कृष्णाजी नारायण आठल्ये
कृष्णाजी नारायण आठल्ये (३ जानेवारी, इ.स. १८५३:टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - २९ नोव्हेंबर, इ.स. १९२६:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक होते.
शिक्षण
संपादनकृष्णाजी आठल्ये यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील एक व्युत्पन्न वैदिक पंडित असल्याने त्यांनी कृष्णाजींनी वैदिक वाङ्मयाच्या शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले.
नोकरी
संपादनकृष्णाजी नारायण आठल्ये यांनी सातारा जिल्ह्यात पाच वर्षे शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर चित्रक्ला शिकण्यासाठी ते मुंबईत आले. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्णाजी बडोद्याला गेले. तेथे त्यांची भेट बडोद्याचे दिवाण टी. माधवराव यांच्याशी झाली. त्यांच्या आग्रहामुळे ते मद्रासला गेले. माधवरावांचे बंधू कोचीनला रहात म्हणून कृष्णाजींनी कोचीनला त्यांच्याकडे वास्तव्य करायचे ठरवले. तेथेच एका कंपनीत भाषाशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
मासिकाचे संपादकत्व
संपादनकोचीनमध्ये कृष्णाजींनी १८८६ साली केरळ-कोकिळ नावाचे मासिक सुरू केले.[१] सामान्य मराठी वाचकांना विविध विषयांची गोडी लावणे हा त्या मासिकाचा उद्देश होता. निष्ठुर व सडेतोड टीका हे ’केरळ-कोकिळ’चे वैशिष्ट्य होते. पहिली चार वर्षे कोचीनहून आणि नंतरची एकोणीस वर्षे मुंबईतून हे मासिक प्रकाशित होऊन, शेवटी इ.स. १९०९ मध्ये बंद पडले. मासिकातल्या ’कलमबहादुरांस शेलापागोटे’ नावाच्या सदरातून कृष्णाजी आठल्ये नवशिक्या लेखकांवर परखड टीका करीत. ’लोकोत्तर चमत्कार’ नावाचे सदरही ते लिहीत.
मुंबईला आल्यावर १८८० साली कृष्णाजींनी पुष्पगुच्छ नावाचे मासिक काढले. त्या मासिकातूनही त्यांचे विविध विषयांवरील संकीर्ण लेखन प्रसिद्ध झाले आहे.
लेखन
संपादनकोचीनला भाषा शिक्षकाची नोकरी चालू असतानाच कृष्णाजींनी ’गीतापद्यमुक्ताहार’ नावाचे पुस्तक लिहून आपल्या ग्रंथलेखनाचा प्रारंभ केला. काव्य, नाटके, कादंबऱ्या, तत्त्वज्ञान यांव्यतिरिक्त कृष्णाजींनी आपल्या पुस्तकांतून फोटोग्राफी, मोहिनीविद्या, विज्ञानकथा, नजरबंदी, आरोग्य हेही विषय हाताळले आहेत.
मराठीतली पहिली (अनुवादित) विज्ञानकथा
संपादन‘केरळ कोकीळ’च्या जून १९०० च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय.[२]
प्रसिद्ध कविता
संपादन- एका नाटक्याचा पश्चात्ताप
- तुफान
- दांपत्यसुखाचा ओनामा
- प्रमाण
- माहेरचे मूळ
- मुलीचा समाचार
- सासरची पाठवणी, वगैरे.
ग्रंथ
संपादनकृष्णाजी नारायण आठल्ये यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली. त्यांतली बरीचशी आधारित किंवा स्वैर अनुवादित आहेत. त्यांपैकी काही ही -
- आद्य जगद्गुरू श्रीमद्शंकराचार्य यांचे विस्तृत चरित्र (१९१०)
- आर्याबद्ध श्रीमद्भवद्गीता
- कर्मयोग (भाषांतरित, मूळ लेखक - स्वामी विवेकानंद)
- काकडे तरवारबहादर (डॉन क्विक्झोटचे संक्षिप्त मराठी रूपांतर)
- गीतापद्यमुक्ताहार
- चीनचा इतिहास (भाषांतरित)
- निवड लेखांचा संग्रह (१९२६)
- भक्तियोग (भाषांतरित, मूळ लेखक - स्वामी विवेकानंद)
- मधुयामिनीस्वप्न (शेक्सपियरच्या 'अ मिडसमर नाइट्स ड्रीम’ या नाटकाचे मराठी रूपांतर, १८८७)
- राजयोग (भाषांतरित, मूळ लेखक - स्वामी विवेकानंद)
- रामकृष्ण परमहंस (चरित्र)
- लोकहितवादी यांचे चरित्र
- विवेकानंद जीवनकथा (चरित्र)
- वैराग्यशतकादर्श
- शृंगार-तिलकादर्श (कालिदासाच्या शृंगारतिलक या काव्याच्या आधारे, १८८४)
- श्वेतांबरा (स्वतंत्र कादंबरी)
- समर्थांचे सामर्थ्य (स्वतंत्र)
सन्मान
संपादन- आठल्यांच्या कवितेतील चित्रमयतेमुळे त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून महाराष्ट्रभाषाचित्रमयूर ही पदवी मिळाली.
- प्रबोधनकार ठाकरे यांनी गुरुपदाचा मान यांना दिला आहे.[३]
कवितांची पाठ्यपुस्तकासाठी निवड
संपादनकृष्णाजी नारायण आठल्ये यांच्या अनेक कविता संक्षिप्त स्वरूपात मराठी शालेय पुस्तकात छापल्या जात असत.
संदर्भ
संपादन- ^ इनामदार, श्री. दे. "आठल्ये, कृष्णाजी नारायण". marathivishwakosh.maharashtra.gov.in. १६ जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ घाटे, निरंजन (१४ एप्रिल २०१६). "मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी". लोकसत्ता. १६ जून २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ कीर, धनंजय (३ सप्टेंबर १९७३). "माझी जीवनगाथा पुस्तकाची प्रस्तावना". http://prabodhankar.org. १६ जून २०१८ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)