संभाजी भगत
संभाजी भगत (जन्म : १ जून १९५९) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहेत. संभाजी भगत यांनी एकाहून अधिक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजी भगत यांनी बरीच व्याख्याने दिली आहेत.
संभाजी भगत | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १ जून, १९५९ |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | बौद्ध धर्म |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
सुरुवातीचे जीवन
संपादनभगत यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचगणी जवळील महू या गावात एका गरीब कुटुंबात झाला. संभाजी लहानपणापासूनच गावातल्या कुणबी आणि मातंग समाजातल्या कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. त्यांच्या भजनांवर आणि भारुडांवर संभाजीचा कलावंत पिंड पोसला गेला. पुढे ते मुंबईत आले आणि विद्यार्थी प्रगती संघटनेतून डाव्या चळवळीशी जोडले गेले आणि त्यांनी आपले गावाकडचे कलासंचित येथील नव्या फॉर्ममध्ये परावर्तित केले.
लोककलेतील कारकीर्द
संपादनसंभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ मिळालेल्या ’कोर्ट’ या चित्रपटातले एक गाणे त्यांनी गायले आहे. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. त्या नाटकाची मूळ संकल्पना, नाटकातली गीते व संगीत संभाजी भगत यांचेच आहे. या नाटकाला मिफ्टा अॅवॉर्ड मिळाले. त्यानंतर ’शिवाजी अंडरग्राऊंड’ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली. या नाटकाचे कलाकार हे जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत.
आपल्या भोवतालचे वास्तव ठोक शब्दांत मांडत त्यातून विदोहाची ज्वाला फुलवण्यासाठी संभाजी भगत यांनी नवे, व्यवहारातले शब्द शोधले. मुंबईच्या धारावीत भरलेल्या पहिल्या विदोही साहित्य संमेलनात त्याने 'हे पालखीचे भोई, ह्यांना आईची ओळख नाही' हे गीत सादर केले तेव्हा सर्व वातावरणच भारल्यासारखे झाले. ’आव्हान नाट्य मंचा’तर्फे संभाजीने शाहीर विलास घोगरे यांच्याबरोबर संभाजी भगत यांनी अनेक पथनाट्ये सादर केली. शाहिरी कार्यक्रम केले. विलास घोगरे यांच्या मृत्यूनंतर 'आव्हान'ची जबाबदारीही सांभाळली. कलेतून सतत समकालीन वास्तवाला भिडत राजकीय भूमिका घेणारा शाहीर म्हणून त्याचे लोककलेतील स्थान वादातीत आहे.
लेखन साहित्य
संपादनसंभाजी भगत यांनी लिहिलेले लेखन साहित्य व इतर.
- अडगळ (नाटक)
- कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र)
- तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह
- रणहलगी (लेखसंग्रह) 'उंदीर' नावाचे भारूड आणि 'गिरणीचा वग' हे मुक्तनाट्य
- बॉम्बे- १७ (नाटक) - प्रायोगिक, एकपात्री दीर्घांकी ’अडगळ’चे त्यांनी केलेले हे व्यावसायिक रूपांतर आहे.
- शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक)
भगत यांनी भरवलेले काही कार्यक्रम
संपादन- गिरणीचा वग
- विविध कलाकृतींची रेलचेल असलेला ’रणहलगी’ हा वाद्यवृंद
- सृजनाचा यल्गार
गाणी
संपादन- उंदीर (भारूड)
- जीव एकटा एकटा (पोवाडा)
- माझे गं माय (पोवाडा)
- ’नागरिक’ या चित्रपटाचे संगीत शाहीर संभाजी भगत यांचे होते. त्यांतली काही गाणीही त्यांनी गायली आहेत.
- संभाजी भगत यांनी तेलंगणाचा कडवा साम्यवादी शाहीर गद्दर याची अनेक गाणी हिंदी आणि मराठीत अनुवादित केली आहेत.
चित्रपट
संपादनभगतांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या सुवर्णकमळाने सन्मानित करण्यात आले. तर, ‘शिवाजी अंडरग्राउंड’ची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या महोत्सवात झाली.[१]
सन्मान व पुरस्कार
संपादन- अस्मितादर्श पुरस्कार
- प्रबोधनमित्र पुरस्कार (२०१४) - आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे
- मिफ्ता पुरस्कार
- मुंबईत भरलेल्या ५व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१४)
- ’शिवाजी’ची आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठी निवड
- संत तुकाराम पुरस्कार