सुलभा देशपांडे

मराठी चित्रपट अभिनेत्री

सुलभा अरविंद देशपांडे (माहेरच्या सुलभा कामेरकर) (जन्म : २१ फेब्रुवारी १९३७; - ४ जून २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या.

सुलभा देशपांडे
सुलभा देशपांडे
जन्म सुलभा देशपांडे
२१-२-१९३७
मृत्यू ४-६-२०१६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके शांतता! कोर्ट चालू आहे
प्रमुख चित्रपट इंग्लिश विंग्लिश
वडील वसंतराव कामेरकर
पती अरविंद देशपांडे (विवाह १९६०; मृत्यू ३-१-१९८७)
अपत्ये निनाद, अदिती (सून)

सुलभा देशपांडे यांच्या नावावर मराठीतल्या ११७ पेक्षा जास्त भूमिका, २११ हिंदी मालिका, मराठी-हिंदी नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, शिवाय लघुपट आणि ३४ पेक्षा जास्त जाहिरातपट असा पसारा आहे. सुलभाताई या ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होत्या. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेली नाटके, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका ही माहिती चोवीस पानी आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अशीच शंभराच्या घरात आहे.

अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’मधून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रशाला’च्या संचालिका म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले. चतुरस्त्र अभिनेत्री नाटय, चित्रपट,मालिका मधून आपल्या शसक्त अभिनयाद्वारे आठवणीत राहणारी अभिनेत्री *सुलभाताई देशपांडे* यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. शिक्षिका ते रंगभूमी,आणि रंगभूमी ते रुपरी पडदा असा सुलभाताईचा प्रवास. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर छबिलदास शाळेत शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य करत असतानाच लहान मुलांसाठी बालनाटय बसवून दिगदर्शन करू लागल्या.बाबा हरवले आहेत,राजा राणीला घाम हवा या बालनाट्याचे दिगदर्शन केले.1950 मध्ये राज्यनाट्यस्पर्धेच्या नाटकातून अभिनेत्री म्हणून अनेक बक्षिसे मिळविली. 1960 मध्ये प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीशी त्या जोडल्या गेल्या.1970 रंगायण तर 1971 त्यांनी आविष्कार संस्थेची स्थापना बाल नाटय चळवळ चालविण्यासाठी केली.त्या या बालनाट्य प्रशिक्षणा बरोबर बाल नाट्यातून अभिनय सुद्धा करीत. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील त्यांची लीला बेणारे बाईची भूमिका खूपच गाजली.,

सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल यांच्या मुळे त्यांनी हिंदी चित्रपट भूमिका,गमन,इजाजत,सन ऑफ बॉम्बे मधील भूमिकेस अपेक्षित न्याय दिला.मराठी चित्रपटात जैत रे जैत, चौकट राजा यातील त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. पुढे अरविद देशपांडे यांच्याशी विवाह झाला. दोघांनी मिळून चक्रशाळा ही संस्था लहान मुलांच्या नाटय शिक्षणासाठी स्थापन केली. 70 मुलांना घेऊन दुर्गा झाली गौरी या नाटकाचे प्रोयोग केले.नाना पाटेकर,उर्मिला मातोडकर ही बहुतेक चक्रशाळेचीच देणगी. कुसुमाग्रज, वसंतराव कानेटकर पुरष्कारा बरोबरच महाराष्ट्र शासनाचा महानटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले . शिक्षिका ते बाल रंगभूमीची अभ्यासक .रंगभूमी, चित्रपट सृष्टी, छोटा पडदा आपल्या अभिनयाने व्यापून बाल नाटय,प्रशिक्षणासाठी म्हणजेच बाल वयातच कलावंत घडविणारे विद्यापीठ सुलभाताई देशपांडे होत्या.

अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे या या नाट्यप्रेमी दांपत्याने मराठी रंगभूमीवर ‘रंगायतन’ (१९६०-७०) आणि ‘आविष्कार’ (१९७०) या दोन्ही समांतर रंगभूमींना बळकटी दिली आणि दर्जेदार प्रायोगिक मराठी नाटकांची परंपरा कल्पकतेने सांभाळली. सुलभाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंत शेकडो नाटकांत भूमिका केल्या.त्याचा स्वभावही समजदार आणि सुंदर आहे.

शांतता कोर्ट चालू आहे संपादन

विजय तेंडुलकरांनी लिहिलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचे नाटक होय. अरविंद देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या ‘बेणारे बाई’ला सुलभाताईंनी अजरामर केले.

१९६७ मध्ये ‘रंगायन’साठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक करायचे ठरले तेव्हा स्पर्धा तीन आठवड्यांवर आली होती आणि तेंडुलकरांनी नाटक लिहायला सुरुवात केली. रोज लिहिलेली काही पाने तेंडुलकर पाठवायचे. दिग्दर्शक अरविंद सुलभाताईंना रात्री अभ्यासाला बसवल्यासारखा नाटकातले प्रसंग समजावून द्यायचे आणि त्या पुढच्या दिवशी कलावंतांकडून त्या तालमी करवून घ्यायच्या. मधला भरणा आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक कलावंत भरायचा. आपली भूमिका आपणच सजवायची. सुलभाताई फक्त डायरेक्टरचे म्हणणे सांगायच्या. थोडक्यात काय तर हे नाटक अरविंद देशपांडे यांनी रिमोट कंट्रोलने बसवले.

‘शांतता कोर्ट..’मधले लीला बेणारेंचे स्वगत हे तालमीच्या ठिकाणी तेंडुलकर आल्यावर त्यांना एका खोलीत बंद करून लिहून घेण्यात अरविंद देशपांडे यशस्वी झाले आणि नंतर ते नाटक इतके गाजले की तेरा भारतीय भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद झाला. ‘शांतता..’ हे नाटक २० डिसेंबर १९६७ रोजी स्पर्धेत रवींद्र नाट्य मंदिरामध्ये प्रथम सादर झाले आणि विजय तेंडुलकरांना या नाटकासाठी कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार मिळाला. नाटक मग हाऊसफुल्ल होऊ लागले.

नाटके संपादन

सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)

 • अग्निदिव्य
 • अंधायुग (हिंदी, गांधारी)
 • अवध्य
 • अशीच एक रात्र येते
 • एक डोह अनोळखी
 • एक होती राणी (खरी राणी)
 • काठोकाठ भरू द्या प्याला
 • गुरू महाराज गुरू
 • घरकुल
 • घरटे अमुचे छान
 • घेतलं शिंगावर
 • देव जागा आहे
 • देवमाणूस
 • दोघी
 • नटसम्राट (कावेरी)
 • प्रतिमा
 • बाकी इतिहास
 • बाधा (तारा)
 • बायको उडाली भुर्रर्र
 • मधल्या भिंती (मंदा)
 • माझे घ्रर (वहिनी)
 • ययाति (शर्मिष्ठा)
 • रंगसावल्या
 • रथचक्र
 • राजे मास्तर (म्हांबरी)
 • रामनगरी (१९८२)
 • लग्नाची बेडी (अरुणा)
 • लाखेचे मणी
 • वाडा चिरेबंदी
 • शांतता कोर्ट चालू आहे (बेणारे बाई) (१९७१)
 • शितू (शितू)
 • शेजारी
 • श्रीमंत
 • सखाराम बाईंडर (हिदी) (चंपा) (भूमिका आणि दिग्दर्शन)
 • सगेसोयरे (मीरा)
 • ससा आणि कासव (उषा, सरिता)

चित्रपट व मालिका संपादन

सुलभा देशपांडे यांची भूमिका असलेले हिंदी/मराठी चित्रपट/मालिका

 • अब इंसाफ़ होगा (१९९५)
 • अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
 • अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)
 • आदमी खिलौना है (१९९३)
 • इंग्लिश विंग्लिश (२०१२)
 • इजाज़त (१९८७)
 • एक फूल तीन कांटे (१९९७)
 • कस्तूरी (१९८०)
 • कॉमन मॅन (१९९७) (टी.व्ही.)
 • कारोबार (२०००)
 • क्रोध (१९९०)
 • खून भरी मांग (१९८८)
 • गमन (१९७८)
 • गुलाम-ऐ-मुस्तफा (१९९७)
 • गैर (१९९९)
 • घर द्वार (१९८५)
 • घर हो तो ऐसा (१९९०)
 • चौकट राजा (मराठी, १९९१)
 • चौराहा (१९९४)
 • जादू का शंख (१९७४)
 • जान तेरे नाम (१९९२)
 • जानू (१९८५)
 • जिंदगी और तूफान
 • जैत रे जैत (मराठी, १९७७)
 • डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
 • तमन्ना (१९९७)
 • तमाचा (१९८८)
 • तरंग (१९८४)
 • त्रिदेव (१९८९)
 • द फिल्म (२००५)
 • दर्पण के पीछे (२००५)
 • दिल आशना है (१९९२)
 • दुनिया (१९८४)
 • दुश्मन देवता (१९९१)
 • फास्टर फेणे (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
 • बदलते रिश्ते (१९९६) टीव्ही मालिका
 • बाज़ार (१९८२)
 • भीगी पलकें (१९८२)
 • भीष्म (१९९६)
 • भूमिका (१९७७)
 • भैरवी (१९९६)
 • मन (१९९९)
 • मान्सून (२००६)
 • मिस्टर आज़ाद (१९९४)
 • मोक्ष: साल्वेशन (२००१)
 • यह कैसा इंसाफ़ (१९८०)
 • याराना (१९९५)
 • युगपुरुष (१९९८)
 • राजा की आयेगी बारात (१९९७)
 • लोरी (१९८४)
 • विजेता (१९८२)
 • विरासत (१९९७)
 • शंकरा (१९९१)
 • संध्या छाया (१९९५) (टीव्ही)
 • सलाम बाँम्बे! (१९८८)
 • सितम (१९८२)
 • सुर संगम (१९८५)
 • हमला (१९९२)
 • हेच माझं माहेर (मराठी, १९८४)

दिग्दर्शित चित्रपट/नाटक :

 • राजा रानी को चाहिए पसीना (१९७८)
 • सखाराम बाईइडर (हिंदी नाटक)

पुरस्कार संपादन

 • इ.स.२०१०चा तन्वीर सन्मान हा पुरस्कार
 • नाट्यदर्पण पुरस्कार
 • नाट्य परिषद पुरस्कार
 • महाराष्ट्र शासनाचा सहा वेळा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’
 • महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार
 • भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार