हमीद गुल (२० नोव्हेंबर, इ.स. १९३६:सरगोधा, पाकिस्तान - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुरी, पाकिस्तान) हे पाकिस्तानच्या आयएस‍आय या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते.

त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद खान होते. ते पंजाबचे पठाण होते.

लष्करी कारकीर्द

संपादन

ऑक्टोबर १९५६मध्ये हमीद गुल हे कमिशन घेऊन पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. भारताबरोबर झालेल्या १९६५ च्या युद्धात ते स्क्वाड्रन कमांडर होते. १९७२-७६मध्ये ते मुहम्मद झिया-उल-हक या सरसेनापतीच्या कारकिर्दीत बटालियन कमांडर, आणि १९७८ मध्ये ब्रिगेडियर व लेफ्टनंट कमांडर झाले. १९९१ मध्ये त्यांची हेवी इंडस्ट्रीजचे डायरेक्टर म्हणून बदली केली. ह्या बदलीवर जाण्याऐवजी त्यांनी १९९२ मध्ये लष्करामधून निवृत्ती स्वीकारली. मधल्या १९८७ ते १९८९ या काळात हमीद गुल आयएस‌आयचे डायरेक्टर जनरल होते.

अखंड भारतद्वेष

संपादन

१९७१ सालच्या युद्धानंतर पाकिस्तानचे तुकडे होउन बांगलादेश तयार करण्यामागे भारत कारणीभूत असल्याने ज्या तरुण पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या मनात भारतविरोधाचे बीज रुजले, त्यातले हमीद गुल हे एक होत.[ संदर्भ हवा ]

जेव्हा १९८७ साली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुखपद (1987–1989) हमीद गुल यांच्याकडे चालून आले तेव्हा त्यांनी त्याचा वापर पाकिस्तानात एक भरभक्कम भारतविरोधी दहशतवादी यंत्रणा उभारण्यासाठी केला. जमात उद् दावा आणि लष्कर ए तयबाचा प्रणेता हाफीज सईद यांची व त्यांची मैत्री तेव्हापासूनच मैत्री होती.

युद्धाची खुमखुमी

संपादन

हमीद गुल हे भारताला धडा शिकवायच्या वेडाने इतके झपाटलेले होते की, त्यांच्या डोक्यात भारताविरोधात अणुबॉम्ब कसा वापरता येईल याचेच डावपेच घोटाळत राहायचे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणजे त्याचा समाचार घेता येईल अशी इच्छा ते वारंवार बोलून दाखवत. त्यासाठीच ते सरहद्दीवर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले आयोजित करत. भारत आणि पाकिस्तान यांच्यांत शांतता चर्चा सुरू झाली की, त्यांचे डोके फिरत असे आणि मग ते हाफिज सईदच्या मसलतीने भारतावर अतिरेकी हल्ल्याच्या नवनव्या योजना आखत असत.

राजकारणी लोकांबद्दल तिरस्कार

संपादन

हमीद गुल यांना पाकिस्तानातील राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटे. निवडणुकीतून निवडून आलेले सरकार टिकू नये यासाठी त्यांची सतत धडपड असायची. पाकिस्तानी लष्कर हे राजकारण्यांच्या हाताखाली कधीही काम करणार नाही असे ते जाहीरपणे सांगायचे. पाकिस्तानात लष्करी राजवट आली की, त्यांना आनंद व्हायचा.

जनरल मुशर्रफ लष्करी उठाव करून सत्तेवर आले तेव्हा त्यांना आपणच सत्तेवर आलो आहोत असे हमीद गुल यांना वाटले. ते आनंदाने मुशर्रफ यांना भेटायला गेले आणि त्यांनी मुशर्रफना सांगितले की, आता तुम्ही फक्त सत्तेचा आनंद घ्या. मी सत्ता राबवतो, तुम्ही निश्चिंत रहा. मला फक्त पंतप्रधान करा आणि बघा. पण मुशर्रफ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.हे कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांनी हमीद गुल यांना सत्तेच्या वळचणीलाही उभे केले नाही. त्यामुळे हमीद गुल यांचा जो काही संताप झाला, तो त्यांच्या मृत्यूपर्यंतही संपला नव्हता.

आधी रशियाविरोध मग अमेरिकाविरोध

संपादन

हमीद गुल हे ओसामा बिन लादेन आणि तालिबानचे कट्टर समर्थक होते. ओसामा बिन लादेनशी त्यांचा थेट संपर्क होता. अफगाणिस्तानात सोविएतविरोधी लढ्यासाठी तालिबानला तयार करण्यातही त्यांचा मोटा वाटा होता. त्याकाळी अमेरिकेलाही हमीद गुल यांचा मोटा आधार वाटायचा. पण अफगाणिस्तानातून सोव्हिएट सेना निघून गेल्यानंतर हा आधार अमेरिकेवरच उलटला. नंतरच्या काळात ते इतके अमेरिकाविरोधी झाले की, काही काळ ते अमेरिकेच्या हिटलिस्टवर गेले आणि त्यांना अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने घरात दडून बसावे लागले होते.

दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार

संपादन

मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचे सर्व नियोजन हमीद गुल यांनीच केल्याचे सांगण्यात येते.

हमीद गुल यांच्यावर पाकिस्तानचे भूतपूर्व लष्करशहा झिया उल हक यांचा मोठा प्रभाव होता. किंबहुना ते त्यांच्याच तालमीत तयार झाले होते. हमीद गुल हे बटालियन कमांडर असताना झिया उल हक हे त्यांचे वरिष्ठ होते. त्यामुळे झिया लष्करात जसजसे वर चढत गेले, तसे हमीद गुलही वर चढत गेले.

भारतातील पंजाब राज्यातल्या दहशतवादाला खतपाणी घालण्यात गुल यांनी त्याकाळी डिव्हिजनल कमांडर या नात्याने मोटी कामगिरी बजावली.

हमीद गुल १९८७मध्ये आयएसआयचे प्रमुख झाले तेव्हा सुदैवाने पंजाबातील दहशतवाद भारताने संपुष्टात आणला होता. पण त्यांनी काश्मिरातील दहशतवादाला खतपाणी घातलेच. पुढे सत्तेवर आलेल्या लोकशाही सरकारांनी त्यांच्या उपद्‌व्यापामुळे त्यांना बिनमहत्त्वाची वाटणारी पदे दिल्यामुळे त्यांनी लष्करातून निवृत्ती पत्करली. त्यानंतर ते भारतविरोधी भाष्यकार म्हणून नावारूपाला आले. याच काळात त्यांनी दहशतवादी संघटनांना मदत करणारी यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली.

मृत्यूनंतरही भारतविरोध जिवंत

संपादन

हमीद गुल मरण पावले, तरी त्यांनी निर्माण केलेली पाकिस्तानातील भारतविरोधी प्रवृत्ती येता आणखी काही काळ तरी तशीच जिवंत राहण्याची शक्यता आहे, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे..