महदाइसा ऊर्फ महदंबा या महानुभाव पंथातील एक महिला साधिका आहेत.त्यांचा जन्म मराठवाडयातील जालना जिल्ह्यामधे झाला. श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री,तपस्विनी होती अशी तिच्याविषयी महानुभावांंची श्रद्धा आहे.[१] तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" अशा शब्दांंमधे महानुभावपंंथीय तिचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा महानुभाव पंथीयांना मार्गदर्शक आहे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात.[२]आजही जालना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये महानुभाव पंथ मोठया प्रमाणात पसरलेला आहे.[३][३]

महानुभाव पंंथ संपादन

यादवकालात; एकेश्वरीवादाचा पुरस्कार करणाऱ्या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण, श्री दत्तगुरू, चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली.[४] चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खऱ्या अर्थाने प्रसार झाला.महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या.[५]

तत्कालीन समाजजीवनात स्त्रीच्या पातिव्रत्याच्या कल्पनेला विशेष महत्त्व होते.स्रियांंची सामाजिक अवस्था पुरुषसत्ताक असतानाच्या पार्श्वभूमीवर महदाइसा ह्यांंचे कार्य नोंंद घेण्याजोगे आहे.[६]

कौटुंंबिक पार्श्वमी संपादन

महदाइसाचा जन्म वायेनायक व कामाइसा ह्यांच्या पोटी जालन्यामधे एका विद्वान घराण्यात झाला. तिचे पणजोबा वामनाचार्य हे यादवराजांचे आश्रित असून पणजी महदाइसाही विद्वान होती. पणजीला म्हाळसा प्रसन्न होती, असे मानले जाते. पणजी महादेवरायाची पुरोहित असल्याने राजा तिला नित्य प्रश्न विचारीत असे व ती भविष्य सांगत असे. एका वादात तिने परप्रांतीय विद्वानांचा पराभव केल्याने तिला जैतपत्र मिळाले. राजाने पाच गावे इनाम म्हणून दिली.

आस्था व श्रद्धा संपादन

बालपणीच वैधव्य आलेली महदाइसा त्या काळच्या प्रथेनुसार माहेरी आली. माहेरी तिला प्रतिष्ठा होती.तिचे चुलत बंंधु नागदेव हे पुढे तिचे गुरू झाले. महदाइसेचे ’लीळाचरित्र’, [७]’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळ’ व ’धवळे’हे चार ग्रंंथ प्रसिद्ध आहेत. तीर्थयात्रेस जाणे, व्रतवैकल्य करणे, देवपूजा या तिच्या आस्थेच्या व श्रद्धेच्या संंकल्पना होत्या. प्रारंंभी चक्रधर स्वामींचे शिष्य दादोस हे तिचे गुरू होते. त्‍यांच्याकडूनच नागदेवाला व महदाइसाला श्री चक्रधरस्वामींंची महती कळली.

चक्रधर स्वामींंचे शिष्यत्व आणि साधना संपादन

चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशील सुधारक ठरतात असे मानले जाते. स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग तिने स्वीकारला होता. महदाइसेच्या वडिलांंचा याला विरोध होता. महानुभावाचे खडतर असलेले भिक्षाव्रत तिने स्वीकारले होते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीकारायचे, ते अन्न नदीच्या काठी जाऊन, नदीकडे तोंड करून प्राशन करायचे व मग पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती आणि मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. चक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या प्रत्येक विचाराला व तत्त्वज्ञानाला अनुसरणारी ती शिष्या होती. चक्रधर स्वामींना आपले जीवन तिने समर्पित केले. महदाइसाबद्दल लीळाचरित्रात माहिती मिळते. चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीलांचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीलांमधे प्रामुख्याने चक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारणारी महादाइसेचे वर्णन आहे’ म्हातारी चचकः, म्हातारी विसासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’ असे उदगार स्वामी तिच्याबद्दल काढतांना दिसतात. दोघांच्या संवादांतून, प्रश्नोत्तरांतून पंथाची माहिती आपल्याला मिळते.

महानुभव पंंथाची जबाबदारी संपादन

चक्रधरांचे तत्त्वज्ञान नीट समजून न घेतल्याने सामाजिक विरोध त्यांंना स्वीकारावा लागला. आपल्या अवतार कार्याची समाप्ती होत आहे अशी जाणीव चक्रधरांना झाली व पंथाची धुरा नागदेव व महदाइसा या दोघांंकडे त्यांंनी सोपविली. महदाइसाने आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चिंतनात व पंथाच्या कार्यासाठी समर्पित केले.

साहित्य निर्मिती संपादन

चक्रधर स्वामींच्या चिंतनाच्या याच काळात ’धवळ्या’ची रचना झाली. धवळे, मातृकी रुक्मिणी स्वयंवर, गर्भकांड ओव्या, आरती अशी महदाईसाची वाङ्मय निर्मिती आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह कथेकडे महदाइसा आकर्षित झाली होती.रुक्मिणीच्या मनातील भक्तिभाव हा तिला महत्त्वाचा वाटला. तिचे चक्रधरस्वामींशी असलेले गुरू- शिष्याचे नाते ती या धवळ्याद्वारा व्यक्त करताना दिसते. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराची कथा ही तिला आद्य कवयित्रीचा मान मिळवून देणारी ठरली. [८]श्री चक्रधरांनी ७१ प्रसंगात श्रीकृष्णचरित्राचे वर्णन केले आहे. त्याचेच श्रवण मनन व चिंतन करून धवळ्याची निर्मिती झाली आहे. चक्रधर स्वामींचा वियोग तिला सहन झाला नाही. चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशीच विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .[९]

हे सुद्धा पहा संपादन

महानुभाव पंथ

संदर्भ संपादन

  1. ^ MADGULKAR, VYANKATESH (2012-05-01). JANAVANATIL REKHATANE / PRAVAS EKA LEKHAKACHA (इंग्रजी भाषेत). Mehta Publishing House. ISBN 9789386745682.
  2. ^ Śāhā, Muralīdhara Ba; Jasavanta, Jana (1987). Rāma-bhakti śākhā ke ajñāta kavi: Santa Jana-Jasvanta kī padāvalī (हिंदी भाषेत). Vidyā Prakāśana.
  3. ^ a b डॉ. वृषाली किन्हाळकर http://m.maharashtratimes.com/articleshow/msid-11014547,prtpage-1.cms[permanent dead link]
  4. ^ Nagendra, Ed Dr (2001). Bhartiya Kavya Main Sarvdharma Sambhav (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9788170558088.
  5. ^ Kurundakara, Narahara (1987). Paricaya. Indrāyaṇī Sāhitya.
  6. ^ डॉ. वृषाली किन्हाळकर http://m.maharashtratimes.com/articleshow/msid-11014547,prtpage-1.cms[permanent dead link]
  7. ^ Paniker, K. Ayyappa (1997). Medieval Indian Literature: Surveys and selections (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. ISBN 9788126003655.
  8. ^ तिवारी, सियाराम (2015). Bhartiya Sahitya Ki Pahchan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350729922.
  9. ^ डॉ. वृषाली किन्हाळकर http://m.maharashtratimes.com/articleshow/msid-11014547,prtpage-1.cms[permanent dead link]