहे.

हे बालाजीचे मंदिर पाचशे ते सहाशे वर्ष पुरातन असल्याचे सांगितले जाते.आख्यायिके नुसार मंदिराच्या जागी डोंगर होता. मंदिराचे कामासाठी उत्खनन करताना वराह स्वामीने आनंदराज स्वामींना तुझा निर्वंश होईल असा शाप दिला असे म्हणतात.त्यानी बालाजीचा धावा केला.बालाजीचा दृष्टांत होऊन त्यांनी उ:शाप दिला.मंदिराचे काम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आनंद स्वामींना एकमुखी दत्ताची स्थापना करून उपासना करण्यास सांगितले.त्यानुसार त्यांनी एकमुखी दत्ताची स्थापना केली.

प्राप्त माहिती नुसार या मंदिराची स्थापना आनंदराज स्वामींनी केली आहे.ते येथील पुजार् यांचे मूळ पुरूष.आनंदराज स्वामी तिरूपती बालाजीचे निस्सीम भक्त होते.दरवर्षी ते बालाजीच्या दर्शनास न चुकता जात.वृद्ध झाल्यामुळे बालाजीच्या दर्शनास त्याना जाणे शक्य होईनासे झाले. 'माझ्या दर्शनास न येता गंगेतील वाळू आणून माझी मूर्ती तयार करून प्रतिष्ठापना करावी' असा साक्षात्कार आनंदराज स्वामींना झाल्याचे सांगण्यात येते. आनंदराज स्वामींनी गंगेतील वाळू आणून प्रत्यक्ष भगवंताच्या सहाय्याने गोविंदराज व बालाजी यांच्या वालुकामय मुर्ती तयार केल्याचे कळते.त्यामुळे पाणी, दूध किंवा दही याचा अभिषेक या मूर्तीवर केला जात नाही. देव्हार् यात असलेल्या पंचधातुच्या बालाजीच्या व इतर मूर्तींचा अभिषेक केला जातो. शुक्रवार व इतर सणावारी या दोन्ही मुर्तीला विविध रंगाचे आकर्षक पोषाख करून सजवण्यात येते.बालाजीला उत्सव काळात अलंकार घालतात.या दोन्ही नयनरम्य मूर्तींचे दर्शन भक्तीभावाने घेऊन भक्त स्वतःस धन्य मानतात.

गोविंदराज व बालाजी यांच्या मूर्ती एकाच छताखाली असणारे हे एकमेव मंदिर असावे. तिरूमला बालाजी मंदिराच्या धर्तीवर स्थापन केलेले हे पुरातन बालाजी मंदिर आहे.राजेन्द्र जहागिरदारांच्या वंशजानी 19 व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे भव्य असे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.

वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मंदिराच्या गाभार् यातील डावीकडील भिंतीत लहान दगडी द्वार आहे.या द्वारातून उंच दगडी पायर् या असलेला एक अरूंद व अंधारी जिना आहे.जिना चढताना वाकून जावे लागते.जिना चढून उत्तराभिमुख लहान दरवाज्यातून वरच्या मजल्यावर जाता येते.तेथे मातीच्या पेंढा घातलेली जमीन लागते.उजवीकडे वळून आतील दालनात जाता येते.या दालनात रेणुकामातेचा भव्य असा मुखवटा(तांदळा)असलेली डोळ्यात भरणारी भव्य मुर्ती दिसते.याच दालनात डावीकडे नवसाला पावणारा गणपती आहे. रेणूकामाता ही येथील वंशजाची कुलदेवता आहे.रेणुकामातेच्या गाभार् यातून पुनश्च बाहेर पडल्यावर याच मजल्यावर समोर उजवीकडील टोकास छोटा दरवाजा दिसतो.त्यातून प्रवेश केल्यावर भुलभुलैया सारखी अर्धप्रकाशीत अरूंद व कमी उंचीची छोटी दालने लागतात. एकानंतर एक असलेल्या दालनात प्रवेश करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेस असलेल्या छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते.या दालनातून जाताना गूढरम्य अशा अर्धप्रकाशीत भुयारी मार्गाने गेल्यासारखे वाटते.अशाच एका दालनात दगडात कोरलेली अंबारी हत्तीची मूर्ती दिसते.शेवटी लहान दरवाज्यातून आत गेल्यावर बर् यापैकी प्रकाशाच्छादित असे दालन लागते.येथे बालाजीची लाकडी देवघरात स्थापित मूर्ती दिसते.या ठिकाणी हवा व प्रकाश येण्यासाठी झरोका आहे.येथे आल्यावर थोडा मोकळा श्वास घेतल्या सारखे वाटतो.याच ठिकाणी दालनात जमिनीपासून एक दोन फूट अंधातरी बसून महान साधक व तपस्वी आनंदराज स्वामीं तास,दोन तास तपश्चर्या करीत असत असे सांगण्यात येते.आनंदराज स्वामींनी तपश्चर्या केलेल्या या ठिकाणास भाविक श्रद्धेने भेट देतात.आनंदाज स्वामींच्या तपश्चर्येच्या विचाराने गूढ रोमांचकता मनात अधिक गडद होते.या भागातून बाहेर पडेपर्यंत एक प्रकारची अनामिक भीती आणि गुदमरल्यासारखी संमिश्र भावना निर्माण न झाल्यास नवल नसावे.आलेल्या मार्गानेच परत फिरून खालील गाभार् यात येऊन सभामंडपात येता येते.डावी कडील दगडी ओट्यावर एक लहान तीन ताळी भगव्या रंगातील लाकडी रथ ठेवलेला आहे.

रेणुकामातेचे बाहेरून दर्शन घेण्यासाठी गरूडखांबाच्या उत्तर भागात असलेल्या दगडी उंच पायर् या चढून गच्चीकडील भागातून जाता येते.पायर् याची चढण चढताना पूर्वी भिंतीला लागून असलेला दोरखंड पकडून चढावे लागे.आता भक्तगणासाठी रेलींगची व्यवस्था नव्याने करण्यात आली आहे.

तिरूपती बालाजीच्या धर्तीवर या मंदिरात पुजापाठ व उत्सव साजरे होतात.येथील दसरा महोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.ज्याना तिरूपती बालाजीस जाणे शक्य नाही अशी भक्त मंडळी गंगाखेडला नवरात्र दसरा महोत्सवात येतात.या काळात येथे यात्रेचे स्वरूप येते.नवरात्र सुरू होण्या आधी दोन दिवस श्रीगणेशाचे पुजन करून शुभारंभ होतो.गणेशाची पालखी मधून मिरवणूक काढून गाव प्रदक्षिणा करण्यात येते.

पूर्वीपासून गणेशाची पालखी व नवरात्र महोत्सवात बालाजीच्या लहान मूर्तीची निरनिराळ्या वाहनातून मिरवणूक काढण्याचा प्रघात आहे.पालखी व वाहन वाहून नेण्याचा मान येथील भोई समाजास आहे.त्याना मानाचा विडा देतात.या सोबत पोलिस पाटील,माली पाटील,पाटील व सर्व मानकरी मंडळीना मानाचा विडा देण्याचा प्रघात आहे.तसेच भोई,सुतार,एसकर यांच्या सह इतर बलुतेदारांनाही मानाचा विडा दिला जातो.चौधरी,शेटे,लव्हाळे, पाठक इ.घराण्यातील मानकरी मंडळीस मानाचा विडा दिल्या नंतरच दसरा महोत्सवाची सुरूवात होते.या सर्व मानकरी मंडळींचे उत्साव काळात उत्तम सहकार्य असते.

आमच्या बालपणी श्री.किसनदेव हे बालाजी मंदिराचे पुजारी होते. ते बालाजी महोत्सवाची यथासांग माहिती भक्तांना सांगत.स्वभाव थोडा रागीट वाटे पण ते शिस्तीचे भोक्ते होते.दसरा महोत्सवाची सुरूवात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून होऊन त्याची सांगता कोजागिरी पोर्णिमेस होते. हा सोहळा बालाजीच्या लग्ना प्रित्यर्थ साजरा करण्यात येतो असे सांगितले जाते.प्रतिपदेस घटस्थापना करतात.पहिल्या दिवशी ध्वज वाहनातून बालाजीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढून गाव प्रदक्षिणा केली जाते.दुसर् या दिवसापासून तिथी नक्षत्रानुसार वेगवेगळ्या वाहनातून बालाजीच्या उत्सव मुर्तीची मिरवणूक काढून गाव प्रदक्षिणा केली जाते. प्रदक्षिणेचा मार्ग ठरलेला आहे.पाणवेस,शनीमंदिर, डाॅ.आंबेडकर नगर,दिलकश टाॅकीज,मोठा मारूती,संत जनाबाई मंदिर,झोपडी मंदिर मार्गे मिरवणूक काढली जाते. दुसर् या दिवशी नाग वाहन, तिसर् या दिवशी मोर वाहन व चौथ्या दिवशी वाघ वाहनातून मिरवणूक निघते.पाचव्या दिवशी सकाळी सोंड हाल्या हत्ती वाहनातून व याच दिवशी सायंकाळी पालखीतून मिरवणूक निघते.सहाव्या दिवशी अंबारी हत्ती वाहनातून मिरवणूक काढतात.सातव्या दिवशी सकाळी सूर्यवाहन व सायंकाळी काळविट तसेच चंद्र वाहनातून बालाजीच्या उत्सव मुर्तीची मिरवणूक निघते. आठव्या दिवशी मारूती वाहन व नवव्या दिवशी गरूड वाहनातून गाव प्रदक्षिणा केली जाते. विजया दशमीला सकाळी दहा वाजता लहान सागवानी लाकडी रथात बालाजीच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.हा रथ भक्त गण दोर खंडाने मंदिराच्या आवारात ओढत गरूड खांबास परिक्रमा घालतात.गरूड खांब व धर्म पताका यांचे पुजन केले जाते.धर्म पताका गरूड खांबावर दोरीच्या सहाय्याने उभारतात. यावेळी गरूड खांबाच्या टोकाकडील भाग गोलाकार फिरतो असे म्हटले जाते.दृढ भक्ती भाव असेल तर गरूड खांब फिरल्याचे दिसते असे भक्तगण सांगतात.

दुपारी तीन वाजता मुख्य रथातून बालाजीच्या उत्सव मुर्तीची प्रतिष्ठापना करून मिरवणूक निघते.या मिरवणूकीत मोठ्या संख्येने गंगाखेडच्या पंचक्रोशीतील भाविक जन सहभागी होतात.तसेच येथे महाराष्ट्रातून अनेक भाविकही हजेरी लावतात.सुमारे एक ते दीड लाख भक्तगण रथोत्सवात सहभागी होताना दिसतात.

बालाजीचा मुख्य रथ सुमारे तीस फूट उंचीचा सागवानी रथ आहे.हा रथ चार चाकी असून तो पाच ताळी(मजली) आहे.वरच्या बाजूस अरूंद होत जाणार् या रथातील मजल्यांची रचना एखाद्या नक्षीदार कोरीव दिवाणखान्या सारखी वाटते. रथाच्या प्रत्येक ताळ्यास महिरपी सुबक नक्षीकाम काम केलेले आहे.उत्सव सुरू होण्यापूर्वी कांही दिवस अगोदर मंदिराच्या शेजारी असलेल्या रथालयातून रथ बाहेर काढून डागडुजी,रंगरंगोटी व तेलपाणी करण्यात येते.

विजयदशमीला रथाला झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सजवितात.तसेच तुळशीच्या माळा,उसाच्या मोळ्या,आंब्याच्या पानाचे तोरण लावून रथ सुशोभित केला जातो. बालाजीच्या उत्सव मूर्तीची रथाच्या वरील भागात यथासांग प्रतिष्ठापना केली जाते.रथात मंत्रोच्चाराने प्रतिष्ठापीत केलेल्या बालाजीच्या मुर्तीची रथयात्रा काढली जाते.दुपारी तीन वाजता ही यात्रा सीमोलंघन करण्यासाठी निघते.भक्तगण रथास बांधलेल्या दोरखंडास 'लक्ष्मी रमण गोविंदाच्या' जयघोषात ओढून गाव परिक्रमा करतात.रथ ओढताना सूरपाटीचा खेळही खेळला जातो.सर्वत्र जनसागर हजारोंच्या संख्येने उसळतो.रस्ते माणसानी फूलून जातात.गोविंदा, गोविंदाच्या उद् घोषाने परीसर दुमदुमतो.यावेळी अंगावर रोमहर्षक शहारे आल्याचा अनुभव येतो.सगळीकडे उत्साहाचे भक्तीमय वातावरण पहावयास दिसते.आनंदाला एक प्रकारे उधानच आल्याचे जाणवते.समाजातील सर्व स्तरातील अबालवृद्ध रथोत्सवात सामील होतात.ठिक ठिकाणी बालाजीच्या रथास थांबवून बालाजीची आरती केली जाते. झांज व वाद्याच्या गजरात मिरवणूक पुढे जात असते. गोविंदाच्या गजराने गंगाखेड नगरी दुमदुमते.दुतर्फा रस्ते व घराच्या गच्ची माणसानी फूलून जातात.रथावर फुले व बत्ताशाची उधळण होते.पाणवेस,तारू मोहल्ला,शनी मंदिर,डाॅ.आंबेडकर नगर,दिलकश चौक,मोठा मारूती,संत जनाबाई मंदिर, झोपडी मंदिर,भैरूबा मंदिर, चिंतामणी व गंगेच्या काठावरून पुनश्च बालाजी मंदिर अशी रथाची परिक्रमा सायंकाळी सात वाजे पर्यंत पूर्ण केली जाते.यानंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीची अश्व वाहनातून मिरवणूक काढतात.

या प्रसंगी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहतो.खर् या अर्थाने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते.

उत्सव पर्वात बालाजीस गंगाळ नैवेद्य दाखवला जातो.ग॓गाळ हे तांब्याचे रूंद तोंडाचे पात्र असून त्यास धरण्यास दोन्ही बाजूने कड्या असतात.पूर्वीच्या काळात गंगाळ हे पात्र स्नान करण्यासाठी देखील वापरले जाई.

बालाजीस गंगाळ पात्रात नैवेद्य दाखविला जातो.गंगाळ नैवेद्यासाठी दोन दिवस अगोदर नोंदणी करावी लागते.गंगाळ नैवेद्य खिचडी,चित्रान्न,दही भात,अनारसे, जिलेबी,मोतीचूर, दळ लाडू इ.वेगवेगळ्या प्रकारचे असत.आमच्या बालपणी या नैवेद्याच्या प्रकारानुसार 11/21/31/51 रू .दर असायचे.बालाजीस गंगाळ नैवेद्य दाखवून नंतर तो दुरडीत भरून दिला जाई.भक्त नैवेद्याचे वाटप करून उरलेला प्रसाद घरी नेत.बालाजीस खिचडी व चित्रान्नाच्या नैवेद्यास जास्त पंसती दिली जाते.आता कालानुरूप नैवेद्याचे दर वाढले आहेत.

दसरा महोत्सवात सगळीकडे छोटे मोठे व्यापारी मिठाई खेळणी,भांडी,विविध देवतांच्या मूर्ती,तुळशीच्या माळांची दुकाने थाटतात.

ग्यानुमामाची कलम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.कलम हा एक प्रकारचा पेढ्याचा प्रकार आहे. कुठलेही पेटंट नसताना या पेढ्यासारखा पेढा बनविता येत नाही हे विशेष होय.या पेढ्याचा विशेष करून बालाजीस नैवद्य दाखवितात.

साखरेच्या पाकातील साच्यातून काढलेली रंगीत खेळणी आम्हाला लहानपणी फार आवडत.घरून मिळालेल्या पैशातून आम्ही मित्रमंडळी वेगवेगळ्या प्राण्यांची विविध आकारातील लोभसवाणी साखरेची रंगीबेरंगी खेळणी विकत घेत असू.खेळणी आम्हाला फार रोमहर्षक वाटत.उत्सव काळात रात्री उशीरापर्यंत पाल ठोकलेली दुकाने दिसतात.पूर्वी गंगाखेडला विद्दुत लाईट नव्हते.व्यापारी प्रकाशासाठी चिमण्या,कंदिल, पेट्रोमॅक्स वापरीत.नवरात्रीत यात्रेचे स्वरूप असल्याने लाकडी आकाश पाळणे,मेरी गो राउंड इ.मोज मजेची साधने दिसत. अलीकडे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यास लोकांची अलोट गर्दी वाढत आहे.

अलीकडे मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोशनाईचा झगमगाट दिसतो.

कोजागिरी पोर्णिमेस गोविंदराजास पोशाख परिधान करतात.सायंकाळी मंदिराच्या आवारात दीप लावून दीपोत्सव साजरा करून उत्सवाची सांगता केली जाते.

गंगाखेडचे बालाजी मंदिर व तेथील उत्सव गंगाखेडवासीयांच्या सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे.

गंगाखेड येथील दसरा महोत्सव खर् या अर्थाने सामाजिक एकोप्याचे सर्वांग सुंदर प्रतिक आहे.

धन्य तो दसरा महोत्सव व धन्य ती गंगाखेड नगरी!

अशोक नळदुर्गकर.

🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐

========संपादन करा

भौगोलिक स्थानसंपादन करा

गंगाखेड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे. हा तालुका परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षीण काशी म्हणूनही ओळखले जाते.

गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाई पेक्षा कलम ही मिठाई जास्त पसंद करतात. गंगाखेड मध्ये सोमवार बाजार भरतो, या आठवडी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. तसेच तालुक्यातील बहुतांश गावातील लोक आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाले आहे.

तालुक्यातील गावेसंपादन करा

अकोली आनंदनगर (गंगाखेड) आनंदवाडी (गंगाखेड) अंतरवेली अरबुजवाडी बडवणी बनपिंपळा बेलवाडी भांबरवाडी भेंडेवाडी बोर्डा बोथी बोथीतांडा ब्रह्मनाथवाडी चिलगरवाडी चिंचटाकळी दगडवाडी (गंगाखेड) दामपूरी देवकतवाडी धनगरमोहा धारासुर धारखेड ढवळकेवाडी ढेबेवाडी (गंगाखेड) डोंगरगाव शेळगाव डोंगरजवळा डोंगरपिंपळा दुसलगाव गंगाखेड गौळवाडी (गंगाखेड) गौंडगाव घटांग्रा घटांग्रातांडा गोदावरी तांडा गोपा गुंजेगाव (गंगाखेड) हनुमाननगर (गंगाखेड) हरंगुळ इलेगाव इरळद इसाद जवळारुमना कड्याचीवाडी कांगणेवाडी कासारवाडी (गंगाखेड) कातकरवाडी कौडगाव (गंगाखेड) खादगाव खळी खंडाळी (गंगाखेड) खोकलेवाडी कोद्री कुंडगीरवाडी लिंबेवाडी लिंबेवाडी तांडामहातपुरी मैराळसावंगी माखणी मालेवाडी (गंगाखेड) मानकादेवी मरगळवाडी मरडसगाव मरगळ वाडीमसला मसनेरवाडी मुळी नागठाणा (गंगाखेड) नरळद निळानाईकतांडा पडेगाव पांधरगाव पांगरी (गंगाखेड) फुगनारवाडी पिंपळदरी पिंपरीझोला पोखर्णीवाळके पोटा राणीसावरगांव रुमनाजवळा सांगळेवाडी सायळासुनेगाव शंकरवाडी शेलमोहा शेंडगा शिवाजीनगर (गंगाखेड) सीरसम शेगाव सुणेगावसयाला सुप्पा(जागीर) सुप्पा(खालसा) सुप्पातांडा सुरळवाडी टाकळवाडी तांदुळवाडी (गंगाखेड) टोकवाडी उखळी खुर्द उमलानाईकतांडा उंबरवाडी (गंगाखेड) उंडेगाव विठ्ठलवाडी (गंगाखेड) वाघलगावगोपा वागदरा (गंगाखेड) वागदरातांडा वागदरी (गंगाखेड) वरवंटी झोला

हवामानसंपादन करा

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवनसंपादन करा

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

नागरी सुविधासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate