सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

सखाराम बाईंडर
विजय तेंडुलकर
जन्म नाव विजय धोंडोपंत तेंडुलकर
जन्म जानेवारी ६, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कथा
अपत्ये प्रिया तेंडुलकर तनुजा

निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग इ.स. १९७२ मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेत याचे भाषांतरही झाले न्यू यॉर्क शहरात दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले.

नाटकाचा विषय असलेला बाईंडर हा खरोखरच वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्यातुकड्यांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती.

एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाइंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला.

तेंडुलकरांचे हे नाटक श्री. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. नाटक पाहिलेल्यांनी, आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी 'या नाटकात अश्लीलता आहे', 'या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे', 'हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे', असा ओरडा करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला.

नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक श्री. कमलाकर सारंग कोर्टात गेले, आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर केस जिंकले. 'सखाराम बाईंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले.

निळू फुले आणि लालन सारंग यांनी १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी ध्वनिचित्रफीतीसाठी हे नाटक केले होते.

या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

ललित कला केंद्राचा प्रयोग

संपादन

२००१ साली ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना तेथील २०-२२ वर्षाच्या मुलांनी स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बाईंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. पुन्हा त्याच टीमसोबत २०१७ साली, हे स्त्री-पुरूष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक परत रंगभूमीवर येणार आहे. यावेळी नाटकाचे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असे दोनच प्रयोग होणार आहेत. नाटकात मुक्ता बर्वे, संदीप पाठक, सुहास शिरसाट, यांच्या भूमिका असतील.