ऑल द प्रेसिडेंट्स मेन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ऑल द प्रेसिडेंट्स मेन | |
---|---|
दिग्दर्शन | ऍलन पाकुला |
निर्मिती | वॉल्टर कोब्लेन्झ |
कथा | कार्ल बर्नस्टिन, बॉब वुडवर्ड, ऑल द प्रेसिडेंट्स मेन या पुस्तकावर आधारित |
पटकथा | विलियम गोल्डमन |
प्रमुख कलाकार | डस्टिन हॉफमन,रॉबर्ट रेडफोर्ड,जेसन रॉबर्ड्स,हॅल होलब्रुक,जेन अलेक्झांडर,मार्टिन बालसाम,जॅक वॉर्डन |
संकलन | रॉबर्ट वोल्फे |
छाया | गॉर्डन विलीस |
संगीत | डेव्हीड शायर |
देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | एप्रिल ४ , इ.स. १९७६ |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
|
कलाकार
संपादन- डस्टिन हॉफमन = कार्ल बर्नस्टीन
- रॉबर्ट रेडफोर्ड = बॉब वुडवर्ड
- जेसन रॉबर्ड्स = बेन ब्रॅडली
- हॅल होलब्रुक = डीप थ्रोट
- जेन अलेक्झांडर = ज्यूडी होबॅक
- मार्टिन बालसाम = हॉवर्ड सिमन्स
- जॅक वॉर्डन=हॅरी रोझेनफिल्ड
- स्टिफन कॉलिन्स=ह्यू स्लोन्स, जुनियर
- पेनी फुलर=सॅली येकिन
- रॉबर्ट वाल्डेन=डोनाल्ड सेग्रेटी
- नेड बेटी=मार्टिन डार्डीस
- मेरेडिथ बॅक्स्टर=डेबी स्लोन
पार्श्वभूमी
संपादनइ.स. १९७२ ते इ.स. १९७४ ही वर्षे अमेरिकेच्या इतिहासात विशेष ठरावित. ह्याला कारण रिपब्लिकन राजवटीतील वॉटरगेट प्रकरण होते. १९७२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात घुसल्याच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक झाली. हे पाचही लोक अमेरिकन गुप्तहेर संस्था सी.आय.ए. शी संबंधीत होते. त्यांच्याजवळ वॉकीटॉकी, फोन-टॅपिंगचे साहित्य अशी गुप्तहेरीच्या कामासाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली. वृत्तपत्रांनी या घटनेकडे फारसे गंभीरपणे पाहिले नाही. अपवाद होते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे दोन वार्ताहर : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. यापैकी बॉबला कामावर रूजू होऊन उणेपुरे नऊ महिने झाले होते. कार्ल त्यामानाने अनुभवी होता. तपास घेताना ह्या प्रकरणात सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाने सी.आय.ए, एफ.बी.आय. आणि जस्टीस डिपार्टमेंट या सरकारी संघटनांचा वापर डेमोक्रॅटिक पक्षातील लोकांवर पाळत ठेवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची निवडणुकीत हरप्रकारे मुस्कटदाबी करणे अशासाठी केल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकरणाची परिणती अखेर राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या राजीनाम्यात झाली. अमेरिकन राजकारणातील हा एक नीचतम बिंदु होता. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे अथक परिश्रम केले हा चित्रपट त्याची कहाणी आहे . ह्याचा आधार त्यांनी लिहिलेले ह्याच नावाचे पुस्तक आहे.
निर्मिती
संपादनऍलन पाकुलाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाच्या कल्पनेपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेडफोर्डचाही महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण आधी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयात करायचे ठरले होते. पण ते अशक्य आहे असे दिसल्यावर ह्या चमूने या वृत्तपत्राचे पूर्ण न्यूजरुम जशीच्या तशी स्टुडियोत उभी केली. अगदी कचरापेटीतील कचराही मूळ कार्यालयातून आणलेला होता. चित्रपटात कुठलीही राजकारणी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त फोनवरून त्यांचे आवाज ऐकू येतात. याशिवाय काही ठिकाणी रिचर्ड निक्सन आणि इतरांच्या दूरचित्रवाणीवरील फिती वापरल्या आहेत.
कार्ल आणि बॉब यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत ह्या सर्वांची इत्यंभूत माहिती त्या दोघांकडून घेतली गेली होती. यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी त्या दोघांबरोबर बराच काळ व्यतीत केला. प्रसंगांशी पूर्णपणे तन्मय होण्यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी स्वतःच्या संवादांबरोबर एकमेकांचेही संवाद पाठ केले होते.
वैशिष्ट्ये
संपादनह्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हॉलिवूडमध्ये तयार होऊनही ह्यावर हॉलीवूडची छाप नाही. सर्व प्रसंग कृत्रिम नाट्यमयता न आणता नैसर्गिकरीत्या चित्रित केले आहेत. असे असूनही उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते. तुरळक अपवाद वगळता कुठल्याही प्रसंगात कॅमेरा फिरत नाही. एक-दोन प्रसंगात कॅमेरा या दोघांपासून झूम-आऊट होत लॉॅंग शॉटमध्ये शहराच्या विशालकाय इमारतींवर स्थिरावतो, एका बाजूला विशाल सत्ता आणि दुसऱ्या बाजूला दोन माणसे यातील विरोधाभास सुचित करणारा. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे कमीत कमी पार्श्वसंगीत. नेहमी ऐकू येतो तो टंकलेखन यंत्रांचा खडखडाट. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या वेळी वापरलेले व्हिवाल्डीचे संगीत अत्यंत परिणामकारक ठरते.
या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक गॉडफादर चित्रित करणारे गॉर्डन विलिस होते. त्यांची खासियत म्हणजे कमी प्रकाशातील चित्रीकरण. यासाठीच त्यांचे प्रिन्स ऑफ डार्कनेस हे टोपणनाव पडले. या चित्रपटात प्रामुख्याने दोन ठिकाणी घडणारे प्रसंग आहेत. एकतर न्यूझरूम मध्ये किंवा बाहेर. बाहेर घडणाऱ्या गोष्टी पडद्याआड आहेत, त्यातले खरे किती, खोटे किती याची माहिती नाही. याउलट न्यूझरूममध्ये आहे कठोर सत्य. ह्याला अनुसरून विलिस यांनी बाहेरचे बहुतेक सर्व प्रसंग कमी प्रकाशात किंवा जवळजवळ अंधारात चित्रित केले आहेत. आणि न्यूझरूममध्ये आहे भावनाविरहीत, फ्लोरोसंट असा प्रखर प्रकाश. या दोन्हींचा विरोधाभास खूपच प्रभावी झाला आहे.
पुरस्कार
संपादनया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन या चार विभागांमध्ये ऑस्कर पारितोषिक मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागांमध्ये ऑस्कर नामांकन मिळाले.
इ.स. २००७ मध्ये अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या गेल्या १०० वर्षातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा क्रमांक ७७ होता.