ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य
ईगलनेस्ट अभयारण्य हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे ईशान्येस सेसा ऑर्किड अभयारण्य आणि पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडील पाके व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे अभयारण्य कामेंग हत्ती प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून ५०० मीटर (१,६४० फूट) ते ३,२५० मीटर (१०,६३३ फूट) इतक्या उंचीवर आहे.
ईगलनेस्ट अभयारण्य | |
---|---|
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र) | |
बुगुन लिओचिकला पक्षी. याचा शोध पहिल्यांदा ईगलनेस्ट अभयारण्यात १९९५ साली लागला. | |
ठिकाण | पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत |
जवळचे शहर | गुवाहाटी |
गुणक | 27°06′0″N 92°24′0″E / 27.10000°N 92.40000°E |
क्षेत्रफळ | २१८ चौरस किमी (८४ चौ. मैल) |
स्थापना | १९८९ |
अभ्यागत | ७५ (२००६ साली) |
नियामक मंडळ | अरुणाचल प्रदेश शासन |
संकेतस्थळ | ईगलनेस्ट अभयारण्य |
ईगलनेस्ट अभयारण्य तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक विलक्षण प्रजाती, त्यांच्या संख्या व त्यांना पाहता येण्याची सुलभता यामुळे अतिशय महत्त्वाचे पक्षी निरीक्षणाचे स्थळ आहे.
भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला १९५० मध्ये या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, त्यावरून याचे नाव ईगलनेस्ट असे पडले.[१]
भौगोलिक स्थान आणि हवामान
संपादनईगलनेस्ट अभयारण्याची उत्तर सीमा ईगलनेस्ट डोंगररांग आणि बुगुन जमातीच्या राखीव जंगलांपर्यंत (लामा कॅम्पचा भाग) आहे. भालुकपोंग-बोमडिला महामार्ग त्याची पूर्व सीमा आहे. त्याची दक्षिण सीमा अंदाजे २७° उत्तर अक्षांश आहे, तर भूतानच्या सीमेपर्यंत त्याची पश्चिम सीमा ठरवणारी निश्चित भौगोलिक वैशिष्ट्ये नाहीत. ईगलनेस्ट आणि सेसा डोंगररांगांची समुद्रसपाटीपासूनची उंची अनुक्रमे ३२५० मीटर (१०,६६३ फूट) आणि ३१५० मीटर (१०,३३५ फूट) आहे. आसामच्या पठारावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना त्यांच्या उत्तरेकडील प्रवासात या डोंगररांगांमुळे पहिला अडथळा निर्माण होतो. या डोंगररांगांच्या दक्षिण उतारावर ३००० मिलीमीटरपेक्षा (१२० इंच) जास्त पाऊस पडतो, तर उत्तरेकडील उतारावर साधारणपणे १५०० मिलीमीटर (५९ इंच) पाऊस पडतो.
ईगलनेस्ट आणि सेसा अभयारण्यांच्या पूर्वेकडील भागातून टिप्पी नाला (टिप्पी नदी) वाहतो. तो पुढे भालुकपोंग-बोमडिला महामार्गावर टिप्पी या गावी कामेंग नदीला जाऊन मिळतो. पश्चिम भागामध्ये बुहिरी नदी, दिहुंग नदी आणि इतर लहान ओढे वाहात जाऊन पुढे स्वतंत्रपणे ब्रम्हपुत्रा नदीला मिळतात.[२]
ईगलनेस्ट हा कामेंग प्रोटेक्टेड एरिआ कॉम्प्लेक्सचा (केपीएसी) भाग आहे. केपीएसी अरुणाचल प्रदेशमधील सलग बंदिस्त वनछत्राचा सर्वात मोठा भूभाग आहे. ह्यामध्ये ईगलनेस्ट, सेसा, पाके, नामेरी, सोनाई रूपाई अभयारण्ये आणि त्यांच्याशी निगडित अनेक वन भूभागांचा समावेश होतो. या कॉम्प्लेक्सचे क्षेत्रफळ ३५०० चौरस किमी आहे आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०० मीटर (३२८ फूट) ते ३३०० मीटर (१०,८२७ फूट) यादरम्यान आहे.
ईगलनेस्टमध्ये त्याच्या पायथ्यापासून लामा कॅम्प, ईगलनेस्ट पास (उंची २८०० मीटर), बोम्पू कॅम्प व सेसनी या त्याच्या दक्षिण सीमेजवळील भागापर्यंत कच्चा रस्ता आहे. त्यामुळे त्याचा बराचसा भाग वैज्ञानिक, सैन्य आणि पर्यटकांना वापरायला उपलब्ध होतो.
वन्यजीवन
संपादनईगलनेस्ट अभयारण्य जैवविविधतेने संपन्न आहे. या भागामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळतात जे जगामध्ये इतर कुठेही आढळत नाहीत.
पक्षी
संपादनईगलनेस्ट पक्षी निरीक्षणाचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जवळपास ५२५ पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यांमध्ये ३ प्रकारचे पाणकावळे, ५ प्रकारचे बगळे, काळा करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी (black-headed ibis), ४ बदक, २० ससाणे (hawks), गरुड, घार, भोवत्या (harrier) आणि गिधाडे, ३ फाल्कन (ससाणे), १० फेजंट, रानकोंबडी, बटलावा, मोर, काळ्या गळ्याचा क्रौंच, ३ पाणकोंबड्या, ६ चिखल्या, डॉटेरेल (Charadrius morinellus), आणि टिटव्या, ७ वेडर, आयबिसबिल, स्टोन-कर्ल्यू (युरेशियन थिक-नी), स्मॉल प्रॅंटिकोल, २ कुरव (gulls), १४ पारवे, ३ पोपट, १५ कोकीळ, १० घुबडे, २ रातवे, ४ पाकोळ्या (swifts), २ कर्णा (trogon), ७ धीवर (kingfishers), २ राघू (bee-eaters), २ नीलपंख (rollers), हुदहुद, ४ धनेश, ६ बार्बेट, १४ सुतारपक्षी, २ ब्रॉडबिल, २ पिट्टा, २ चंडोल (larks), ६ पंकोळी (martins), ७ धोबी (wagtails), ९ खाटिक (shrikes), ९ बुलबुल, ४ फेअरी-ब्ल्यूबर्ड, ब्राऊन डिपर, ३ ॲक्सेंटर, ४६ थ्रश, ६५ माशीमार, ६ पॅरटबिल, ३१ वटवट्ये, १० रामगंगा (tits), ५ शिलींध्री (nuthatches), ३ ट्रीक्रीपर, ५ फूलचुख्या, ८ शिंजीर (sunbirds), कोळीखाऊ, चष्मेवाला (oriental white-eye), ३ भारीट (bunting), १४ फिंच, २ मनोली (munia), ३ चिमण्या, ५ मैना, २ हळद्ये (orioles), ७ प्रकारचे कोतवाल (drongos), राखी रानपाकोळी (ashy woodswallow) आणि ९ अन्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.[३]
ईगलनेस्टमध्ये रमणा आत्रेय यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा बुगुन लिओसिकला या पक्ष्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आणि २००६ मध्ये त्याचे पुन्हा निरीक्षण करून सखोल वर्णन केले.[४] ही भारतात शेवटच्या ५० वर्षात शोध लागलेली पक्ष्यांची पहिली नवीन प्रजाती आहे.[५] २००६ सालापर्यंत या पक्ष्याच्या फक्त ३ नर-माद्यांच्या जोड्या आढळून आल्या होत्या आणि हा पक्षी ईगलनेस्ट खोऱ्याव्यतिरिक्त (लामा कॅम्प समोरील भाग) जगात इतर कुठेही आढळत नाही.
भूजलचर आणि सरपटणारे प्राणी
संपादनईगलनेस्टमध्ये अनेक प्रकारचे भूजलचर आणि सरपटणारे प्राणी आढळतात. तिथे उभयचरांच्या किमान ३४ प्रजाती, सापांच्या २४ प्रजाती आणि पाली व सरड्यांच्या १० प्रजाती आहेत ज्यामध्ये ३ गेको, ३ ॲगॅमिड आणि ४ स्किंक प्रजातींचा समावेश आहे. अबॉर हिल्स अगामा या सरड्याच्या प्रजातीचा १२५ वर्षांनंतर ईगलनेस्टमध्ये पुन्हा शोध लागला. इतर दुर्मिळ प्रजातींमध्ये दार्जिलिंग फॉल्स-वुल्फस्नेक ही सापाची प्रजाती आहे ज्याचे फक्त पाच साप सापडले आहेत. त्याचबरोबर अँडरसन्स माऊंटन लिझार्ड आणि गुंथर्स कुक्री स्नेक, कॉमन स्लग स्नेक आणि कीलबॅक स्नेक या प्रजातींच्या सापांची खात्रीशीरपणे ओळख पटवण्यात आलेली नाही.
फुलपाखरे
संपादनईगलनेस्टमध्ये कमीत कमी १६५ प्रजातींची फुलपाखरे आढळतात ज्यामध्ये भूतान ग्लोरी, ग्रे ॲडमिरल, स्कार्स रेड-फॉरेस्टर, डस्की लॅबिरिंथ, टायगरब्राऊन, जंगल क्वीन, व्हाईट एज्ड बुश-ब्राऊन, आणि व्हाईट आऊल यांचा समावेश होतो.[३]
सस्तन प्राणी
संपादनईगलनेस्टमध्ये सस्तन प्राण्यांच्या कमीत कमी १५ प्रजाती आढळतात ज्यामध्ये कॅप्ड लंगूर ही धोक्यात असलेली प्रजाती, भारतीय वाघ, आशियाई हत्ती, लाल पांडा, आशियाई काळे अस्वल, असुरक्षित अरुणाचल मकाक आणि रानगवा यांचा समावेश आहे. डॉ. अन्वरुद्दिन चौधरी यांनी १९९७ साली इथे नवीन वानर प्रजातीचा शोध लावला.[६] २००४ साली या प्रजातीचे वर्णन करून त्याला अरुणाचल मकाक असे नाव देण्यात आले.[७]
वनस्पती
संपादनईगलनेस्ट अभयारण्याचा अधिवास विविधतापूर्ण आहे. अभयारण्याच्या उंचीमधील फरकामुळे येथे उष्णकटिबंधीय जंगलांपासून उंच ठिकाणच्या ढगाळ वातावरणातील जंगलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जंगले आहेत. येथे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. दक्षिण उतारांवर जमिनीवर फर्न वनस्पती वाढतात. या प्रदेशात बांबूची झाडेही आढळतात. त्याचबरोबर एलिफंट नेटल किंवा स्थानिक भाषेमध्ये खुजली नावाचे झुडूप आढळते जी विषारी वनस्पती आहे. याचा त्वचेला स्पर्श झाल्यास अतिशय तीव्र खाज येते, त्वचा जळाल्यासारख्या वेदना होतात, अंगावर काटे येतात आणि काही वेळा ताप येऊ शकतो. ईगलनेस्टमधून जाणाऱ्या रस्त्याचा बाजूंना जंगली स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीची झुडूपे अनेक ठिकाणी आढळतात.
संवर्धन
संपादनईगलनेस्ट त्याच्या विलगतेमुळे आणि त्याच्यामधून जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शिकाऱ्यांपासून आणि लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्यांपासून संरक्षित आहे. ईगलनेस्टमध्ये कोणतीही मानवी वस्ती किंवा गाव नसल्यामुळे सुद्धा तिथे शिकारीचा प्रश्न गंभीर नाही. हे अभयारण्य विभागीय वन अधिकारी, शेरगाव वन विभाग, रूपा (मिल्लो तासेर, आयएफएस) यांच्या कार्यकक्षेत येते.
हा भाग आशियाई हत्तींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हत्ती दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आसामच्या मैदानातून ईगलनेस्ट अभयारण्यात ३२०० मी उंचीपर्यंत चढाई करतात. पण ईगलनेस्ट अभयारण्याच्या दक्षिण सीमेजवळ आसाममधील मैदानी भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदेशीर जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे हत्ती आणि माणसातील संघर्षामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे हत्तींना जास्त काळ ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये रहावे लागत आहे. हत्तींच्या वाढीव वास्तव्यामुळे त्यांच्या चरण्याचा दर वनस्पतींच्या पुनःनिर्मितीच्या दरापेक्षा जास्त झाला तर जंगलांचे आणि पर्यायाने हत्तींचेही नुकसान होऊ शकते.
संदर्भ
संपादन- ^ बिभास आमोणकर. "'बुगुन'चा अरुणाचल प्रदेश".
- ^ आर्मी मॅप सर्व्हिस, कॉर्प ऑफ इंजिनिअर्स, यू.एस. आर्मी, वॉशिंग्टन डी.सी. (१९५५) सीरीज U502, शीट NG-46-2, तवांग, भारत; भूतान; चीन, भौगोलिक नकाशा १:२५०,०००
- ^ a b रमणा अत्रेय. "Eaglenest Biodiversity Project (2003 – 2006): Conservation resources for Eaglenest wildlife sanctuary" (PDF) (इंग्रजी भाषेत).
- ^ Ramana Athreya (2006). "A new species of Liocichla (Aves: Timaliidae) from Eaglenest Wildlife Sanctuary, Arunachal Pradesh, India" (PDF). Indian Birds (इंग्रजी भाषेत). 2 (4): 82–94. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य) - ^ जेम्स ओवेन. "न्यू बर्ड डिस्कव्हर्ड इन इंडिया" (इंग्रजी भाषेत).
- ^ Choudhury, Anwaruddin (2004). "The mystery macaques of Arunachal Pradesh". Rhino Foundation Newsletter. 6: 21–25.
- ^ Sinha, A., Datta, A., Madhusudan, M. D. and Mishra, C. (2005). "Macaca munzala: a new species from western Arunachal Pradesh, northeastern India". International Journal of Primatology. 26 (977): 989. doi:10.1007/s10764-005-5333-3.CS1 maint: multiple names: authors list (link)