अमरापूर
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अमरापूर हे गाव येते. नगरहून पैठणला जाणाऱ्या मार्गावर नगरच्या उत्तरेला ५५ कि. मी. अंतरावर अमरापूर स्थित आहे.
?अमरापूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १२.३९३३ चौ. किमी |
जवळचे शहर | अहमदनगर |
जिल्हा | अहमदनगर |
तालुका/के | शेवगाव |
लोकसंख्या • घनता |
३,५३९ (२०११) • २८६/किमी२ |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | अमरापूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 414505 • +०२४२९ • MH |
अमरापूर हे सदाशिव अमरापूरकरांचे जन्म ठिकाण आहे. सदिशिक अमरापूरकरांमुळे या गावची ओळख जगभर पसरली. आपल्या दमदार अभिनयाने रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकाराचे नाव जेंव्हा केंव्हा घेतले जाईल तेंव्हा या गावाचेही नाव उद्गारले जाईल. अमरापूर गावाला रुपेरी पडद्यावर ओळख निर्माण करून दिली ती सदाशिव अमरापूर यांनीच. अभिनया बरोबरच या गावाला साहित्यिकाचाही वारसा लागला. कै सुनंदा चोरडिया-शिंगवी कवयित्रीने याच गावात जन्म घेतला आणि आपल्या कवितांच्या माध्यमातून साहित्यिक पटलावर अमरापूरचे नाव कोरून ठेवले. कै. सुनंदा चोरडिया यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने अमरापूरचे फार मोठे नुकसान झाले, परंतु त्यांनी रचलेल्या समकालीन काव्यातून त्या आजही अमरापूर येथील जनामनात अस्तित्वात आहेत. त्यांच्या कवितांनी त्यांना जनूकाही अमरत्व प्राप्त करून दिले आहे.
ऐतिहासिक पाश्र्वभूमी :
साहित्य, कला याबरोबरच अमरापूर गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दख्खनमध्ये इस्लामी राजवटीचा उदय होऊन बहमनी साम्राज्य उदयाला आले. कालांतराने बहमनी साम्राज्याचे विघटन होऊन अहमदनगर निजामशाही निर्माण झाली. निजामशाहीत मलिक अंबर हा मोठा सरदार होऊन गेला. निजामशाही टिकवण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मलिक अंबरने प्रयत्न केले. अफ्रिकण गुलाम म्हणून दख्खन मध्ये आल्यानंतर मलिक अंबर आपल्या कौशल्याच्या जीववर निजामशाहीत मोठ्या अधिकार पदावर पोहचला. त्याच्या वंशजातील एका शाखेला तत्कालीन निमगांव (आजचे अमरापूर) हे गाव ईनाम मिळाले. पुढे निमगावचे अंबरपूर, अंबरापूर व कालांतराने अपभ्रंश होऊन अमरापूर नाव तयार झाले. आजही अमरापूरमध्ये मलिक अंबरचे वंशज राहतात.
मध्ययुगीन कालखंडातील काही वास्तूंनी अमरापूरच्या इतिहासात आणखीनच भर घातली आहे. त्यामध्ये गावची वेस, भैरवनाथ मंदिर, शिवमंदिर, बारव आणि जामा मशीद ह्या होत. अमरापूर हे गाव साकुळा नदीच्या तीरावर वसले असून याच नदीच्या तीरावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली मोठी बारव आहे. मध्ययुगीन स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. ही बारव अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. बारवेच्या पाण्याचा उपयोग आजही सिंचनासाठी होतो. संपूर्ण गावाला पूर्वी तटबंदी होती. वेशीला मोठाले लाकडी दरवाजे असत असे जुने लोक सांगायचे. वेशीत रखवालदाराला बसण्यासाठी देवडी असून वेस जुन्या इतिहासाची साक्ष देत अजूनही उभी आहे.
अमरापूर गावाच्या पूर्व सीमेवर एक गद्धेगळ असून हा गावाला लाभलेला फार मोठा ऐतिहासिक ठेवा आहे.
गद्धेगळ म्हणजे काय? : गद्धेगळ ही शापवाणी शिल्पे असून राज आज्ञेचा प्रजेने भंग करू नये असा या शिळा उभारण्या मागचा उद्देश होता. त्याकाळी प्रजेवर वचक बसावी, सर्वांनी नियमांचे पालन करावे, कुठलाही गुन्हा करू नये अथवा सीमेचा भंग करू नये यासाठी ही शिल्पे उभारली जायची. आज्ञेचा भंग करणाऱ्या व्यक्तीस अथवा त्याच्या मातेस गद्धेगळ वर सांगितलेली शिक्षा देण्यात येईल अशी चेतावणी त्यावर कोरलेली असायची. ही शिल्पे मुख्यत्वे गावाच्या वेशी शेजारी, ग्रामदैवताच्या मंदिरा जवळ, मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा गावाच्या सरहद्दी उभारलेली आढळतात.
अमरापूर येथील गद्धेगळवर वरील भागात चंद्र-सूर्य कोरलेले असून मधला भागात गाढवाचा स्री बरोबर संकर दाखवलेला आहे. खालचा भाग मोकळा असून यावर कुठलाच शिलालेख दिसत नाही. (बहुतेक हा शिलालेख नष्ट झाला असावा) हा गद्धेगळ गावाच्या सीमेवर उभारला असल्यामुळे ही सीमा तत्कालीन राज्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रदेशाची अथवा महसूली विभागाची सीमा असावी.