किनखाब
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
किनखाब म्हणजे रेशमी कापडावर उठावदार पद्धतीने सोन्याचांदीच्या धाग्यांनी केलेले शोभादायक व सुंदर विणकाम. किनखाबला ‘सोनेरी स्वप्न’ किंवा ‘स्वप्नील वस्त्र’ (फॅब्रिक ऑफ ड्रीम्स) असेही म्हणतात. अलीकडील काळात खऱ्या जरीऐवजी खोट्या जरीनेही हे विणकाम केले जाते. किनखाबाचे वस्त्र अतिशय किंमती असून त्याचा उपयोग लग्न-विधी, धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव अशा मोठमोठ्या प्रसंगी करण्यात येतो. किनखाबाची खरी सुरुवात सर्वप्रथम भारत वा चीन या पूर्वेकडील देशांमध्ये झाल्याचे मानण्यात येते. चीनमध्ये तर इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्याही पूर्वीपासून किनखाबाचे काम होत असे, असा उल्लेख मिळतो. इ. स. २३८ मधील किनखाबाचा एक उत्कृष्ट नमुना आढळला आहे. चीनप्रमाणेच सिरिया, इराण आणि सिसिलीमधील अकराव्या शतकातील किनखाबाचे नमुनेही जतन करून ठेवलेले आहेत.
किनखाब याला इंग्रजीत ‘बॉकेड’ अशी संज्ञा आहे. ‘ब्रॉकेड’ या इंग्रजी शब्दाचे मूळ लॅटिन ‘ब्रॉचस’ शब्दामध्ये आढळते. या शब्दाचा मूळ अर्थ टोकदार सळई असा असून नंतर त्याला ‘सुई’ अथवा ‘कांडी’ (बॉबिन) असा अर्थ प्राप्त झाला. त्यावरून ‘सुई’ अथवा ‘कांडी’ यांच्या साहाय्याने केलेले विणकाम म्हणजे ‘ब्रॉकेड’ असा अर्थ रूढ झाला. पाश्चिमात्य किनखाबाचे मूळ बहुधा प्रागैतिहासिक ब्राँझ युगात आढळते. क्षारयुक्त दलदलीच्या प्रदेशात सुरक्षित अवस्थेत आढळलेल्या काही तत्कालीन वृक्षस्थ शवपेटीकांमधून लोकरी वस्त्रावरील प्राचीन किनखाबाचे अवशेष हाती लागले आहेत. त्यात बहुधा त्रिकोणाकृती, चौकोनाकृती किंवा लहान डबीच्या आकाराचे प्राथमिक आकृतिबंध आढळले आहेत. रेशमाच्या शोध लागण्यापूर्वीचे किनखाबाचे प्राथमिक स्वरूप लोकरी वस्त्रांच्या उभ्या रंगीत धाग्यांच्या विणकामात आढळून येते. असे विणकाम हाडाच्या किंवा धातूच्या सुईने करीत असत. पुढे त्यात सुधारणा होऊन धावता धोटा अस्तित्वात आला व त्याच्याच साहाय्याने हातमागाला सुरुवात झाली. या हातमागावर लोकर, कापूस, रेशीम, लिनन आणि अलीकडे तर कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम धाग्यांचा वापर करून किनखाबी कापड तयार होऊ लागले आहे. त्यात मूळ पोत एका विशिष्ट धाग्याचे असून त्यावर त्याहून वेगळ्या धाग्याचे किनखाब विणण्यात येते. ही वीण कधी साधी तर कधी मिश्र स्वरूपाची असते. एकोणीसाव्या शतकात जकार्ड नावाच्या व्यक्तीने एक नवीन माग शोधून काढला. या ‘जकार्ड मशिन’ मुळे व ‘स्वयंचलित मागां’च्या साहाय्याने कापड विणाई आणि किनखाबनिर्मिती एकाच वेळी होऊ शकते. त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो.
किनखाबाचे मूळ भारतातच असावे, असा तज्ञांचा अभिप्राय आहे. प्राचीन काळापासूनच जरीकापड तयार करण्यात भारत अग्रेसर होता. यजुर्वेदातील ‘सोनेरी’ वा ‘रूपेरी’ वस्त्रांच्या उल्लेखावरून भारतामध्ये इतिहासपूर्व कालापासून जरीचे विणकाम चालत असल्याचे दिसून येते. हे विणकाम सोन्याच्या अतिशय नाजूक धाग्यांपासून व अत्यंत आकर्षक पद्धतीने केलेले असल्यामुळे विणलेल्या कापडाला ‘सुवर्णवस्त्र’ म्हणत असत. यजुर्वेदाप्रमाणेच ऋग्वेद, रामायण-महाभारत, जातककथा आणि अन्य संस्कृत साहित्यांतूहनी जरीकापडाचे अनेक उल्लेख आढळतात. सोळाव्या शतकातील जरीच्या विणकामाचे काही उत्कृष्ट नमुने आजही उपलब्ध आहेत. किनखाबाच्या विणीवरून त्याचे मुख्यत: चार प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात संपूर्ण कापड केवळ सोन्याच्याकिंवा चांदीच्याच धाग्यांनी विनलेले असते. दुसऱ्या प्रकारात मुख्य पोताचा भाग सोन्या-चांदीच्या मिश्र धाग्यांनी विणून त्याच्या अवती-भवती रेशमांच्या धग्यांची वीण केलेली असते त्यामुळे मुख्य कलाकृतीला उठावदारपणा येतो. यालाच खऱ्या अर्थाने किनखाब म्हणतात. अशा कापडापासून तयार केलेली वस्त्रे जड असतात परंतु पडदे, पलंगपोस, झूल, गाशा, हौदा इत्यादींसाठी ती उपयुक्त ठरते. त्यातील अधून मधून केलेली रेशमी वीण, सोनेरी धाग्यांची वेलबुट्टी आणि विविध रंगसंगती यांमुळे हे किनखाब मनमोहक व भपकेदार दिसते. तिसऱ्या प्रकारात वस्त्राचा बराच मोठा भाग रेशमी धाग्याने विनलेला असून त्यांच्या पार्श्वभूमीवर रूपेरी किंवा सोनेरी धाग्यांच्या निवडक कलाकृती विनलेल्या असतात. याला ‘बाता’ म्हणतात. आणि चौथ्या प्रकारात रेशमाच्या जाळीदार कापडावर किंवा झिरझिरीत मलमलीच्या पोतावरील विशिष्ट भागावरच सोन्या-चांदीच्या धाग्यांचे नक्षीदार विनकाम केलेले असते. अथवा कधी कधी काठावर तेवढी नक्षी काढलेली असते. त्याच्या मुलायम स्वरूपावरून त्याला ‘आब खॉं’ म्हणतात. याशिवाय ‘बुटी’, ‘बूटा’, ‘फुलवार’, ‘जाळी’, ‘दोरिया’, ‘धूपछॉंव’, ‘सळईदार’, ‘चारखाना’, ‘खंतरीदार’, ‘बुलबुलचश्म’, ‘बेलपान’ अशा अनेक प्रकारचे विणकाम प्रचारात आहे. परंतु या सर्वांमध्ये बनारसचा `शिकारगढ’ हा नमुना किनखाबाचा उत्कृष्ट प्रकार मानण्यात येतो.
बनारस हे किनखाबाचे माहेरघरच आहे. आजही लग्नप्रसंगी नववधूसाठी ‘बनारसी शालू’चीच महावस्त्र म्हणून निवड करण्यात येते. ‘बनारसी शालू’ प्रमाणेच ऐतिहासिक काळी पैठणीच्या भरजरी पैठणीचाही तेवढाच मान असतो. त्या काळी हे महावस्त्र ऐश्वर्याचे व वैभवाचे प्रतीक मानण्यात येई. हिरवा, पिवळा, लाल किंवा करडकुसुंबी या रंगाचे मूळ वस्त्र गर्भरेशमी असून सोन्या-चांदीच्या जरीचा संपूर्ण पदर आणि वेलबुटीचे ठसठशीत काठ असा तिचा साज असे. त्या काळी ‘पैठणी झोक’ असा वाक्प्रचारही रूढ झाला होता. पैठणीचा ‘असावली’ पदर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे. हल्ली मुर्शिदाबाद, लखनौ, मुलतान, भावलपूर, इंदूर, चंदेरी, अहमदाबाद, सुरत, औरंगाबाद, पैठण, येवले व पुणे येथे जरीकाम करणारे कारागीर आहेत. ते जरीकापडापासून साड्या, खण, शालू, शेले, धोतरे, पितांबर, उपरणी, गाद्याउशांचे अभ्रे, अंगरखे, कुडते, सलवारी, टोप्या, पगड्या, पडदे, गालिचे इ. प्रकार असतात. बनारसच्या जरीकामातील ‘बुटी’ मध्ये ते विविध रंग वापरतात तर साड्यांच्या काठांत आणि पदरांत फुलांचे नमुने उठवितात. बनारस येथे साड्यांना लावण्यासाठी वेगळे जरीचे काठ तयार करण्यात येतात आणि मध्य प्रदेशातील चंदेरी येथे होणाऱ्या साड्यांत पदर आणि कांठ यात जरीकाम केलेले असते. काश्मीरच्या रेशमी शालीत व गालिच्यांत जरीने फुलांचे नमुने विणलेले असतात. तसेच म्हैसूर, मद्रास, मदुरा येथेही सुती व रेशमी साड्यांत जरीने उत्तम तऱ्हेचे वेधक आकृतिबंध उठविलेले असतात. अशा जरीकामात भौमितिक आणि फुलांच्या प्रतिकृती जरीने केलेल्या असतात. पूर्वी घोड्यांच्या खोगीरांवर, हत्तींच्या व बैलांच्या झुलींसाठीही जरीकापड वापरीत असत. हैदराबादच्या सालारजंग संग्रहालयात जरीच्या तारेपासून केलेले नमुनेदार गालिचे जतन करून ठेवलेले आहेत.
संदर्भ
संपादन- ^ "Blumenau, Lili, Creative Design in Wall Hangings". Blumenau, Lili, Creative Design in Wall Hangings, London, 1967.