बोरवणकरांच्या पुस्तकांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे अाहे.

१. महाकवि श्रीकालिदासविरचित रघुवंश, चित्रशाळा प्रकाशन, पुणे २.

या ग्रंथाचे पुढीलप्रमाणे चार भाग करण्यात अाले अाहेत

भाग पहिला : सर्ग एक ते पांच : पृष्ठसंख्या २५२

भाग दुसरा : सर्ग सहा ते नऊ : पृष्ठसंख्या २३२

भाग तिसरा : सर्ग दहा ते तेरा : पृष्ठसंख्या २१२

भाग चौथा : सर्ग चौदा ते एकोणीस : पृष्ठसंख्य़ा ३००

प्रकाशकाने लिहिलेली प्रस्तावना खालीलप्रमाणे अाहे.

``महाकवि कालिदासाच्या जगद्विख्यात काव्याचे एकूण चार निरनिराळ्या भागांत अाम्हीं प्रकाशन केले अाहे. प्रत्येक सर्गातील मूळ श्लोक त्यावरील मल्लिनाथाची टीका, मराठी अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा, संस्कृत टीप्पणी वगैरे माहिती देण्यांत अाली असून प्रत्येक सर्गाला रसग्रहणात्मक एक छोटासा उपसंहार जोडण्यात अालेला अाहे. तसेच शेवटच्या चौथ्या भागात सुमारे पन्नास पानांचा एक दीर्घ उपसंहार जोडला असून त्यांत कालिदासाचे थोडक्यात चरित्र सांगून सबंध काव्याचे मार्मिक रसग्रहण करण्यात अालेले अाहे. भाषान्तरकार कै. रामचंद्र गणेश बोरवणकर व संपादक कै. रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर यांचा संस्कृत वांमयाचा थोर व्यासंग असून या अशा कामावरील त्यांचा अधिकारहि फार मोठा होता. त्यामुळे हे सर्व भाग या काव्याच्या अभ्यासकास अत्यंत उपयुक्त होतील यांत शंका नाही.

पुस्तकाचे शेवटचे वाक्य अात्मकथनपर अाहे. बोरवणकर लिहितात,

``शेवटी प्रतिकूल परिस्थितीच्या प्रचंड झंझावाताच्या तडाक्यात सापडल्यामुळे उद्विग्न झालेल्या मनांत डोकावणार्या अात्महत्येसारख्या विचारांना अडवून धरण्यासाठी सुरु केलेल्या कार्याची ह्या स्वरुपातील परिणति ज्या श्रीगजाननाच्या कृपेने झाली, त्याच्याच चरणी पुन्हा एकदा विनम्र होऊन समाप्त म्हणतो.