खिलाफत (अरबी: خلافة إسلامية ; तुर्की: Hilafet) ही इस्लाम धर्मातील सर्वांत पहिल्या राजकीय-धार्मिक शासनव्यवस्थेस उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. "प्रेषिताचा वारास" असा अर्थ असणाऱ्या खलीफा या शब्दापासून खिलाफत ही संज्ञा उपजली आहे. या शासनव्यवस्थेत खलीफा व त्याला साहाय्य करणारे अन्य अधिकारी जगभरातील इस्लामधर्मीयांचे प्रतिनिधी मानले जातात व ते शरिया या इस्लामी धार्मिक व राज्यशासनविषयक कायदेप्रणालीनुसार राज्यसत्ता सांभाळतात. सैद्धान्तिक व्याख्येनुसार हिला "सामंतिक-राज्यघटनाधारित (मदीनेच्या राज्यघटनेनुसार चालणारे) प्रजासत्ताक"[श १] प्रकारची राज्यव्यवस्था मानले जाते [१].

प्रेषित मोहम्मदाने घालून दिलेल्या राजकीय व धार्मिक व्यवस्थेचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मोहम्मदाच्या अनुयायांनी ही व्यवस्था अनुसरली, तीमधून खिलाफत राज्यव्यवस्था आकाराला आली. हे सुरुवातीचे खलिफे राशिदून म्हणून ओळखले जातात. सुन्नी इस्लामानुसार मुस्लिमांच्या शूरेने - म्हणजे सहमतीने - खलीफ्याची निवड होते; तर शिया इस्लामानुसार मोहम्मदाच्या निष्कलंक रक्ताचा वारस (म्हणजे वंशज) असलेला व ईश्वराने निवडलेला इमामच खलीफा होऊ शकतो. राशिदून कालखंडानंतर आधुनिक काळापर्यंत (इ.स. १९२४ सालापर्यंत) खिलाफतींचे नेतृत्व घराण्यांतूनच चालत राहिले. किंबहुना क्वचित्काळी एकाच वेळी दोन खलीफे असण्याचे प्रसंग उद्भवले आहेत. राशिदुनांनंतर उमय्या वंशाने खिलाफत चालवली. त्यानंतर अब्बासी, फातिमी व अखेरीस ओस्मानी, या वंशांनी खिलाफती चालवल्या.

पारिभाषिक शब्दसूची संपादन

  1. ^ सामंतिक-राज्यघटनाधारित प्रजासत्ताक (इंग्लिश: Aristocratic-constituitional republic, ॲरिस्टोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशनल रिपब्लिक): संमत राज्यघटनेवर आधारलेले, सामंतवादी परंपरेने चालणारे प्रजासत्ताक.

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ लेकर, मायकेल. द 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ मदीना': मुहम्मद्स फर्स्ट लीगल डॉक्यूमेंट (इंग्लिश भाषेत). pp. २५१-२५३. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन