मुंबईतील अनेक देवस्थानांपैकी एक म्हणजे दादर शिवाजी पार्क स्थित श्री उद्यान गणेश मंदिर. मंदिरातील गणेशची मूर्ती एका वडाच्या झाडाखाली प्रकट झाली. मूर्ती ज्या ठिकाणी प्रकट झाली त्याच वडाच्या झाडाखाली या गणेशाचे मंदिर बांधण्यात आले. १९७० साली स्थापन झालेले हे मंदिर ४३ वर्ष जुने असून मंदिराचा विस्तार हा १९७२ साली करण्यात आला. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला उजवीकडे सोंड असलेली (सिद्धिविनायक), शंख, लाडू, हस्तिदंत व गदा धारण केलेली चतुर्हस्त अशा चांदीची बाल गणेशाची मूर्ती दिसते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी-सिद्धी आणि लक्ष-लाभ उभे आहेत. मंदिराच्या सदर बांधकामात राजस्थान व गुजरात येथील संगमरवराचा वापर करण्यात आला असून मंदिरातील सिंहासन व घुमट २४ कॅरेट सोन्याने मढवलेले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही दादर स्थानकावरून पायी किंवा टॅक्सीने जाऊ शकता.