डॉ. इंदुमती शेवडे (माहेरच्या इंदुमती जठार) (जन्म : सागर-मध्यप्रदेश, १६ ऑक्टोबर १९१७; - नागपूर, १४ मार्च, इ.स. १९९२) या एक मराठी पत्रकार आणि लेखिका होत्या. नागपूरच्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्रात त्या ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे लिहीत होत्या.

इंदुमती शेवडे इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाल्या होत्या. ‘मराठी कथेचा उद्‌गम आणि विकास’या विषयावर त्यांची पीएच.डी. होती. शिक्षण पूर्ण केल्यावर त्या पुढे नागपूर आकाशवाणी केंद्रावर मराठी भाषण विभागात सहायक कार्यक्रम-निर्मात्या झाल्या. इंग्लंडमध्ये बी.बी.सी.च्या रेडिओ केंद्रावर परकीय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गासाठी त्यांना नागपूर आकाशवाणीने पाठवले होते.

इंदुमती शेवडे पुढे नागपूरहून दिल्लीला गेल्या तेथे त्यांनी युनियन पब्लिक सर्विस कमिशनच्या मराठी विभागात काम करायला सुरुवात केली. याच काळात त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची इंग्रजी भाषांतरे केली.

दिल्लीत इंदुमती शेवडे जेथे रहात होत्या त्या घराजवळ मिझा गालिबची कबर होती. त्यांनी लोकांकडून गालिबची बरीच माहिती गोळा केली. निवृत्तीनंतर नागपूरला परतल्यावर इंदुमती शेवडे उर्दू शिकल्या आणि त्यांनी मराठीत मिर्झा गालिबचे चरित्र लिहिले.

इंदुमती शेवडे जी.डी. आर्ट असून उत्तम चित्रकार होत्या. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील चित्रे त्या स्वतःच काढीत. त्यांनी लिहिलेल्या अनेक श्रुतिका नागपूर नभोवाणीकेंद्रावर प्रसरित होत असत.

इंदुमती शेवडे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • इये साहेबाचिये नगरी (प्रवासवर्णन)
  • पु.य. देशपांडे (चरित्र)
  • संत कवयित्री : 'संत कवयित्री' हे स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासमालिकेतील पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात महदाइसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या पाच संत कवयित्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे.
  • कथा एका शायराची (मिर्झा गालिब यांच्या जीवनावरची कादंबरी)

साहित्यिक कार्य संपादन

राम शेवाळकररांनी १९७६ साली विदर्भात स्थापन केलेल्या अभिव्यक्ती या लेखिकांसाठीच्या सजग आणि अग्रणी संस्थेचे चौथे विदर्भ लेखिका संमेलन इंदुमती शेवडे यांच्या हस्ते मार्च १९९० मध्ये पार पडले.