साईबाबा

(साई बाबा या पानावरून पुनर्निर्देशित)

साईबाबा (१८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय अवलिया फकीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.[]

श्रीसचिदानंद सदगुरू साईबाबा

साई बाबा
निर्वाण १५ ऑक्टोबर, १९१८ अश्विन शुद्ध दशमी शके 1840
शिर्डी, महाराष्ट्र
भाषा मराठी
कार्यक्षेत्र शिर्डी , महाराष्ट्र
प्रसिद्ध वचन "अल्ला मालिक" व "श्रद्धा आणि सबुरी"

श्री साईसच्चरित ग्रंथातील अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. भक्‍तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्‍या रुपात शिरडीला निंबाखाली प्रकट झाले. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते "द्वारकामाई" असे संबोधित. ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजरपाटाची कफनी परिधान करत असत. ते डोक्‍यालाही पांढरे फडके बांधायचे. अनेक वर्षे तरटाचा तुकडा हेच त्‍यांचे आसन होते. साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत. हळूहळू त्‍यांची महती लोकांच्‍या लक्षात आली. त्‍यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्‍यांच्‍या अवतार कार्याच्‍या उत्‍तरार्धात त्‍यांनी हजारो लोकांना शिरडीकडे आकर्षित केले. त्‍यांच्‍या आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या दशकात सर्व पुजासाहित्‍यानिशी समारंभपूर्वक त्‍यांची पूजा सुरू झाली, आणि द्वारकामाईला राजदर‍बाराचे स्‍वरूप प्राप्‍त झाले. तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही. भक्‍तांना त्‍यांचे ईश्‍वरी प्रेम आणि वरदान प्रत्‍यक्ष प्राप्‍त होत असे. बाबा भक्‍तांना आपला ईश्‍वर आाराधनेचा मार्ग बदलू देत नसत. साई या शब्दाचा अर्थ 'मालक' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “अल्ला मालिक" "श्रद्धा सबुरी" हे साईंचे बोल होते.[]

१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली.[] बाबांच्‍या कृपेने आजही भक्‍तांना अनुभव येतो. त्‍यामुळे बाबांप्रती भक्‍तांची निष्‍ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्‍या भक्‍ताच्‍या सर्व व्‍यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्‍या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्‍या हाताने परत जात नाही अशी सर्व सामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे.[]

श्री साई महानिर्वाणानंतर जन्मलेले जन्मस्थान

संपादन

श्री साईबाबांच्या हयातीत त्यांच्या जन्मस्थानाचा, मातापित्यांचा तसेच धर्म आणि पंथांचा शोध कोणास लागला नाही. स्वतः श्री साईबाबांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. श्री साईबाबांच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या संतकवि दासगणू महाराजकृत ग्रंथ भक्तिलीलामृत वर्ष १९०६ शके १८२८ तसेच संतकथामृत वर्ष १९०८ शके १८३० या दोन्ही ग्रंथात तसेच समकालीन महत्वपूर्ण दस्तऐवजांमध्येही बाबांच्या जन्मस्थानाबाबत कोणताच उल्लेख आढळून येत नाही. सर्व साईभक्त ज्या ग्रंथास प्रमाण मानतात त्या श्री साईसच्चरित ग्रंथातसुद्धा श्री साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणताच उल्लेख सापडत नाही. श्री साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत सर्वप्रथम उल्लेख हा १९२५मधे प्रसिद्ध झालेल्या श्री साईलीला वर्ष ३रे चैत्र शके १८४७ अंक १ला मधील स्फुटविषय[] या सदरात आढळून येतो पण, या विषयीचा उल्लेख भक्त म्हाळसापती यांनी स्वतः सांगितलेल्या बाबांबद्दलच्या अनुभवात आढळून येत नाही हे विशेष. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या दासगणू महाराजकृत भक्तिसारामृत ग्रंथात श्री साईबाबांच्या गुरूंचा आणि त्यांची जन्मकथा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख अध्याय २६ मध्ये आढळतो. पण बी व्ही नरसिंह स्वामी यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार फक्त भक्तलीलामृत या ग्रंथातील केवळ ३ अध्याय बाबांसमोर वाचून दाखवण्यात आले होते. म्हणून भक्तलीलामृत वगळता संतकथामृत, भक्तिसारामृत हे ग्रंथ बाबांच्या समोर वाचून दाखवण्यात आलेले नाहीत. ज्या ग्रंथात बाबांच्या गुरूंची व बाबांची जन्मकथा आढळते तो भक्तिसारामृत ग्रंथ देखील श्री साईंच्या महानिर्वाणानंतर लिहला गेला आहे. श्री साईसच्चरित ग्रंथ देखील अध्याय ५३ ओवी १७९ अनुसार सन १९२२, शके १८४४ मधील चैत्रमासी लिहण्यास प्रारंभ होऊन सन १९२९ शके १८५१मधील जेष्ठमासात पूर्ण झाला.[] दासगणू महाराज ज्या गोपाळराव महाराजांना बाबांचे गुरू असू शकतील असे संबोधतात, ते बाबांचे गुरू असूच शकत नाहीत असे प्रतिपादन कथित साईजन्मस्थानाचा शोध लावणारे वि.बी.खेर आपल्या साईबाबा ऑफ शिरडी या पुस्तकात करतात. तसेच दासगणू महाराज यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाबांचे गुरू एखादे सुफी फकीर असावेत असे मत द इटर्नल साक्षी या प्रकरणात ते व्यक्त करतात.[] श्रीपादवल्लभचरित्रामृत ग्रंथातही बाबांचा जन्म पाथरीत झाला असे लिहले गेले असले तरी पाथरी हे बाबांचे जन्मस्थान म्हणून सर्वप्रथम प्रकाशझोतातच १९२५ साली साईलीला या मासिकातून जगापुढे आले. भक्तिसारामृतकार दासगणू महाराज आणि महाराजांचे अनुभव तसेच साईसच्चरिताचा उपोद्धात लिहणारे काकासाहेब दीक्षित यांच्या कल्पनेतून श्री साईबाबा हे पाथरीच्या ब्राम्हण कुटुंबात जन्मले आहेत असा समज पसरवून देणारे लिखाण सुरू झाले. त्यास पुढील काळात अनेकांनी उचलून धरले. परंतु, १९२५ आधी श्री साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असावे याबाबत कुठे पुसटसाहि उल्लेख आढळत नाही. जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी श्री साईबाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला.[] या विधानाने प्रेरित होऊन साईबाबा हे चांदमिया असून त्यांची पूजा करू नये अशी निरालस आणि तथ्यहीन वक्तव्य करून श्री साईबाबांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. श्री साईबाबा हे नानासाहेब पेशवे आहेत अशा आशयाचे लिखाणही श्री साईबाबांच्या बाबतीत झाले. परंतु साईभक्त हा मुळातच सकलमताचा आदर करणारा असल्याने अशा अनेक अफवा पचवून तो साईबाबांच्या भक्तीपथावर श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पुढे नेत मार्गक्रमण करत आहे. श्री साईबाबांची नोंद तत्कालीन सरकारी कागदपत्रात अवलिया अशी सापडते. त्याहून महत्वाची गोष्ट अशी की त्याकाळी गुप्तहेर खाते आणि अधिकाऱ्यांनी श्री साईबाबांचे मूळ अज्ञात असल्याचे साईकालीन रिपोर्ट आणि ऑर्डरमध्ये स्पष्ट केले आहे. " जन्म बाबांचा कोण्या देशी । अथवा कोण्या पवित्र वंशी । कोण्या मातापितरांच्या कुशी । हे कोणासी ठावे ना ।। " या श्री साईसच्चरितातील अध्याय ४ मधील ११३व्या ओवीत[] उल्लेख केल्या प्रमाणे बाबांच्या जन्माबाबत कुठेही कोणतीच खात्रीलायक माहिती सापडत नाही.

श्री साईबाबांची समकालीन सरकारी दस्तऐवजांमधील नोंद

संपादन
 
२४ ऑक्टोबर १९१८ रोजी तत्कालीन कलेक्टरद्वारे दिलेल्या ऑर्डर मध्ये श्री साईंचे मूळ अज्ञात असल्याचा उल्लेख.

श्री साईबाबांच्या काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम आपल्या अहमदनगर कलेक्टरेट सर्व्हेमध्ये तसेच विकली रिपोर्टस ऑफ क्रिमिनल इंटेलिजन्स ऑन पॉलिटीकल सिचूएशन या महत्वपूर्ण दस्तऐवजांमध्ये श्री साईबाबांची नोंद केलेली आहे. श्री साईबाबांना तत्कालीन लोक आपापल्यापरीने साधू, अवतार, फकीर तसेच अवलिया मानत असे महत्वपूर्ण निरीक्षण या दस्तऐवजात पाहण्यास मिळते.[] क्रांतिकारक श्री. गणेश श्रीकृष्ण खापर्डे, सन्मानीय श्री. हरी सीताराम दीक्षित, पूर्वी खान्देशात असलेले भाटे नावाचे एक मामलतदार, श्री. चांदोरकर ( त्याकाळचे उपजिल्हाधिकारी आणि कोपरगावचे माजी मामलतदार) ई. अशा उच्चशिक्षित साईबाबांच्या भक्तांची नोंद या दस्तऐवजांमध्ये केलेली आढळून येते. तसेच बाबांनी कोणत्याही उपासनापद्धतीचा अवलंब केला नसल्याचेही यात नमूद केले आहे. हे तीन रिपोर्ट जानेवारी सन १९११, जुलै सन १९१२ तसेच ऑगस्ट सन १९१२ मध्ये लिहले गेले होते.[] याहून आधी अहमदनगर कलेक्टरेटच्या कोपरगाव सेकंड सेटलमेंट सर्व्हे मध्ये श्री साई अवलिया फकिरांच्या सन्मानार्थ सुरू झालेल्या उरुसाची पार्श्वभूमी आणि त्याचे महत्व अधोरेखित होते. हा सर्व्हे सन १९०७ साली पूर्ण झाला होता.[१०] तसेच बाबांच्या महासमाधीनंतर २४/१०/१९१८ रोजी कलेक्टर सी.ए.बेट्स यांनी हरी सीताराम दीक्षित यांच्या पत्रावर उत्तर देताना दिलेल्या ऑर्डर मध्ये श्री साईबाबांचा मोहम्मदन ऑफ अननॉन ओरिजिन असा उल्लेख करून बाबांचे मूळ अज्ञात असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून तत्कालीन ब्रिटिश गुप्तहेर आणि अधिकाऱ्यांनाही श्री साईबाबांचे मूळ शोधता आले नाही. या तत्कालीन आणि सरकारने केलेल्या दस्तऐवजातून मिळालेल्या नोंदी श्री साईबाबांबद्दल महत्वपूर्ण आणि खात्रीलायक माहिती देतात.

कार्य

संपादन
 
श्री साईबाबांचे अत्यंत दुर्मिळ खरे छायाचित्र.

साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.

भक्त समुदाय

संपादन

साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे.

साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद

संपादन

जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.[]

श्री साईबाबांवरील महत्वपूर्ण संदर्भग्रंथ

संपादन
  • श्री साईसच्चरित (गो. र. दाभोळकर ऊर्फ हेमाडपंत)]
  • निर्वाणीचा सखा (वा. रं. गोखले)
  • श्री क्षेत्र शिर्डीचे महान संत श्रीसाईमहाराज यांचे चरित्र (पां. बा. कवडे)
  • साई सागरातील ८८ मोती (लेखक - बी. व्ही. नरसिंहस्वामी अनुवादक - श्री. ग. आंबेकर)
  • ईश्वर आहे नाही का म्हणतोस ? - श्री साईनाथांचा शरणार्थी (लेखक - स्वामी साईशरणानंद अनुवादक - वि. बा. खेर)
  • श्री साईबाबा (प्रा. डॉ. माधवराव दीक्षित)
  • श्री साईनाथ सगुणोपासना (कृ. जो. भीष्म)
  • श्री साईनाथ स्तवनमंजरी (ग. द. सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज)
  • श्री साईबाबा (लेखक - स्वामी साईशरणानंद अनुवादक - वि. बा. खेर)
  • शिरडीचे साईबाबा (के. भ. गव्हाणकर)
  • शिलधी (के. भ. गव्हाणकर)

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "History | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi". www.sai.org.in. 2023-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ "मंदिर परिसर | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi". www.sai.org.in. 2023-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ "SHRI SAILEELA YEAR 3 CHAITRA SHAKE 1847 ISSUE 1 (1925)" (PDF). 1925. 2023-04-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-04-24 रोजी पाहिले.
  4. ^ DABHOLKAR, GOVIND RAGHUNATH. "SHRI SAI SATCHARITRA MARATHI ADHYAY 53" (PDF).
  5. ^ Kamath, M. V.; Kher, V. B. (1991). Sai Baba of Shirdi (English) (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. ISBN 978-81-7224-030-1.
  6. ^ a b "Swaroopanand Saraswati tender apology before MPHC for controversial statement against Shirdi's Sai Baba". 2015-09-24. ISSN 0971-8257.
  7. ^ DABHOLKAR, GOVIND RAGHUNATH. "SHRI SAI SATCHARITRA MARATHI - ADHYAY 4" (PDF).
  8. ^ "Weekly Reports of the Director of Criminal Intelligence on the Political Situation, during January 1911". INDIAN CULTURE (इंग्रजी भाषेत). 2023-04-11 रोजी पाहिले.
  9. ^ "Weekly Reports of the Director, Criminal Intelligence, on the Political Situation, during August 1912". INDIAN CULTURE (इंग्रजी भाषेत). 2023-04-11 रोजी पाहिले.
  10. ^ PAPAERS RELATING TO THE SECOND REVISION SURVEY SETTLEMENT OF THE KOPARGAON TALUKA OF THE AHMEDNAGAR DISTRICT. BOMBAY PRINTED AT THE GOVERNMENT CENTRAL PRESS: SELECTIONS FROM THE RECORDS OF THE BOMBAY GOVERNMENT. 1907. p. 10.