आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर

अलेनश्लेअगर आडाम गॉटलॉब (१४ नोव्हेंबर १७७९—२० जानेवारी १८५०). एक सुप्रसिद्ध डॅनिश कवी. जन्म व शिक्षण कोपनहेगन येथे. हेन्‍रिक स्टेफन्स ह्या नॉर्वेजिअन तत्त्वज्ञाच्या प्रभावामुळे तो स्वच्छंदतावादी झाला. Digte (१८०३, इं. शी. पोएम्स) ह्या त्याच्या काव्यसंग्रहाने डॅनिश काव्यात जर्मन स्वच्छंदतावादी कल्पनांचा नवप्रवाह आणला. ‘Guldhornene’ (१८०२, इं. शी. द गोल्डन हॉर्न्स) ही त्याची पहिली आणि गाजलेली स्वच्छंदतावादी कविता ह्याच संग्रहात अंतर्भूत केली होती. ह्या संग्रहातील St. Hans Aften-spil (इं. शी. सेंट जॉन्स ईव्ह फेट. ‘मिडसमर नाइट्स प्ले’म्हणूनही ही साहित्यकृती ओळखली जाते.) ह्या भावकाव्यात्म नाटकाला स्वच्छंदतावादाची तात्त्विक बैठक होती. Poetiske Skrifter (१८०५, इं. शी. पोएटिक रायटिंग्ज) हा त्याचा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला दुसरा कवितासंग्रह. त्यातील Vaulundur‘s saga ही नॉर्डिक शोकात्मिका आणि Aladdin हे परीकथेचे वातावरण असलेले निर्यमक छंदातील नाटक विशेष उल्लेखनीय आहे. अल्लादीनचा जादूचा दिवा कवीच्या अंतःप्रज्ञेचे प्रतीक म्हणून या नाटकात आला आहे. ह्या दोन्ही नाटकांचे इंग्रजी अनुवाद झालेले आहेत. १८०५ मध्ये डेन्मार्कच्या सरकारने फ्रान्स, जर्मनी आणि इटली ह्या देशांचा प्रवास करण्यासाठी त्याला अनुदान दिले.

जर्मनीत श्रेष्ठ स्वच्छंदतावाद्यांशी त्याची भेट झाली. परदेशी असतानाच त्याने Hakon jarl (१८०५, इं. शी. अर्ल हॅकन द मायटी), Baldur hin Gode (१८०८, इं. शी. बाल्डर द गुड), Axel og Valborg (१८०९, इं. शी. ॲक्‌सेल अँड व्हालबॉर्ग) ह्या नॉर्डिक आख्यायिकांवर आधारलेल्या नाट्यकृती रचिल्या. तसेच Thors Reise til Jotunheimen (इं. शी. थॉर्स जर्नी टू योटुनहेम) हे महाकाव्यही लिहिले. ह्यांतील काही साहित्यकृती Nordiske Digte (इं. शी. नॉर्दर्न पोएम्स) ह्या त्याच्या काव्यसंग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. त्यांतून स्कँडिनेव्हियन मिथ्यकथांच्या परंपरेचे त्याने कलात्मक पुनरुज्जीवन घडवून आणले असल्यामुळे त्यांचे सांस्कृतिक मोल मोठे आहे. तथापि त्यांची वाङ्मयीन गुणवत्ताही श्रेष्ठ आहे. काही बाबतींत तर त्याच्या स्फूर्तिस्थानी असलेल्या जर्मन स्वच्छंदतावाद्यांपेक्षाही त्याचे स्थान वरचे आहे. त्याच्या स्वच्छंदतावादी भूमिकेला राष्ट्रीय चौकट प्राप्त झाल्याचा प्रत्ययही ह्या काव्यसंग्रहाने आणून दिला.

तो १८०९ मध्ये डेन्मार्कला परतला. १८१० त सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून तो कोपनहेगन येथे काम करू लागला. १८११—१२ त ग्रीक शोकात्मिकेतील नियतीच्या संकल्पनेचा त्याच्यावर परिणाम झाला आणि सॉफोक्लीझच्या ईडिपस नाट्यत्रयीच्या धर्तीवर त्याने Helge (१८१४) ही साहित्यकृती लिहिली. तिचे पहिले दोन भाग रोमान्सच्या स्वरूपाचे असून तिसरा भाग (Yrsa) मात्र ग्रीक शोकात्मिकेसारखा आहे.

Dina (१८४१) आणि Kiartan og Gudrun (१८४९) ह्या त्याच्या शोकात्मिकाही उल्लेखनीय आहेत. ह्या शोकात्मिकांत त्याने संकुल व्यक्तिरेखा निर्माण केलेल्या आहेत. त्याचे आत्मचरित्र (चार खंड, १८५०—५१) एक श्रेष्ठ साहित्यकृती म्हणून गणले जाते. त्याने काही कथा आणि एक कादंबरीही लिहिली आहे.

अलेनश्लेअगरच्या हयातीतच त्याच्या अनुकूल-प्रतिकूल मूल्यमापनास आरंभ झाला. जे. एल्. हायबेर्ग ह्या अग्रगण्य डॅनिश समीक्षकाने १८२० पासून अलेनश्लेअगरच्या वाङ्मयाची कठोर चिकित्सा केली. तथापि त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. १८२९ मध्ये ‘स्कँडिनेव्हियन कवींचा राजा’ ही पदवी त्याला सन्मानपूर्वक देण्यात आली. १८४९ मध्ये डेन्मार्कचा राष्ट्रकवी म्हणून त्याचा जाहीरपणे गौरव झाला. कोपनहेगन येथे तो निधन पावला.