जन्म १८५२, मिदनापूर  - मृत्यू १९०७

ऋषी राजनारायण बोस यांच्या ज्येष्ठ कन्या आणि श्रीअरविंद घोष, बारीन्द्र घोष यांची माता म्हणून परिचित आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

संपादन

स्वर्णलता देवी यांचा जन्म मिदनापूर येथे झाला होता, त्या प्रसिद्ध ऋषी राजनारायण बोस यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्यांना चार भाऊ आणि पाच बहिणी होत्या: जोगीरनाथ (अविवाहित, “बोरोमामा”), हेमलता (दीनानाथ दत्ता यांच्याशी विवाह), सुकुमारी (त्रैलोक्यनाथ घोष यांच्याशी विवाह), लीलाबती (१८६४-१९२४, मावशी 'ना-मेसी' यांनी कृष्ण कुमार मित्रा यांच्याशी विवाह केला.), लज्जाबती (१८७०-१९४२, अविवाहित), जतींद्रनाथ, मुनींद्रनाथ, कुमुदिनी (१८८२-१९४३, सचिंद्र प्रसाद बोस यांच्याशी विवाह झाला). बसंती (१८८४-१९६५, जतींद्रनाथ चक्रवर्ती यांच्याशी विवाह), सुकुमार (१८८५-१९७३, पदवीधर).

बहीण कुमुदिनी यांनी बंगालीमध्ये अनेक पुस्तके लिहिली आणि नऊ वर्षे चाललेल्या 'सुप्रभात' या सचित्र बंगाली मासिकाच्या त्या संपादक होत्या. टागोर कुटुंबियांशी बोस कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. कुमुदिनी यांच्या विनंतीवरून श्रीअरविंद यांनी तुरुंगातील त्यांच्या अनुभवांवर सुप्रभात मासिकामध्ये लेख लिहिले. 'कारकाहिनी' या नावाने ते सदर प्रसिद्ध झाले.), []

विवाह

संपादन

१८६४ मध्ये स्वर्णलता देवी यांचा विवाह डॉ. कृष्णधन घोष यांच्याशी झाला. डॉ. घोष यांचा कल ब्राह्मो समाजाकडे होता त्यामुळे हा विवाह ब्राह्मो समाजाच्या संस्कारानुसार पार पडला. [] या विवाहसोहळ्यामध्ये सोसायटीचे सर्व प्रमुख सदस्य तेथे होते. विशेषतः त्यांचे नेते, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन, विजयकुमार गोस्वामी आणि भोलानाथ चक्रवर्ती हे या विवाहास उपस्थित होते. डॉ. कृष्णधन घोष हे सनातनी हिंदू कुटुंबात वाढले होते. मेदिनीपूर येथे हा विवाह संपन्न झाला. या विवाहाच्या वेळी राजनारायण बोस यांनी डॉ. कृष्णधन घोष यांना 'धर्मतत्त्व दीपिका' हा ग्रंथ भेट दिला.[]

 
स्वर्णलता घोष - पती व अपत्यांसमवेत (लंडन)

कौटुंबिक जीवन

संपादन

डॉ. कृष्णधन घोष आणि स्वर्णलता यांना सहा मुले होती - पाच मुलगे आणि एक मुलगी: बेनोयभूषण, मनमोहन, अरबिंदो, बालपणी मरण पावलेला मुलगा, सरोजिनी आणि बारिंद्र कुमार.

१८६६ मध्ये तरुण डॉक्टर घोष यांना भागलपूरला पाठवण्यात आले आणि त्यांना सरकारी दवाखान्याची जबाबदारी देण्यात आली. भागलपूर येथे, १८६७ मध्ये, त्यांचे पहिले अपत्य बेनॉयभूषण, आणि १८६९ मध्ये दुसरे अपत्य मनमोहन यांचा जन्म झाला. जानेवारी १८७० मध्ये डॉ. घोष कलकत्त्याहून ग्रेट ब्रिटनला रवाना झाले. स्वर्णलता या दोन मुलगे, बेनॉयभूषण आणि मनमोहन आणि एक नर्स, मिस पेजेट यांच्यासोबत राहिल्या. एप्रिल किंवा मे १८७१ मध्ये डॉ. घोष भारतात परतले. लवकरच डॉ. घोष यांना रंगपूरच्या सिव्हिल स्टेशनचे 'प्रभारी सहाय्यक शल्यचिकित्सक' म्हणून नवीन पद देण्यात आले. ऑक्टोबर १८७१ मध्ये डॉ.घोष आणि त्याचे कुटुंब तेथे वास्तव्यास गेले.

१८७२ च्या उन्हाळ्यात रंगपूरमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यानंतर कॉलराची साथ पसरली, म्हणून डॉ. घोष यांनी आपल्या गर्भवती पत्नीला कलकत्त्याच्या तुलनेने निरोगी वातावरणात त्यांचे मित्र मनमोहन घोष यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथे १५ ऑगस्ट १८७२ रोजी, श्रीअरविंद यांचा जन्म झाला.

१८७६ मध्ये स्वर्णलता यांनी सरोजिनीला जन्म दिला. स्वर्णलता या पतीच्या इच्छेनुसार इंग्रजी स्त्रियांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत असत. त्यांना 'रंगपूरचा गुलाब' हा किताब मिळाला होता. []

परदेश गमन

संपादन

१८७८ च्या अखेरीस डॉ. घोष, श्रीमती घोष, त्यांची तीन मुले आणि मुलगी सरोजिनी हे संपूर्ण कुटुंब इंग्लंडला गेले. त्याकाळी महिलांनी समुद्र ओलांडून परदेशांत जाण्याचे प्रमाण अगदी अल्प होते. स्वर्णलता या त्यापैकी एक होत्या.

हे कुटुंब १८७९ च्या सुरुवातीस त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले. डॉ घोष यांनी आपल्या मुलांना इंग्लिश पाद्री आणि त्यांची पत्नी मिस्टर आणि मिसेस ड्र्वेट यांच्याकडे मँचेस्टरमध्ये सोडले. त्यानंतर डॉ. घोष, आपल्या पत्नीला आणि मुलगी सरोजिनी हिला घेऊन लंडनला रवाना झाले.  या सुमारास स्वर्णलता गरोदर होत्या. लंडनमध्ये स्वर्णलता यांना वैद्यकीय मदत मिळाली.

०५ जानेवारी १८८० रोजी क्रॉयडन येथे स्वर्णलता यांनी बारिंद्र कुमार यांना जन्म दिला. त्याचे नाव "इमॅन्युएल मॅथ्यू घोष" म्हणून जन्म नोंदवहीमध्ये सूचीबद्ध आहे. मार्च १८८० मध्ये, स्वर्णलता दोन महिन्यांच्या बारीन्द्र आणि तीन वर्षांच्या सरोजिनीसह भारतात परतल्या.

पतीनिधन

संपादन

श्रीअरविंद आपले शिक्षण पूर्ण करून भारतात यायला निघाले, ते ज्या बोटीने येत होते ती बोट बुडली अशी वार्ता समजल्याने, (ती वार्ता चुकीची होती.) त्या धक्क्याने त्यांचे वडील डॉ.कृष्णधन घोष यांचा मृत्यू झाला. []

१८९४ मध्ये श्रीअरविंद घोष आपल्या आईला भेटण्यासाठी रोहिणी या गावी गेले. जवळजवळ १४ वर्षांनी भेटलेल्या अरविंदांना त्यांनी प्रथम ओळखले नाही.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "sri-aurobindo.co.in". sri-aurobindo.co.in.
  2. ^ A.B.Purani. Life of Sri Aurobindo.
  3. ^ राजनारायण बोस, अनुवादक - देवदत्त (२००१). हिंदू धर्म की श्रेष्ठता. पॉन्डिचेरी: श्रीअरविंद चेतना धारा ट्रस्ट.
  4. ^ K.R.Srinivasa Iyengar (1945). Sri Aurobindo - A biography and a history. Pondicherry: SRI AUROBINDO INTERNATIONAL CENTRE OF EDUCATION. ISBN 81-7058-813-8.
  5. ^ सुहासिनी देशपांडे (२०२३). श्रीअरविंद आणि महाराष्ट्र. पुणे: श्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा.
  6. ^ सत्प्रेम, अनुवाद - भा.वि.कुलकर्णी (२००१). श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस. मिरा अदिती, म्हैसूर. ISBN 81-85137-67-6.