आषाढ शुद्ध नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिला कांदे नवमी किंवा भडली नवमी म्हणतात. यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी होते. पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे. तसेच वांगीदेखील वर्ज्य असतात. यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी, कांद्याची भजी-भाजी-कोशिंबीर, थालीपीठे, झुणका, कांदे पोहे, कांदे घातलेला फोडणीचा भात हे पदार्थ खाऊन हा दिवस साजरा केला जातो.

भडली नवमीच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात धडाक्यात लग्ने होतात. या मुहूर्तासाठी पंचांग पहावे लागत नाही. भडली नवमीनंतर दोनच दिवसांनी चातुर्मास सुरू होतो आणि तो संपेपर्यंत लग्नाचे मुहूर्त नसतात.