चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.

कारकीर्दसंपादन करा

सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

राम गणेश गडकरी यांची कवितासंपादन करा

चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली.

(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.)

अभिनंदनपर वर्धमान

धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव,
सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '.
परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें
राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे.
आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ!
कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?'
हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ;
गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार!
अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची--
क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची.
विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान
तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान.
पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला;
स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला!
स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा!
भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा!
समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती
उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती!
गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट
शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरुनि, काढि दृष्ट.
ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट,
सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट.
धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार,
परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार.
वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा,
आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा.
दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला,
ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला.
ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी,
निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं!
गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा,
वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा.
दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं
निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती.
प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई,
क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही!
' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! '
अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती,
हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती!
उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना,
परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना.
धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता!
हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां!
फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं,
दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी!
' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! '
खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद!
पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं,
स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही.
जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं,
दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती!
नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि,
करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि!
श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक,
करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक.
असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे.
नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे.
बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं,
अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं.
किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं,
असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं.
अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड,
क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार--
' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार.
दिनांक : १९-१२-१९१२

चित्रदालनसंपादन करा

हेही पाहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

मागील:
सर जेम्स ब्रेड टेलर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
ऑगस्ट ११, इ.स. १९४३जून ३०, इ.स. १९४९
पुढील:
सर बेनेगल रामा राउ


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.