इंग्लिश विंग्लिश
इंग्लिश विंग्लिश हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. गौरी शिंदेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रीदेवीची प्रमुख भूमिका आहे. इंग्लिश विंग्लिशद्वारे श्रीदेवीने तब्बल १५ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. श्रीदेवीच्या अभिनयाचे समस्त टीकाकारांनी भरभरून कौतुक केले.
इंग्लिश विंग्लिश | |
---|---|
दिग्दर्शन | गौरी शिंदे |
निर्मिती |
सुनील लुल्ला राकेश झुनझुनवाला |
कथा | गौरी शिंदे |
प्रमुख कलाकार |
श्रीदेवी मेहदी नेब्बू आदिल हुसेन प्रिया आनंद |
संगीत | अमित त्रिवेदी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ५ ऑक्टोबर २०१२ |
अवधी | १३३ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹१५ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹१२० कोटी |
कथानक
संपादनशशी गोडबोले (श्रीदेवी) ही एक गृहिणी आहे जिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही. ह्यावरून नवरा व मुलीद्वारे कायम खिल्ली उडवली जात असलेली व उपेक्षा सहन करत राहणारी शशी काहीशी निराश झाली आहे. आपल्या मोठ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी शशी अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात जाते. इंग्लिश येत नसल्यामुळे न्यू यॉर्कमध्ये शशीची तारांबळ उडते. परंतु डगमगून न जाता शशी गुप्तपणे एका इंग्लिश कोर्समध्ये प्रवेश घेते. ह्या प्रशिक्षण वर्गात तिला अनेक देशांमधून आलेले विविध लोक भेटतात ज्यांच्यासोबत शशीची चांगली मैत्री होते. चार आठवड्यात शशीला इंग्लिशवर चांगलेच प्रभुत्व येते व ती प्रशिक्षकाची आवडती विद्यार्थिनी बनते. शशी अनेक इंग्लिश चित्रपट पाहते व इंग्लिश बोलण्याचा सराव चालूच ठेवते. अशा प्रकारे शशी आपला हरवलेला आत्मविश्वास देखील परत मिळवते.
भाचीच्या लग्नादरम्यान शशी नवदांपत्याला उद्देशून इंग्लिशमध्ये एक सुरेख भाषण देते जे ऐकुन शशीचा नवरा व मुलीसह सर्व उपस्थित थक्क होतात. नवऱ्याला शशीसोबत उपेक्षेने वागल्याचा पश्चाताप होतो व सर्व कुटुंब आनंदाने भारतात परतते.
पुरस्कार
संपादन- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण - गौरी शिंदे
- स्क्रीन पुरस्कार - सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण - गौरी शिंदे
- स्टारडस्ट पुरस्कार - सर्वोत्तम अभिनेत्री - श्रीदेवी
- झी सिने पुरस्कार - सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण - गौरी शिंदे
- आय.आय.एफ.ए. पुरस्कार - सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण - गौरी शिंदे
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील इंग्लिश विंग्लिश चे पान (इंग्लिश मजकूर)