कामेंग नदी

ईशान्य भारतातील नदी

कामेंग नदी तथा जिया भोरेली ही भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि असम राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात भारत-तिबेट सीमेजवळ ६,३०० मीटर (२०,६६९ फूट) उंचीवर एका हिमसरोवरात होतो. तेथून ही नदी पश्चिम कामेंग जिल्ह्यातून वाहत असमच्या शोणितपूर जिल्ह्यात येते व तेझपूर जवळ कोलिया भोमोरा सेतू पूलानंतर ब्रह्मपुत्र नदीशी मिळते.

२६४ किमी लांबीच्या या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे ११,८४३ किमी इतके आहे. या नदीच्या दोन्ही काठी घनदाट जंगल आहे. ही नदी पश्चिम आणि पूर्व कामेंग जिल्हा तसेच सेसा ऑर्किड अभयारण्य आणि ईगलनेस्ट अभयारण्य यांच्या मधून वाहते. कामेंग नदीला टिप्पी नाला, टेंगा नदी, बिचोम नदी आणि दिरांग चु या उपनद्या मिळतात. या नदीला पूर्वी भरेली नदी नाव होते.