काशीनाथ श्रीधर नायक
काशीनाथ श्रीधर नायक हे कोंकणी कवी, प्रकाशक व मुद्रक होते. जन्म वेड्डें, सासण्टी महाल, गोवा येथे झाला. मराठीतून प्राथमिक व माध्यामिक शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईस गेले.१९२५ साली मुंबईस गिरगाव भागात त्यांनी ‘गोमन्तक’ छापखान्याची स्थापना केली.१९३१सालीतेविवाहबद्ध झाले.मुंबईत आधुनिककोंकणीसाहित्याचे जनक वामनबाब(वामनरघुनाथ)वर्देवालावलीकारऊर्फ⇨शणै गोंयबाब यांच्याशी त्यांचा अगदी निकटचा संबंध आला.त्यांच्याच सहकार्याने १९३५ साली त्यांनी नवें गोंय हे कोंकणी त्रैमासिक चालविले. त्याचे संपादनही त्यांनीच केले. त्यात ‘बयाभाव’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या. त्यांचा सड्यावेलीं फुलां (१९४५) हा कवितासंग्रह आधुनिक कोंकणी काव्याची नांदीच म्हणावी लागेल. ‘गोमन्त-गीत’ या गीतात त्यांनी गोमंतकाचे अपूर्व सौंदर्य वर्णिले आहे. ‘नवें-गोंय-नवेगोंयकार’ व ‘निर्धार’ या गीतांतून गोमंतकीयांचा स्वाभिमान त्यांनी जागविला. ‘संव्हार’ या कवितेत गोमंतकीयांच्या स्वाभिमानशून्यतेवर त्यांनी कठोर कोरडे ओढले, तर ‘अथ्रेकणी’ व ‘मांडो’ या कवितांतून अनुक्रमे प्रीतीची वेदना व विरहाची व्यथा या भावना अत्यंत हळूवारपणे चितारल्या. सुकृतफळां या त्यांच्या अंशतः प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या कवितासंग्रहातील बहुतेक कविता नीती व तत्त्वज्ञानपर असून त्यांत सड्यावेलीं फुलांतील काव्यगुणांचा अभावच दिसून येतो. निवडक शब्दरचना, प्रमाणबद्ध घाट, सात्त्विक संतापाची धार व भावनांचा कल्लोळ यांमुळे नायक यांच्या काव्याला कोंकणीत अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे.
प्रकाशक व मुद्रक (‘गोमन्तक’ छापखान्याचे मालक) या नात्याने त्यांनी शणै गोंयबाब यांचे समग्र साहित्य (शणै गोंयबाबांली बरपावळ या शीर्षकाखाली १९३० पासून प्रकाशित होण्यास सुरुवात झाली.), आचार्य रामचंद्र शंकर नायक यांच्या नाटिका व इतर लेखकांच्या साहित्यकृती अत्यंत कसोशीने छापून प्रसिद्ध केल्या. त्यांच्या या कार्याचे कोंकणीच्या पुनरुत्थानाच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शणै गोंयबाब यांनी दिलेला कोंकणी भाषेच्या विकासाचा मंत्र घरोघर पोहोचला.या त्यांच्या कार्यासाठीच खुद्द शणै गोंयबाबांनी त्यांचा ‘कोंकणीचे अशोक’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.